कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

हृदय तोड दे !

चित्रपट -  पुरब और पश्चिम
गीत - इंदिवर
संगीत -  कल्याणजी आनंदजी
गायक - मुकेश

कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे...ह्या हिंदी गाण्याचा भावानुवाद!

दाचित कुणी तुज दगा जर दिला
घराबाहेरील जर रस्ता दाविला
तेव्हा तू प्रिये यावे माझेकडे
न संकोचता तू मनाशी जरा, ही
                  विनंती गडे .... ॥धृ०॥

तुला आज माझी गरज ना मुळी
हजारो जीवांचे तुला साकडे
तुझे आज तारुण्य ऐसे जसे
की प्रेमवीरांचा गराडा पडे
हसतील तुला हे जेव्हा आरसे
न भाळेल रुपावर कुणी फ़ारसे
तेव्हा तू प्रिये यावे माझेकडे
जरा ठेव विश्वास मजवर तुला ही
                  विनंती गडे .... ॥१॥

म्हणू प्रेम याला की व्यवहार हा?
करतेस तू जे तुला आवडे
तुडवून पायी तू मम भावना
कसली नशा ही तुला गं चढे
उतरेल जेव्हा तुझी ही नशा
अंधारतील या दहाही दिशा
तेव्हा तू प्रिये यावे माझेकडे
उघडीच असतील अभय ही कवाडे
                  सदाही गडे .... ॥२॥

कवी: गंगाधर मुटे

अश्रू!

येतो दाटून गळा, अश्रू होतात गोळा 
आले आभाळच भरुनिया काहीच न कळे
नको ओघळाया, पापण्यांना हळूच पुसतो, 
मला मात देत ओघळून होती मोकळे 
अश्रू असेच असती, किती लपवावे तरी 
ओघळती हलकेच, मन होते मोकळे

कवी: आल्हाद पाटील

सांजवेळी साथीला सूर देउन जा ना...!

सांजवेळी साथीला सूर देऊन जा ना
रंग मावळतीचे जरा उधळून  जा ना

तो सूर्य विझत चालला नभात एकटाच
भाळी आभाळाच्या चंद्रकोर रेखून जा ना

छे, कशास चर्चा त्या चतकोर आभाळाची
या घराच्या आठवणी उजळवून जा ना

चेहरे लेऊन येतील खोटी स्मिते अनेक
लक्ष्मणरेषा अंगणी जरा आखून जा ना

चांदण्यात वाचेन मी निरोप बोलके तुझे
इथल्या वार्‍यास तुझा गंध देऊन जा ना

पाऊले घेऊन चालली परक्या देशी तुज
मेघतुडुंब नैनात चैत्रमास फुलवून जा ना

कवयित्री: नयना वानखेडे

जेथे विठूच्या नामाचा हो गजर !

जेथे विठूच्या नामाचा हो गजर
        माझ्या विठूचे तेथे पंढरपूर || धृ ||
                   ... विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

            डोळ्यासमोर उभा सावळा श्रीहरी
            टाळ चिपळ्यांचा नाद जयजय हरी
            जेथे विठूच्या विटेवरी नजर ||१||..माझ्या विठूचे -
        ... विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

            रंगे कीर्तन घेऊन वीणा करी
           संगे नर्तन तल्लीन झाल्यावरी
            जेथे नेमाने वारकरी हजर ||२||..माझ्या विठूचे -
        ... विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
       
          बुक्का गुलाल शोभे ललाटावरी
          तुळशीमाळ रुळते कंठावरी
          जेथे आधार माउलीचा पदर ||३||..माझ्या विठूचे -
             ... विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

कवी: विजयकुमार देशपांडे

मी घरात!


कवी: अभिजीत राजवाडे

फक्त !

फक्त’ शब्दाची मजा सांगते मी इथे,
जास्त नाही, फक्त काहि, शब्द लिहिते इथे   ll १ ll

सांगतो, एकमेका, फक्त आराम कर,
नशिबी असे परी, फक्त तू काम कर       ll २ ll

फक्त चहा, फक्त नाश्ता, फक्त स्वयंपाक कर,
फक्त मुलांचा अभ्यास घे, अन फक्त, नोकरी कर ll ३ ll

फक्त स्वच्छता कर, अन फक्त बाजारहाट कर,
फक्त बिले तू भर, अन, फक्त आराम कर     ll ४ ll

मुलांना सांगतो आम्ही, फक्त अभ्यास कर,
फक्त स्कॉलरशीप, अन फक्त स्पर्धा कर      ll ५ ll

फक्त क्लास, फक्त गाणे, फक्त व्यायाम कर,
फक्त नाच, फक्त प्रत्येक कला, आत्मसात कर ll ६ ll

फक्त शब्दाने किती केली जादू ही अशी,
फक्त शब्दाने लहान वाटती लाखोंच्या राशी   ll ७ ll

म्हणून तुम्हीही सदा ’फक्त’ ठेवा लक्षात,
फक्त, फक्त, असे नेहमी घोका मनात.           ll ८ ll


कवयित्री: सुलभा मुंडले

महानगर!


