छबूची गोष्ट!


‘घ्या, ह्यो दिवा येनार व्हता मला घ्यायला! ह्याचं तर हितं ढाराढूर पंडरपूर सुरू हाय. आरं ए बुजगावन्या, उटतोस आता का वतू पानी त्वांडावर?’ चंद्राक्का माज्या उशाशी उबी र्‍हाउन बोलत व्हती. म्या ताडकन त्वांडावरची वाकळ फेकून उटलो, तर काय? कुन्नी बी न्हवतं. मला सपान पडलं व्हतं आक्का आल्याचं. व्हय, चंद्राक्काचं लगीन झाल्यावर ती आज पैल्याच येळला येनार व्हती. आन मी तिला घ्यायला हाडळीच्या माळावर जानार व्हतो. म्या बिगीबिगी त्वांड खंगाळून मायला म्हनलं ‘दे बगू लवकर च्या मला. चंद्राक्का येत आसल. पटकन जातो म्या.’
‘तर तर, तुलाच येकल्याला काळजी हाय न्हवं तिची! आमी कुनी न्हाई जसे!’ आत्ती कवतिकानं बोलली. माय आन ती दोगी खुदुखुदू हासू लागल्या. मी काय बी न बोलता मायनं दिलेला च्या बशीत वतून पटकन भुरकला आन सुसाट पळत सुटलो माळाकडं. आन माळावर चिंचेच्या झाडाखाली चंद्राक्काची आन भावजीची वाट बगत चिंचेचा कवळा चिगुर तोडत बसलो. व्हय, आता चिंच हळूहळू हिरवायला लागली व्हती, कोंबाकोंबानी फुलत व्हती आन आता तालुक्यावरनं येनारी हरेक बसगाडी चिंचेखाली थांबत व्हती. आजून काई दिसांनी तितं गाडीतळ बी व्हनार व्हता.

येका वर्सापासनं आता पैल्यांदा मी चंद्राक्काला सोडून येक नाय, दोन नाय तर आट दिवस र्‍हायलो व्हतो. तशी चंद्राक्का माज्या आत्तीची लेक. माज्यापेक्षा १० वर्सांनी थोर. पन आमचं दोगांचं लई जमायचं. आमी र्‍हातो, ते माज्या आज्ज्याचं मंजी माज्या मायच्या बाचं घर. आज्ज्याला माजी माय येकलीच. १० लेकरातली येकटी वाचल्याली. आज्ज्यानं त्याचा तीन येकराचा मळा, घर समदं मायच्या नावावर केलं. त्येचा येक दोस्त गावातलाच, धनबा. त्येला येक पोरगा आन येक पोरगी. त्ये दोगंबी ल्हान आसताना त्येंची माय मेली. धनबा बी जास्ती दिवस र्‍हायला नाय. त्येनं जाताना आज्ज्याच्या झोळीत लेकरं टाकली. त्येचं घरदार, शेती काय बी न्हवत. समदं सावकाराचं धन झालं व्हतं धनबाच्या आजारपनात. आज्ज्यानं ती पोरं आपली म्हनून सांबाळली, पोराला आपलीच पोरगी दिली आन पोरीचं बी शेजारच्या गावात चांगलं खातं-पितं घर बगून लगीन लावून दिलं. धनबाचा पोरगा मंजी माजा बा आणि पोरगी मंजी रंगूआत्ती, चंद्राक्काची माय. माज्या आज्ज्यानं मरताना आज्जीकडून आन आज्जीनं माज्या मायकडून वचन घेतलं व्हतं की काय जरी झालं तरी रंगू आन तिच्या लेकीला अंतर देनार न्हाई. आज्ज्याला भविष्य कळत व्हतं का काय, देव जाने! रंगूआत्ती सुकात व्हती, पन दीड वर्साआदी गनूमामा, तिचा नवरा कायतरी आजारात मेला. तिच्या दीर-जावांनी समदी शेती, घर आपापल्या नावानं करून घेतलं आन ह्या दोगींना कामवाल्या बायांवाणी राबवून घेतलं. तरी बी आत्तीची तक्रार न्हवती. पन येक दिवस भल्या पहाटचीच आत्ती आक्काला घिऊन आली आन रडायलाच लागली. मायनं तिला कसंतरी समजवलं आन मग काय झालं ते इचारलं. आत्तीच्या दिरानं सावकाराकडून कवातरी पैसे घेतले व्हते आन त्येच्या बदल्यात आक्काचं त्या सावकाराच्या येड्या पोराशी लगीन लावून द्यायच्या मागं लागला व्हता तो!
‘आरे, नवरा मेला, त्या बिचार्‍यानं कसून सोन्याची केल्याली समदी शेतीवाडी त्येंनी हाडपली, आमा दोगी मायलेकींना गड्यावानी राबवलं तरी मी गप् र्‍हायले, पन आता येवडी नक्षत्रावानी पोर त्या येड्याच्या गळ्यात बांदू का सांग बरं भाऊ!’ आत्ती बाला म्हनाली. बा तसा इतका येळ गप्प व्हता. पन मग म्हनाला, ‘आग रंगू, पन ती लोकं काय बी करतील न्हवं. उद्या हितं यिउन बी तमाशे करतील. मग काय करायचं? कुटवर वैर घिऊन बसनार हायेस तू?’
‘व्हय, व्हय. म्हनून ती गरीब गाय कसायाच्या दावनीला बांदायची. आवं, भाऊ हाय का कोन तुमी रंगूचे? मर्द असून आसं मेंगळ्यावानी बोलताय त्ये! रंगूबाय, तू नगं काळजी करू. मी हाय न्हवं! बगू कोन येतंय माज्या दारात. मी न्हाय भीत कुनाला. मायला मरताना वचन दिलंय, मीच करीन समदी वेवस्था तुमची. बिनघोर र्‍हावा हितं.’ माजी माय बोलली. माय मंजी जशी वाघीन! कुनाला ऐकायची न्हाय. बाला वाटलं व्हतं, तसंच झालं. आत्तीचे दीर तावातावानं भांडायला आले येक दिस. पन माज्या मायनं त्येंना आसं काय फैलावर घेतलं म्हनता! पळता भुई थोडी झाली चिरकुट भित्रट मुर्दाडांना! परत काय त्येंची हिंमत नाय झाली हिकडं बगायची पन!

माय आन आत्ती बासोबत मळ्यात जायच्या, माजी सकाळची शाळा झाली की मी आन आक्का घरात. आक्का पन गनूमामा जित्ता व्हता तवा शाळेत गेली व्हती, चौथीपत्तूर शिकली बी व्हती. मंग मामा मेला तशी तिची शाळा बी सुटली. पन आक्का हुशार व्हती. ती माजा आब्यास घ्यायची. मला चित्रं काडायला शिकवायची. मस्त गट्टी व्हती आमची. मी आता थांबलो तितं वेशीवर आसलेल ह्ये चिंचेचं झाड कवातरी लई हिरवगार व्हतं आनि तेच्यावर बक्कळ चिंचा लागायच्या. पन मी येक वर्साचा व्हतो, तवा कायतरी इपरीत झालं व्हतं गावात आन ते झाड पाक लाकूड झालं व्हतं सुकून. आन त्या रस्त्यानं कुनी गेलं की त्येला कायतरी व्हायचंच म्हने. गंडेदोरे, अंगारे-धुपारे, दवापानी काय बी कामाला यायचं न्हाई आन त्यो झपाटलेला मानूस मरायचा न्हायतर येडा व्हायचा म्हने. खरं तर त्या झाडाखालून जी वाट जायची, ती पल्याडच्या गावाला आनि तालुक्याच्या गावाला जायची लई जवळची वाट व्हती. तितं तालुक्यावरनं येत्याजात्या बसगाड्या बी थांबायच्या. पन ते झाड सुकल्यापासन तिकडून जानं बंद झालं व्हतं. येक डाव पाटलाच्या बाजीरावनं गाडी घातली व्हती, तर बैल बुजले आनि गाडीवानाला शिंगांनी मारून कुटतरी पळून गेले, ते गावले बी न्हाईत. त्या चिंचेवर हाडळीनं वस्ती केलीय म्हनायचे गावातले लोकं. तवापासन त्येला हाडळीचा माळ म्हनत्यात. मी येक डाव मायसोबत त्या माळावरून गेलो, तवा काय बी झालं न्हाय, पन मी मायला इचारलं तर ती म्हने, ‘ज्येचं मन सुद्द हाय, त्येला कशाची भीती नसतीय.’
मग येक डाव मी आक्काला बी त्याच वाटेनं घिऊन चाललो व्हतो, तर नेमका बाजीराव त्येची जीप घिऊन पल्याडच्या वाटंनं तालुक्याला चालला व्हता. त्येनं मला बलीवलं आन इच्यारलं ‘कुट चाललास रं नंदू?’
मी म्हनालो, ‘कुट न्हाय बा! आसच आलतो.’
मग भूतावानी हासत म्हनतो कसा, ‘आर हाडळी धरील की रं तुला. आन ती कोन व्हय रं तुजी?’
आक्का दूर थांबली व्हती, तिच्याकडं बगून त्येनं इच्यारलं. मी बोललो, ‘आक्का व्हय.’ आन सुसाट पळालो आक्काकडं. त्यो डुचका वळूनवळून बगत व्हता आक्काला. मी घरी गेल्यावर मायला सांगितलं तवा माय बोलली, ‘आरं देवा! आता ह्या डुकरापासून जपावं लागल पोरीला!’
दुसर्‍या दिवशी सक्काळीच पाटील आन पाटलीन दारात हजर! माय हळूच बोलली, ‘आली अवदसा घरावर!’
तिनं आमाला पटदिशी सौदावर जाऊन बसाया सांगितलं. त्या पाटलानं बाला सरळच सांगितलं, ‘माज्या बाजीरावाला तुज्या भाचीशी लगीन करायचं हाय. पैक्याबियक्याची काय चिंता करायची न्हाय. निस्ती पोरगी दिली तरी झालं. लौकरात लौकर बार उडवून द्यायचा.’
बा ‘व्हय जी, व्हय जी’ येवडच बोलत व्हता.
‘पाटलीन बाई, द्या त्ये शकुनाचं लुगडं आन चला.’ पाटील आत बसलेल्या पाटलीन बाईला बोलला. पाटलीन कुंकवाचा करंडा उगडनार, तेवड्यात माय बोलली, ‘बाई, जरा दमानं घ्या. पोरीला बरं न्हाय लागत आज. तापानं फनफनून पडलिया.’ मी आन आक्का तवा सौदावर बसून उन खात चमेलीचे गजरे गुंफीत व्हतो. आमी कुनालाबी दिसत न्हवतो, पन आमाला समदं ऐकाया येत व्हतं. मायचं बोलन ऐकून आमी दोग बी हातावर टाळी दिऊन खुसुखुसू हासत बसलो. पाटलीन बिचारी, मुस्काडीत दिल्यावानी दबल्या आवाजात मायला म्हनाली, ‘येवड लुगडं र्‍हाऊ द्या. नायतर पाटील माजा जीव खाईल.’
मायनं ते लुगडं घेतलं, पाटलीन बाईला कुंकू लावलं आन दिलं वाटे लावून.

