तुला भेटल्यावर!


तुला प्रथम भेटल्यावर, नुसतेच पाहणार आहे,
नाजूक तरल आल्हादणारे, स्मित मी करणार आहे ॥१॥

तुझा हात हाती घेऊन, हलकेच स्पर्शिणार आहे,
चिरंतन मैत्रीच्या आधाराचा, विश्वास मी देणार आहे ॥२॥

शांतपणे तुजलाची मी, मनभरून परिक्षणार आहे,
अतूट जुळलेल्या बंधनाला, मनीच्या कुपीत ठेवणार आहे ॥३॥

तू उच्चारलेला शब्द शब्द, कानांमध्ये साठवणार आहे,
माझ्या सद्‌विचारांशी त्याचे, जोडाक्षर जुळविणार आहे ॥४॥

मनातील अनेक आंदोलनांची, देवाण-घेवाण करणार आहे,
चुकलेल्यांना क्षमा करोनी, मोठेपण दाखवणार आहे ॥५॥

खांद्यावरील आधाराचा, स्पर्श तुला समजावणार आहे,
मूक संभाषणामधुनी तुझ्या, दु:ख तुझे जाणणार आहे ॥६॥

कितिही वाद झाला तरी सुसंवाद मी साधणार आहे,
तू दाखविलेल्या मैत्रीचा, आदर मी जपणार आहे ॥७॥

गैरसमजुतीच्या वा-यालाही, उलट दिशेने परतविणार आहे,
चंद्राचे शितल शब्दचांदणे, तुझ्यावर बरसणार आहे ॥८॥

मनमोकळया हास्यात तुझ्या, खळखळूनी मी हासणार आहे,
अश्रू तुझ्या नयनांमधले, पापणीत माझ्या दडविणार आहे ॥९॥

तुझ्या नी माझ्या नात्याची, रेशीम गाठ बांधणार आहे,
चिरंतन अपुल्या सुमैत्रीचा, आशिष मी मागणार आहे ॥१०॥

कवयित्री: सुचिता देवधर(प्रियांका पाटणकर)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: