गुरु: ब्रह्मा गुरु: विष्णू गुरु: देवो महेश्वरा!
गुरु: साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः!!
आपल्या आयुष्यात गुरुंचं स्थान किती आहे हे तुम्हाला सगळ्यांना सांगायची गरज नाहीये. आपल्या आयुष्यात प्रत्येकजण काही ना काही तरी शिकवून जात असतो. तसा साधा विचार करायला गेलं...समजा आपण पुणे मुंबई असा प्रवास जरी केला तरी तो खूप शिकवून जातो. प्रवास करणारी माणसं, आपल्या सोबत प्रवास करणारा तो निसर्ग,तो प्रत्येक पक्षी जो आपल्याला काहीतरी शिकवून जात असतो. समुद्राच्या काठावर जर तुम्ही शांत डोळे मिटून उभे राहीलात तर तो देखील आपल्याला काहीतरी शिकवत असतो. अशा वेळेस पहिल्यांदा आठवण येते ती आईची, आई जगातील सर्वोत्तम विद्यापीठ. जिच्या हाताला धरून आपण चालायला शिकलो,जिचे अमृततुल्य शब्द ऐकून ऐकून आपल्याला भाषेची ओळख झाली. अस म्हणतात की देवाला प्रत्येकाकडे लक्ष देणं शक्य नव्हतं म्हणून त्याने आई बनवली. खरंच.. आई....या दोनच अक्षरात किती मोठा अर्थ दडलेला आहे..
आई तर पहिली गुरु असतेच आपली पण अजून ही काही लोक असे असतात जे की आपल्या आयुष्याला कलाटणी देऊन जातात. ते म्हणजे आपले ५ ते १० वीचे वर्गशिक्षक आणि मित्र जे की आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे ते ठरवून जातात. आपल्या चुका, आपल्यातली हुशारी सगळे ते जज करतात. कधी चुकलं काही तर मारतात ही खूप, आणि तेवढीच माया ही करतात. मला अजूनही माझे सगळे वर्ग शिक्षक आणि सगळे मित्र आठवतात . एक तर मी ४थीपर्यंत कधीच शाळेत गेलो नाही.... :). शाळेत गेलो ते पाचवीपासून. त्यावेळी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा वर्ग शिक्षक म्हणून आले ते शेख सर....
पाचवी सुरू झाली आणि इंग्रजी हा विषय आला. तसा हा फार नवीन विषय. खूप भीती वाटायची या विषयाची. पण त्या सरांनी कधीच भीती घातली नाही त्या विषयाची किंवा कधी घाबरूही दिले नाही. मला अजूनही आठवतंय की त्यांनी एक दंडक घातला होता, दररोज २० शब्द द्यायचे ते पाठ करायला. आणि दुसर्या दिवशी तेच प्रश्न विचारायचे आणि ते नाही जमले तर कोंबडा बनायला लावायचे.... दुर्दैवाने मी वर्षभर फक्त कोंबडेच केले. आता त्याचं खूप दुःख होत आहे. पाठ केले असते तर आज मी अजूनही फार पुढे असलो असतो. मला अजूनही आठवतंय मी एकदा पाचवीला असताना सगळी मोठी माणसे गुटखा खातात म्हणून मी आणि माझ्या कंपूने मिनी का कुठली तरी पुडी होती ती खाल्ली होती. ती चूक कशी काय माहीत नाही पण आमच्या शेख सरांना कळली. त्यांनी माझ्या एकच कानाखाली मारली होती ती इतकी होती की माझ्या ओठातनं रक्त यायला लागलं होतं. आणि त्यांनी सगळ्या वर्गासमोर शपथ घ्यायला लावली की परत पुडी खाणार नाही. ती शपथ आणि चापट अजून काम करते आहे. आयुष्यात मी कधीही पुडी नावाचा प्रकार खाल्ला नाही. छोटाच प्रसंग आहे पण त्या वेळेस जर सरांनी मारलं नसतं तर पुडीबहाद्दर झालो असतो मी. :)
६वीला गेलो. त्यावेळेस एक नवीनच सर आले होते...स्वामी सर.ते ATD झालेले होते आणि चित्रकला हा विषय शिकवायचे, सोबतच विज्ञान शिकवायचे. त्यांनी विज्ञानातले सगळे कंसेप्ट असे काही क्लियर केले की त्या वेळेस माझ्या वर्गात सगळ्यात जास्त मार्क मला विज्ञानात होते. चित्रकला तर फारच सुंदर शिकवायचे. त्यावेळेस चित्रकलेचा त्यांनीच मला छंद लावला होता. त्यांच्या सुदैवाने आणि माझ्या दुर्दैवाने मी कधीच चांगले चित्र काढू शकलो नाही. मला अजूनही आठवतंय...विज्ञान विषयात जर काही चुकले तर ते फक्त कान पिळायचे. मी एकदा मित्राच्या वहीतले जोड पान चोरून घेतले होते ते त्यांनी बघितले.. त्यावेळेस काहीच बोलले नाहीत पण दुसर्या दिवशी प्रार्थनेच्यावेळी समोर बोलावून सगळ्यांना सांगितले की याने चोरी केली आहे.. बस! आणि नंतर जागेवर जाऊन बस म्हणाले. त्यावेळेस सगळ्या शाळेतल्या मुलांनी ज्या नजरेने माझ्याकडे पाहिले ती नजर मला आजही नकोशी वाटते आणि आत्ता आठवले आहे तर अजूनही मनात लाज वाटते...त्यावेळेपासून मी कधी चार आण्याची सुद्धा चोरी केली नाही..
पुढे सातवीला शाळेचे हेड मास्तर कांबळेसर आमचे वर्गशिक्षक होते. तेही इंग्रजी शिकवायचे. त्यांची एक सवय होती, एकदाच यायचे १५ दिवसातून आणि हातावर छड्या मारून जायचे. ते खूप कडक होते पण त्यांची फार विशेष माया होती आमच्या तिघांवर. आम्ही तिघे म्हणजे मी, अभय, रघुवीर. त्यांच्याकडून एकच शिकण्यासारखे होते... मॅनेजमेंट. खरंच, तुम्हाला सांगतो आमच्या शाळेत फक्त ६ वर्ग होते. सगळ्या वर्गांवर फक्त टीनचे पत्रे होते. तेही फुटके. पावसाळ्यात ते फार गळायचे आणि आम्ही ते सांगायला गेल्यावर त्यांच्या डोळ्यात अगतिकता दिसायची. काहीच करू शकत नसल्याची. कारण त्यावेळेस शाळेला ग्रांट नव्हती. पण त्यांतूनही जे काही होईल ते ते आम्हाला देण्याचा प्रयत्न करायचे. आता तर शाळेची खूप चांगली इमारत झाली आहे.. ते अजूनही बोलावतात शाळेत,आणि प्रत्येक वेळेस शाळेची इमारत बघताना किंवा आम्हाला दाखवतांना त्यांच्या डोळ्यातला अभिमान बघण्यासारखा असतो. ते त्या शाळेचे खर्या अर्थाने पालक होते.
पाटील सर आमचे वर्ग शिक्षक म्हणून आले ते आठवीला. पाटील सर हे पीटीचे सर होते.गावकर्यांचं आणि शाळेचं सगळ्यात आवडतं व्यक्तिमत्त्व. सगळ्या मुलांवर स्वतःच्या मुलासारखं प्रेम करणारे. त्यांचे सगळ्यात आवडते मूल असायचे ते वर्गातले ढ विद्यार्थी. माझा जन्म झाल्यापासून ते मला पाहत होते आणि शाळेसमोरच आमचे घर असल्यामुळे लहानपणी त्यांनी मला खेळवलेलं आहे.. माझ्या मोठ्या भावाल ते ज्येष्ठा जावई म्हणायचे. मला लहानपणापासून अंगाखांद्यावर खेळवल्यामुळे ते माझे खूप खूप लाड करायचे. इतके, की शाळेमध्ये ज्यावेळी ( MCC) महाराष्ट्र छात्र सेना आली, जी फक्त ९वीसाठी होती. त्यावेळी त्यात मला त्यांनी घेतलं होतं ते फक्त माझ्या हट्टासाठी. मी दोन वर्ष मिलिटरी ट्रेनिंग घेतली ८वी आणि ९वी . त्यांना खोटं बोललेलं कधीच आवडत नव्हतं. सदैव खरं बोलावं असा त्यांचा आग्रह असायचा. माझ्यासमोर माझ्या मित्राला त्यांनी इतका मारला होता की त्यावेळेपासून मी १०वीपर्यंत तरी कधी खोटं बोललो नसेन. आता कधी कधी बोलावं लागतं आणि ज्यावेळेस बोलतो त्यावेळी त्यांच्या माराची फार आठवण होते.
९वी. बोराडे सर म्हणून होते. खूप छान मराठी शिकवायचे. खूप भावनिक होते. त्यांचा एकच रूल असायचा. गृहपाठ तुम्ही स्वतः दिलेल्या वेळेत पूर्णं करायचा. ह्यांतून त्यांनी हे शिकवले की स्वत:च्या शब्दाचा स्वत:च मान ठेवला तरच दुसरे देखील आपल्या शब्दाचा मान ठेवतात. नाहीतर जगात तुम्ही कितीही ओरडून शब्द दिलेत आणि स्वत:च पाळले नाहीत तर कोणी तुमचं ऐकत नाही. हे सगळं शिकवण्यासाठी त्यांनी एकच प्रथा पाडली होती की गृहपाठ कधी पूर्णं करणार हे आम्हीच सांगणार आणि त्यादिवशी जर गृहपाठ पूर्णं नाही केला तर मग त्याच्यासारखं कोणीच मारत नव्हतं शाळेत...
१०वी बिंदू मॅडम.... ह्यांचे खूप खूप, अनंत उपकार आहेत आमच्या चौघांवर. (मी, अभय, रघु, आणी सीमा) आम्ही १०वीला आल्यावर, आम्ही चौघे जरा जास्त हुशार होतो( असं मॅम म्हणायच्या) आम्ही ११वी सायन्स घ्यावं आणी इंजीनियर व्हावं ही त्यांची इच्छा होती. आम्ही इंग्रजी आणि विज्ञान विषयात कमी पडू नये म्हणून त्या माजलगाववरून सकाळी ७च्या बसला यायच्या. किती ते कष्ट घेतलेत त्यांनी आमच्यासाठी. सकाळी सात ते संध्याकाळी ५ पर्यंत त्यांचं आमच्यावर लक्ष असायचं..त्यांनी इंग्रजीच ग्रामर इतकं पक्कं करून घेतलं होती की विचारायची सोय नाही. मला १०वीला विज्ञान विषयात १५० पैकी १३६ मार्क आहेत. ते फक्त त्यांच्यामुळेच. अजूनही त्या सकाळी ८च्या गाडीने माजलगाववरून मंजरथला फक्त १०वीच्या वर्गासाठी जातात आणि हे सगळं त्या कोणतीही अपेक्षा ठेवून करत नाहीत. आजपर्यंत माझं बर्याच जणांनी कौतुक केलं आहे पण माजी विद्यार्थ्यांच्या संमेलनात त्यांनी माझं जे कौतुक केलं ते मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही......
हे सगळं झालं शाळेतलं, अभ्यासातलं! पण मित्रही खूप काही शिकवून जातात. त्यापैकी एक म्हणजे बाबासाहेब कोळेकर.. तो ही माझ्या आयुष्यातला गुरु आहे. त्यानेच मला पोहणे शिकवले. आता गोदावरी नदीला महापूर आला की त्यात उडी मारून धारेला लागण्याचा जो कॉनफीडन्स आहे तो त्याच्यामुळेच......आणि अजून एक विसरलो होतोच सांगायला...त्यानेच मला मधमाश्यांचं पोळं कसं काढायचं ते शिकवलं होतं. त्या नॉलेजवर मी आजपर्यंत खूप खूप ताजा मध खाल्ला आहे..
अभयकडून संयम नावाची गोष्ट शिकायला मिळाली आणि आयुष्यातला सगळ्यात मोठा धडा. विचार केल्याशिवाय काहीच बोलू अथवा कृती करू नये. बर्याच वेळेस असं होतं की मी रागाच्या भरात कधी तरी काही तरी चुकीचं बोलून जातो आणि परत सॉरी म्हणतो अश्या वेळेस अभय ने खूप समजून सांगितले आहे. आणि त्याच्या या समजून सांगण्यामुळे मी आज माझ्या रागावर कंट्रोल ठेवू शकतो.
कष्ट करण्याची उमेद मी दोन व्यक्तींकडून घेतली, ती म्हणजे रघुवीर आणि सचिन. आयुष्यात कितीही कठीण वेळ आली तरी देखील न डगमगता, न कंटाळा करता आपले काम प्रामाणिकपणे करत जायचे. त्या कष्टांचं कधी ना कधी चीज होतं हे ह्या दोघांकडे पाहिल्यावर कळतं. बर्याचदा असं झालं आहे की मी माझ्या आयुष्यात कुठे कमी पडलो आणि मला यश नाही मिळालं तर फार उदास व्हायचो. पण ह्या दोघांनी मला खरंच खूप छान समजून सांगून डिप्रेशनमधनं बाहेर काढलं आहे.
अजून एक गुरु विसरलोच होतो तो गुरु म्हणजे मायबोली.कॉम. ह्या एकाच साईटमुळे मला लिहायचा छंद लागला. कदाचित मी अजूनही तसाच राहिलो असतो काहीही न लिहिता, मनातल्या भावना तश्याच मनात ठेवत, पण खरंच मायबोलीवर असलेल्या लोकांकडून बर्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या, बरंच काही वाचायला मिळालं, मायबोलीकरांमुळेच मी माझ्या लेखनातील चुका काढायला शिकलो. आणि माझ्या मनातल्या भावना शब्दरूपात मांडायला शिकलो. खूप खूप आभारी आहे मायबोली.कॉमच्या ऍडमिनचा.
तसं सांगायला गेलं तर प्रत्येकजण काही ना काही मला शिकवून गेलेत सगळेच लिहिणं शक्य नाहीये. तरी पण त्यातल्या त्यात , माझी आजी, माझे बाबा, B.Sc.चे कुलकर्णी सर, पपा, माझी कॉर्पोरेट क्षेत्रातली पहिली बॉस जोशी मॅडम, ह्या नवीन कंपनीतले सगळे बॉस आणि माझे कलीग...ह्या प्रत्येकाकडून काही ना काही शिकतच आहे... ह्या सगळ्यांचे माझ्यावर एवढे उपकार आहेत की ह्या सगळ्यांमुळे मी आज माझ्या स्वतःच्या पायावर उभा आहे...आयुष्यभर ह्यांचे उपकार कधीच विसरू शकत नाही....
हा लेख त्या सगळ्यांना समर्पित ज्यांच्या मुळे मी घडलो, मी सुधारलो, आज लाईफमध्ये काही ना काही चांगले करण्याचा प्रयत्न करत आहे....
लेखक: किशोर करंजकर
1 टिप्पणी:
छान. साध्यासोप्या सरळ पण ओघवत्या भाषेतले कथन आवडले.स्मरणरंजन सुसंगत आहे. मुख्य म्हणजे स्मरणरंजनात विषयांतर अजिबात झालेले नाही. आपल्या कृतज्ञ वृत्तीला मुजरा करतो.
टिप्पणी पोस्ट करा