मला नवल वाटलं मायचं. आजवर घरात आलेलं कुनी बी बिना च्याचं गेलं न्हाई, पन मायनं पाटलाला पानी बी दिलं न्हवतं. कायतरी गडबड व्हती नक्कीच.
‘रंगू गं, पाटलीन बाई व्हनार तुजी पोर. नशीब कहाडलं पोरीनं.’ बा लई खूष व्हऊन आत येत म्हनाला. ‘व्हय की, नशीब कहाडलं! आवं, त्यो माजलेला डुक्कर बाज्या, तीन बायका केल्या मेल्यानं. दोन मारल्या, येक पळून गेली. त्येच्या पदरात ह्ये नक्षत्र घालू व्हय मी? त्या मुर्दाडाला देन्यापरीस वेशीवरच्या हिरीत का नाय ढकलत पोरीला? काई लाज तुमाला? खुशाल बेंडबाजा लावाया निगाले!’ माजी माय येकदा बोलायला लागली की झालं!
‘मग काय, जलमभर कुवारीन पोसतीस काय तिला? कुटतरी उजवायचीच न्हवं? मग हितं नदरेम्होर तर र्‍हाईल.’ बा जरा जोरात बोलला, तशी माय चवताळली.
‘व्हय, नदरेम्होर र्‍हाईल आन आमी तिचे धिंडवडे बगू उगड्या डोळ्यांनी. काय म्हनावं काय तुमाला? काय आंतर हाय तुमच्यात आन तिच्या काकात? त्ये पैक्यासाटी तिला सावकाराला इकत व्हते आन तुमी पाटलाला! पोटची पोर असती तर दिली असती का त्या लांडग्याला? पाटीला पाट लावून आलेल्या भैनीची पोर न्हवं ती? मंग जरा भलं तर बोला तिच्याबद्दल.’
‘व्हय, व्हय. समदी काळजी तुलाच हाय. आगं, गावात र्‍हायाचं तर पाटलाशी वैर घिऊन चालंल का? आन त्यो काय गप र्‍हानार हाय?’
बानं जरा तोंड उगडायचा अवकाश, की माय सटपटली, ‘म्हनून द्या तिचा बळी. काय मानूस हाय का राकूस? तुमी गपगुमान र्‍हावा. मी बगते काय करायचं त्ये. फकस्त त्येच्या हो ला हो म्हना, बाकी काय सबूद बिबूद दिऊन आन त्येचं काय घिऊन श्यानपना नका करू.’ मायनं बाला धमकीच दिली. मला खुसूखुसू हसू येत व्हतं. आत्ती डोळे गाळीत व्हती आन आक्का बिचारी गुमान बसली व्हती.

संध्याकाळी पाटलाच्या वाड्यावरनं धोंडीमामा आला. माय त्येला लहानपनापसून भाऊबीजंला ववाळीत व्हती. आल्याआल्या मायनं त्येची भादरलीच. ‘काय त्वांड घिऊन आलास बाबा भैनीकडं? त्या मुर्दाडाचा सांगावा आनला आसशील कायतरी. कसले मर्द रे तुमी? गावात तरन्याताट्या पोरींनी र्‍हावं कसं तुमच्या भरोशावर? त्या ४० वर्साच्या भित्ताडाला ही १८ वर्साची पोर पायजे काय पाट लावायला? मुडदा बशिवला त्येचा!’
धोंडीमामा धांदरूनच गेला मायचं बोलणं ऐकून. ‘आग चंपाक्का, तू कशाला काळजी करतीस? आगं, खुद त्या पाटलीन बाईला बी नगं हाय ह्ये लगीन. ती बी वळकून हाय बापलेकाला. पन तीबी मजबूर हाय. मी तर त्येचा गडी, सांगल ते काम मला करावं तर लागील. पन मला बी समजत न्हवं काय वंगाळ आन काय चांगलं हाय त्ये. तू बिनघोर र्‍हा. तुज्या चंद्राला तिच्या तोलाचा नवरा मिळवून दिऊ आपन. मग तर झालं? आता ऐक, पाटील उद्या सक्काळीच मुहूर्त काडायला आन कापड खरेदीला जातोय तालुक्याला. पोरीला आन तिच्या मायला घिऊ म्हनत व्हता बाज्या. म्हनून मला लावून दिलं तुज्याकडं. काय सांगायचं ते ठरीव, म्हंजे वायलं वायलं नग व्हायला दोगांच.’ त्यो बोलला.
‘कालच पाटलीन बाईला बोलले हाय मी. तिला फकस्त येवड सांग की पोरगी आजून तापलेलीच हाय.’ मायनं त्येला सांगितलं आन तवर चंद्राक्का तेच्यासाटी च्या घिऊन आली. ‘बग, कशी गुनाची हाय पोर.’ मायनं कवतिकानं आक्काकडं बगितलं आन कानशिलावरून बोटं मोडली. दुसर्‍या दिवशी मी शाळेतून आलो, तर माय मळ्यात गेली न्हवती, घरीच व्हती. माजं जेवन झालं तशी मला बोलली, ‘जा आक्कीसोबत जरा.’
मी निगालो उड्या मारतच. मला आक्कासोबत जायला लई बरं वाटायचं. आक्का वाटेनं जाताना मस्त गोष्टी सांगायची रामाच्या, कृष्णाच्या. आक्का निगाली. तिच्या पायात चप्पल न्हवती. मी तिला इच्यारलं, तर ती बोलली, ‘पुजेला जायचंय.’ मग मी बी चपला काडून फेकल्या आन निगालो. आज आक्का गप्पच व्हती. मीच तिला गुरुजीच्या गमती सांगत व्हतो. आमी दोग हाडळीच्या माळावर आलो. आक्कानं बरोबर आनलेल्या थैलीतनं येक दिवा, तेलाची बाटली, हळदकुंकू काडलं, चिंचेच्या झाडाखाली येका जागेवर दिवा लावला, हळदकुंकू वाहून डोकं टेकवलं आन मनातल्या मनात काय मागितलं म्हाईत न्हाई, पन लई येळ तशीच बसून र्‍हाइली. मग मी बी हात जोडले, डोकं टेकवलं आन मनात म्हनलं, ‘हितं जो कुनी देव/देवी आसल, त्यानं माज्या आक्काला सांबाळा!’
आमी दोग घरी निगालो, तवा मी आक्काला इचारलं, ‘आक्का, हितं कुटला देव हाय ग?’ ती बोलली, ‘देव न्हाय, देवी हाय हितं. छबूदेवी.’
मी तर पैल्यांदा ऐकत व्हतो हे नाव. पन तिची गोष्ट आक्काला बी माहीत न्हवती. आमी दोग घरी आलो, आनि रात्री धोंडीमामा सांगत आला की पाटलाला तालुक्याला गेल्याबराबर तरास झाला, त्येच्या डाव्या आंगावरून वारं गेलं आन त्येला तितंच भरती केलं इस्पितळात. आता कमीत कमी आट दिवस तरी त्यो गावाकडं येनार न्हवता. मायनं पहिला डाव जितला व्हता. मी आन आक्का रोज दुपारी माळावर जाऊन पुजा करून येत व्हतो चिंचेखाली. आट दिवसांनी पाटलाचा मुडदाच आला तालुक्यावरनं. तालुक्याच्या डागदरानं लई इलाज केले पन कशाचाबी गुन आला न्हाई आन पाटील तितंच मेला. आता आमी आजून निकाळजी झालो. पाटलाचे दिवस हुईस्तवर तरी काय हालचाल व्हनार न्हवती. पन जसे पाटलाचे दिवस झाले आन तेरवीचं जेवन झालं तसा बाजीराव पिसाळला. रोजचं सकाळच्या पारीच कायतरी निमित करून घराकडं येऊ लागला, साकरपुडा कवा करायचा, काय काय घ्यायचं, आस कायबाय बासोबत बोलत बसू लागला. त्येला येकदा बी पानी न्हाई पाजलं तरी हलायचं नाव नाय घ्यायचा. मी शाळला निगालो की, ‘काय म्हेवनं, काय म्हन्तीया शाळा?’ आस म्हनून सोताच मोटमोट्यानं खिंकाळायचा. मी लई चिडत व्हतो, पन आक्कासाटी गप र्‍हात व्हतो.
येक डाव माय बोलली बी, ‘आवं बाजीराव, जरा बापाला जाग्यावर तर जाऊ द्या. सवा म्हैना तर व्हऊ द्या.’
तर निलाजरा बोलला, ‘आत्याबाय, त्यो गेला जाग्यावर मेला त्या दिशीच. आता कुटवर थांबू मी?’ आन तंबाकूचे पिवळे किडके दात दावत ख्या ख्या करून हसत र्‍हायला.

हिकडं धोंडीमामा पाटलाच्या कामात आपलं काम काडून घ्यायच्या मागं लागला व्हता. तालुक्याच्या शाळेतला येक चांगला मास्तर त्यानं आक्कासाटी बगितला व्हता, त्येला समदी कल्पना दिली व्हती. आक्काला तालुक्याला न्यायचं आन तिकडच लगीन लावून द्यायचं आसं कायतरी घाटत व्हतं पन बाजीराव लई वंगाळ व्हता. तो आडवा आलाच आसता. त्या दिवशी मी आन आक्का पुजेला गेलो तवा बाजीराव जीप घिऊन तालुक्याला चालला व्हता साकरपुड्याची अंगटी आन आजून काय काय आनायला. आमी परत येताना त्यो दिसला, त्यानं जीप आमच्याकडं वळवली, पन ती आपसूकच चिंचेकडं खेचली जाऊ लागली. त्येला काय बी कळना. त्यो लई कोशीस करीत व्हता आमच्याकडं यायची, पन सगळंच कायतरी येगळं घडत व्हतं. कायतरी जादू व्हावी तसा तो गाडीतून उडून त्या चिंचेच्या झाडाखाली जाऊन पडला आन येड्यावानी हातपाय झाडू लागला. किंचाळू लागला. समदा गाव गोळा झाला तितं लगोलग. आपापच तो चिंचेच्या वरच्या फांदीवर लटकला. समदे डोळे फाडफाडून त्यो तमाशा बगत व्हते. कुनालाच कळत न्हवतं काय चाललं हाय ते. येकदम बाज्याचा आवाज आला, ‘सोड छबू मला. चुकलो मी. मापी कर येक डाव.’ येकदम कुनीतरी उचलून आपटल्यावानी तो पार चिंचेच्या वरच्या फांदीवरनं खाली आपटला. आन इवळत तितंच पडला. त्येला हात लावायची कुनाकुनाची हिम्मत न्हाई झाली. समदे तितून आल्या पावली माघारी जाऊन बसले. रातच्याला धोंडीमामा सांगत आला की बाज्या कसातरी खुरडत खुरडत तितून घरापतोर आला आन मेल्यावानी पडला. पन सारकं सारकं ‘छबू, मला सोड, न्हायतर मारून तरी टाक. आसा छळून जीव घिऊ नकोस. मी तुज्या पाया पडतो’ आस कायबाय बरळत व्हता.

आत्तीनं मायला इच्यारलं, ‘कोन व्हय ग ही छबू? ती का बाज्याच्या मागं लागली हाय? बायकू व्हती का त्येची? कशानं मेली का मारलं त्यानं? आन ती चिंच बी कशानं सुकली येकायेकी?’

मग मायनं तिची गोष्ट सांगितली. मी येक वर्साचा व्हतो, तवा गावात जे झालं तीच ही गोष्ट व्हती. लाखा डोंबारी आन त्येची पोरगी गावोगाव ख्येळ करून पोट भरायचे. तो आला व्हता गावात आपला ख्येळ घिऊन. त्येची पोर दोरावर चालायची, आनखी काय काय कसरतीचे ख्येळ करायची. १० वर्साची व्हती पन बिजलीवानी लवायची म्हने. तीच छबू. चार दिवस ख्येळ झाले, समद्या गावानं गर्दी करू करू ख्येळ बगितले. येक दिवस पोलीस आले तालुक्यावरून गाडी घिऊन आन लाखाला धरून न्हेलं पाटलाकडं चोरी केली म्हनून. रडत रडत त्येच्या मागं चाललेल्या छबूला बाज्यान पकडलं आन ह्या चिंचेखाली आनलं. दुसर्‍या दिवशी समद्या गावानं पाहिलं, तर हिरवीगार चिंच पार सुकली व्हती आन छबूचा काई ठावठिकाना न्हवता. गावात कुनी पाटलाच्या इरोदात जायची हिंमत केली न्हाई, कुनी उगड काय बी बोललं न्हाई. पन काय घडलं आसल हे समद्यांना कळलं व्हतं.

सकाळी उटल्याबरोबर धोंडीमामा धावतच येताना दिसला. आला, तसा त्यो मायला म्हनाला, ‘चंपाक्का, गेली ग तुजी साडेसाती. मेला बग बाज्या रातीच. आता बिनघोर लगीन लाव चंद्राचं आपल्या दारातच.’ माय चंद्राक्काला बोलली, ‘जा पोरी, त्या देवीला दिवा लावून ये जा. तुजी पिडा टाळली तिनं.’ मी आन आक्का गेलो, दिवा लावला, पाया पडलो आन येकदम मी बगितलं, तर येक बारीकसा कोंब फुटत व्हता त्या लाकडावर! गावावरची बिलामत टळली व्हती. मी धावत धावत जाऊन मायला सांगितलं. माय, बा, आत्ती, धोंडीमामा आन गावातल्या समद्यांनी त्यो चमत्कार उगड्या डोळ्यांनी बगितला. माय, बा, आत्ती आक्काला घिऊन पाटलीनबाईला भेटायला गेले. मायनं जाताना आक्कासाटी पाटलीन बाईनं दिलेलं लुगडं बी नेलं. पाटलीनबाईनं मायला सांगितलं, ‘माज्याकडून चंद्राला नेशीव बाई ते लग्नासाटी. नशीब चांगलं तुज्या पोरीचं रंगू, म्हनून वाचली ती या पाटलांच्या तावडीतनं. मी बाईमानूस, गुलामच व्हते ग बाई त्या बापलेकाची. चुकीचं आसून बी करावं लागलं मला समदं. आता देवानंच केली माजी सुटका. चंद्रा, जा माय, सुकाचा संसार कर. चांगला हाय ग त्यो मास्तर. धोंडीबानं दावला मला. तुला शिकवतो म्हनाला हाय त्यो, मास्तरीन करीन म्हनत व्हता. लई सुकात ठेवील तुला.’

धोंडीमामानं मायला सांगितलं की थोरला पाटील जवा इस्पितळात व्हता, तवाच येकदा येळ साधून त्येनं मास्तरांची पाटलीन बाईशी भेट करून दिल्ती. तिला बी घोर व्हता आक्काचा. ती धोंडीमामाला सारकी म्हनायची की पोरगी नक्षत्र हाय, बाज्यापासून वाचली पायजेल आन चांगल्या घरात पडली पायजेल.

ह्ये समदं घडून गेल्यावर धा-बारा दिसांनी धोंडीमामा मास्तरांना घरी घिऊन आला. आयायो, इतका लहान मास्तर! मी तर आमच्या शाळेत असले मास्तर कवाच पाहिले न्हवते. हे तर येकदम सिनिमातल्या हिरोवानी दिसनारे व्हते. मला तर लई आवडले माजे भावजी. चंद्राक्काला इचारलं मायनं ‘का ग पोरी, हाय का पसंत ह्यो नवरा?’ तर ती झ्याकपैकी लाजली न घरात पळाली. आटच दिवसांत दारात मांडव घातला, लई धामधुमीत आक्काच लगीन झालं, पाटलीन बाईनी तिला सोन्याच्या पाटल्या आन बोरमाळ घातली. मायनं बांगड्या, भावजीला साकळी, आंगटी केली. मला बी भावजीनी नवे कपडे आनले. लई झ्याक झालं लगीन. भावजी आन आक्का समद्या थोरांच्या पाया लागले, तवा माय, आत्ती आन पाटलीनबाई तिला मिटी घालघालून रडत व्हत्या. मी बी लई रडलो. धोंडीमामानं पाटलाची घुंगराची गाडी जुंपून आनली आन त्यात बसून माजी आक्का सासरी गेली. मला तर गमतच न्हवतं काय बी. शाळा, मळा, घर, माळ कुटंबी मन लागत न्हवतं.

‘आरं ए बुजगावन्या, कुटं हारवलास? घरी न्हाय जायचं का?’

आक्काचा आवाज खरंच आला? व्हय, खरंच की माजी आक्का आली! कवा बस आली, आन कवा धुरळा उडवीत गेली, कळलं बी न्हाय मला. आयोयो, चिगुरातल्या फुलावानी गुलाबी रंगाचं लुगडं घातल्याली माजी आक्का काय झ्याक दिसतीया, आगदी सिनिमातली नटीच आनि भावजी पन काय दिसत्यात! नदर लागल माजीच! मी आपसूकच कानशिलावर बोटं मोडली आन ती दोगं बी हासू लागली!

‘छबूदेवी, माज्या आक्काला आशीच सुकात ठेव वो माय!’ मी जाताजाता फुलू लागलेल्या चिंचेला हात जोडले, आक्का आन भावजी पन हात जोडून वाकले आन आमी घराकडं निगालो.

लेखिका: क्रांति साडेकर

1 टिप्पणी:

अमित दत्तात्रय गुहागरकर म्हणाले...

भयंकर सुंदर कथा !

ग्रामीण बाजीच्या कथा हल्ली क्वचितच वाचायला मिळतात.