 मी जिथे राहतो

ते एक महानगर आहे..

इथल्या व्याख्या वेगळ्या आहेत..

इथली परिमाणं वेगळी आहेत..

इथे उंची, ब्रॅंड्समध्ये मोजली जाते

आणि श्रीमंती, स्क्वेअर फूटमध्ये..

खोली लक्षात येते सरकारी कचेर्‍यात..

आणि झेप, मिळणार्‍या पॅकेजमध्ये..


इथे व्यक्तीस्वातंत्र्य लक्तरांमध्ये मिरवतं..

कधी फसफसतं  आणि मग फुटपाथवर हसतं.


इथल्या रात्री आगळ्या आहेत..

काही अंग थिरकत असतात

आणि काही कुडकुडत असतात..

काही पाय लटपटत असतात..

आणि काही लगबगत असतात..

काही हात शिवशिवत असतात..

आणि काही विनवणत असतात.



इथले दिवससुद्धा गमतीदार आहेत.

सकाळ झाली रे झाली..

की  रस्त्यांवर घड्याळे धावतात...

सिग्नलवर थांबलेली घड्याळे..

लाल दिव्याखालच्या आकड्यागणिक

कॅल्कुलेटरमध्ये बदलतात..

एखादा कॅल्कुलेटर घाईघाईत घड्याळ बनतो..

मग एखादे घड्याळ अचानक बंद पडते, कायमचे..

काळ-काम-वेगाचे गणित सोडवतांना..

माणूस कधी वजा केला जातो, कळतंच नाही..

इथे गुलामगिरी आहे..

गगनचुंबी इमारती, मॉल्स आणि झगमगते रस्ते म्हणजे

सावज हेरायला बनवलेला आधुनिक सापळा आहे..

घंटांची किणकिण..

बागेतला चिवचिवाट..

हास्याचा खळखळाट..

म्हणजे मुक्तीसाठी केलेला आक्रोश आहे..


हे महानगर म्हणजे एक मोठे ऑक्टोपस आहे..

जे काही त्याच्या कवेत येईल ते तो गिळतो..

आणि छोट्या ऑक्टोपसांना जन्म देतो..

आणि चक्र चालत राहतं..


कवी: संकेत पारधी

कळीकाळानं असला कसला मौका साधला!

ळीकाळानं असला कसला मौका साधला
          व्हता तो आधार आमचा निघूनीया गेला  ||धृ||

बाप तू रं आमचा तूच आमची माय
दूध बी तूच आन तूच दूधावरली साय
कोना म्हनू आता आमी माय अन बाप
       तुझ्यायीना जगू कसं कळंना आम्हाला  ||१||

न्हावूमाखू केलं तू रं
तूच घातलं खावू
  तू न्हाई समोर आता
आमी कुठं पाहू
  इस्तवात पडलो जवा
                    तवा तूच विझवाया आला      ||२||

कवी: पाषाणभेद उर्फ सचिन बोरसे

सहजीवन!

तिच्यामागून तो फिरत असतो

की त्याच्यामागून ती

कुणास ठाऊक!

त्याला स्वत:ला तशा अनेकजणी

आपल्यामागे फिरल्याचा

भास होत असावा

ती ’ती’ असल्यामुळे

तिच्या मनाचा थांग

कुणाला लागल्यास

जरूर जरूर कळवणे!

एकमेकांच्या पाठीला पाठ लावून असल्यासारखे

सोनेरी शेरवानी आणि काळी साडी

आणि त्यांचा पाठशिवणीचा खेळ

कधीही न संपणारा

ज्यात कुणाचाही भोज्जा होतच नाही कारण

भोज्जा करायला पाठीवर शिवावं लागतं

पळापळ मात्र चालूच

आदीपासून पुढे

कदाचित अंतापर्यंत

कधी हा मोठा होऊन

तिचं खुजेपण उघड करतो

मावळता मावळतच नाही

आपलं अंगं तेजाळत

रूबाबात फिरतो

कधी ती त्याला इतक्या लवकर दडपते

चांदण्यांची खडी साडीवर सांडून

नटूनथटून अशी मिरवते

की नको त्यावेळी

त्याला काजव्यांचासुद्धा

लखलखाट वाटायला लागतो

एक ’दिवस’ त्याचाही असतो

तसा तिचाही

मोठ्ठं असण्याचा!

तीनशे चौसष्टवेळा समानतेसाठी भांडतात

आणि केवळ एकदाच

समानतेच्या पातळीवर येतात

पेपरात छापून येण्यासाठीच फक्त!


कधी ती

पतीच्या गैरहजेरीतच राज्य करणारी

त्याच्या समोर येण्याचं धाडस न करणारी

आपलं अस्तित्व अंधाराशीच एकरूप ठेवून

त्याच्या मागे ठाम उभी रहाणारी, अशी

तसा तोही, कधी

सोनेरी रूबाबाचं आवरण मिरवणारा

हजारो जणांना कार्यरत ठेवणारा

तिच्या अंधारामुळे आपलं तेज उठावदार होतं

याची जाणीव असणारा

म्हणूनच थकला भागला की लुप्त होणारा

तिला अर्धं राज्य बहाल करण्यासाठी!

तरीही ती दोघं तशी

अलिप्तच वाटणारी!

कधी वाटतं

आयुष्याच्या उत्तरार्धातली

त्यांनी  केलेली ही तडजोड असावी

म्हातारपण हे दुसरं बालपण

म्हणून ही नवी भातुकली मांडली असावी

एकमेकांना सांभाळून घेण्याची

तर कधी वाटतं

हा राजकारणी नेत्यांसारखाच प्रकार असावा

आपापसात खेळून इतरांना बनवण्याचा!

उगवतीचा लाल गुलाबी रंग

आणि मावळतीचं इंद्रधनुष्य

रोज बघून मात्र वाटतं

नाही, आपल्याला चुकवून, चकवून

यांचा भोज्जा होत असावा

कधीतरी

आपण समजतो तसा

काडीमोड

घेतलेला नाही त्यांनी

पण मग

काडीमोड न घेताही

काडीमोड घेतल्यासारखं

का वागतात ते?

आपल्या नकळत

पुसटतं भेटूनही

दोन्ही दिशांना

रंगांची उधळण करतात

इतकी सुंदर!

मग वारंवार का भेटत नाहीत ते?

आपल्यासमोर हातात हात घालून

का येत नाहीत ते?


अच्छा! अच्छा!!

म्हणजे दिवस आणि रात्र यांचं

माणसांसारखंच असतं तर!

कवी: विनायक पंडित

तू!


तू आलास आणि गेलास
नि:शब्दाच्या भोव-यात
मी मात्र फिरत राहिले ॥१॥

तू काहीच बोलला नाहीस
नुसतेच स्मित करून
मनाच्या तारा छेडल्यास ॥२॥

तू तुला समजूनही
न कळल्यासारखे
फक्त पहात राहिलास ॥३॥

तू तुला रोखूनही
नजर तुझी फिरत राहिली
कुणाचा तरी शोध घेत ॥४॥

तू मनाला समजावलेस तरी
असे का वाटले मला
काहीतरी राहून गेले ॥५॥

तू खूप दूर गेलास
ठेवून मजजवळ आठवणी
फक्त त्या आठवण्यासाठी ॥६॥

तू एक भास आहेस
मग सत्य लोपले कोठे
सांगेल का रे कोणी? ॥७॥

तू दूर दूर तरी
मन का मागे रेंगाळते
असे वाटे मजजवळी ॥८॥

तू पाहात राहिलास
एकटक नजरेने
कासावीस करण्यासाठी ॥९॥

तू मात्र …………..
तू आलास आणि गेलास
नि:शब्दाच्या भोव-यात
मी मात्र फिरत राहिले ॥१०॥

कवयित्री: सुचिता देवधर(प्रियांका पाटणकर)

तुला भेटल्यावर!


तुला प्रथम भेटल्यावर, नुसतेच पाहणार आहे,
नाजूक तरल आल्हादणारे, स्मित मी करणार आहे ॥१॥

तुझा हात हाती घेऊन, हलकेच स्पर्शिणार आहे,
चिरंतन मैत्रीच्या आधाराचा, विश्वास मी देणार आहे ॥२॥

शांतपणे तुजलाची मी, मनभरून परिक्षणार आहे,
अतूट जुळलेल्या बंधनाला, मनीच्या कुपीत ठेवणार आहे ॥३॥

तू उच्चारलेला शब्द शब्द, कानांमध्ये साठवणार आहे,
माझ्या सद्‌विचारांशी त्याचे, जोडाक्षर जुळविणार आहे ॥४॥

मनातील अनेक आंदोलनांची, देवाण-घेवाण करणार आहे,
चुकलेल्यांना क्षमा करोनी, मोठेपण दाखवणार आहे ॥५॥

खांद्यावरील आधाराचा, स्पर्श तुला समजावणार आहे,
मूक संभाषणामधुनी तुझ्या, दु:ख तुझे जाणणार आहे ॥६॥

कितिही वाद झाला तरी सुसंवाद मी साधणार आहे,
तू दाखविलेल्या मैत्रीचा, आदर मी जपणार आहे ॥७॥

गैरसमजुतीच्या वा-यालाही, उलट दिशेने परतविणार आहे,
चंद्राचे शितल शब्दचांदणे, तुझ्यावर बरसणार आहे ॥८॥

मनमोकळया हास्यात तुझ्या, खळखळूनी मी हासणार आहे,
अश्रू तुझ्या नयनांमधले, पापणीत माझ्या दडविणार आहे ॥९॥

तुझ्या नी माझ्या नात्याची, रेशीम गाठ बांधणार आहे,
चिरंतन अपुल्या सुमैत्रीचा, आशिष मी मागणार आहे ॥१०॥

कवयित्री: सुचिता देवधर(प्रियांका पाटणकर)