मी जिथे राहतो
ते एक महानगर आहे..
इथल्या व्याख्या वेगळ्या आहेत..
इथली परिमाणं वेगळी आहेत..
इथे उंची, ब्रॅंड्समध्ये मोजली जाते
आणि श्रीमंती, स्क्वेअर फूटमध्ये..
खोली लक्षात येते सरकारी कचेर्यात..
आणि झेप, मिळणार्या पॅकेजमध्ये..
इथे व्यक्तीस्वातंत्र्य लक्तरांमध्ये मिरवतं..
कधी फसफसतं आणि मग फुटपाथवर हसतं.
इथल्या रात्री आगळ्या आहेत..
काही अंग थिरकत असतात
आणि काही कुडकुडत असतात..
काही पाय लटपटत असतात..
आणि काही लगबगत असतात..
काही हात शिवशिवत असतात..
आणि काही विनवणत असतात.
इथले दिवससुद्धा गमतीदार आहेत.
सकाळ झाली रे झाली..
की रस्त्यांवर घड्याळे धावतात...
सिग्नलवर थांबलेली घड्याळे..
लाल दिव्याखालच्या आकड्यागणिक
कॅल्कुलेटरमध्ये बदलतात..
एखादा कॅल्कुलेटर घाईघाईत घड्याळ बनतो..
मग एखादे घड्याळ अचानक बंद पडते, कायमचे..
काळ-काम-वेगाचे गणित सोडवतांना..
माणूस कधी वजा केला जातो, कळतंच नाही..
इथे गुलामगिरी आहे..
गगनचुंबी इमारती, मॉल्स आणि झगमगते रस्ते म्हणजे
सावज हेरायला बनवलेला आधुनिक सापळा आहे..
घंटांची किणकिण..
बागेतला चिवचिवाट..
हास्याचा खळखळाट..
म्हणजे मुक्तीसाठी केलेला आक्रोश आहे..
हे महानगर म्हणजे एक मोठे ऑक्टोपस आहे..
जे काही त्याच्या कवेत येईल ते तो गिळतो..
आणि छोट्या ऑक्टोपसांना जन्म देतो..
आणि चक्र चालत राहतं..
कवी: संकेत पारधी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा