काही किस्से!



माणूस हा किस्सेबाज असतो. त्याला किस्से ऐकायला, सांगायला फार आवडते. अरे हो, पण ते किस्से झाल्याशिवाय कसे ऐकणार, सांगणार? मग ते किस्से करणे हेही त्याचे आवडते काम बनले. असंख्य किस्से आपल्या आजूबाजूला घडत असतात. काही किस्से आपण घडताना प्रत्यक्ष पाहतो. तर बरेचसे ऐकीव असतात. मी आज तुम्हाला काही किस्से सांगणार आहेदारू किस्से. सगळे मी प्रत्यक्ष अनुभवलेले तर काही मी स्वतः केलेले. पण हे सगळे किस्से घडतात अजाणतेपणी. कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी त्याची पूर्ण माहिती करून घेणे किती आवश्यक असते हे कळेल हे किस्से वाचून. चला तर मग बघूयात काही दारू किस्से...


एकदा मी गावी गेलो होतो. माझ्या मामाचा मित्र मला त्याच्या घरी घेऊन गेला. माझ्याकडे परदेशी दारूच्या बाटल्या असतात ह्याचे त्याला खूप कौतुक होते. घरी नेऊन माझ्यासमोर एक खंबा ठेवला आणि म्हणाला “इंग्लिश आहेमामाची काळजी करू नको. जेवायची वेळ होते आहेताट-पाणी घेताहेतचल थोडीशी घेऊ”. एवढे बोलून त्याने स्टीलचे दोन ग्लास आणि दोन पाण्याचे तांबे टेबलावर ठेवले. खंबा उघडून दोन्ही स्टीलचे ग्लास अर्धे - अर्धे भरले आणि उरलेल्या जागेत पाणी टाकून ग्लास भरले. एक ग्लास माझ्या हातात देऊन म्हणाला, “चियर्सविंजीनेरसाहेब”. आणि पुढे काही कळायच्या आत घटाघट तो ग्लास गटकावुन मोकळा झाला.  मी आपला एक एक सीप घ्यायला लागलो तर म्हणाला, “अरे उरक लवकरहे काय मुळूमुळू पितोहेस लहान पोरांनी दुदु प्यायल्यासारखे”. काय बोलावे ह्याचा विचार करेपर्यंत त्याने त्याचा दुसरा ग्लास भरला आणि मला काही समजायच्या आत गट्ट्म करून खाली ठेवला. "काय मटणाचा मस्त वास सुटलाय रेउरक की लवकर" असे म्हणत तिसरा ग्लास भरला आणि संपवलासुद्धा. आता त्याचे डोळे तांबारले आणि माझे मात्र पांढरे व्हायची वेळ आली होती.  असले रोमनाळदांडगट किस्से गावोगावी असेच होत असतात.


खेडेगावातच असे किस्से होतात असे नाही. उच्चभ्रू आणि शहरी वातावरणातही असे किस्से होतच असतात, खास 'सोफिस्टीकेटेडटच असतो त्याला. एका उच्चभ्रूगर्भश्रीमंत महाशयांच्या 'पेंट हाउसमध्ये जाण्याचा योग आला. अशीच दारूवर चर्चा सुरू झाली आणि विषय ब्रॅन्डीवर आला. त्यांच्यामते ब्रॅन्डी हा प्रकार 'डाउन मार्केटअसतो. ते हे सांगत असताना मागे त्यांच्या कपाटात कोन्यॅक दिसली. मी एकदम चमकून त्यांना हे काय विचारले तर त्यांनी खुशीत येऊन त्यांनी ती बाटली फ्रान्स वरून आणली असे सांगितले. मग त्यांना विचारले, “आता तर म्हणालात की  ब्रॅन्डी डाउन मार्केट आहे मग ही बाटली कशी काय?” तर त्यांनी हसत हसत उत्तर दिले अरे ही कोग्नक  आहेफ्रान्स एअरपोर्ट वर एका सेल्सगर्लने सजेस्ट केली. मोठी गोड होती रे मुलगी”. मी त्यावर काय बोलणार कपाळ. त्यांना कोन्यॅकचा उच्चारही धड करत येत नव्हता आणि ती एक ब्रॅन्डी आहे हेही त्यांच्या गावी नव्हते. थोडी-थोडी घेणार का असे त्यांनी विचारले. नाही म्हणण्याचे पातक तर माझ्याकडून घडणे शक्यच नाही. मी हो म्हटल्यावर त्यांनी नोकराला सांगून टेबल लावायला सांगितले. कपाटातून त्यांनी सिगारचे पाकीट काढले तेही क्युबन. ते बघून मी त्यांना माफ करून टाकलेमाझा एकदम त्यांच्या विषयीचा आदर वाढलापण क्षणभरच. लगेच ते म्हणाले  त्या एअरपोर्टच्या छोकरीने सांगितले कोग्नक  बरोबर हा सिगार मस्त लागतोकाय गोड हसायची रे ती मुलगी”. मी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. टेबलवर बसलो तर ब्रॅन्डी बरोबर कोका - कोला. राग गिळून त्यांना म्हटले, “मला कोक नको मी तशीच  घेईन”. तर भूत बघितल्यासारखा चेहरा झाला त्यांचा. त्यांनी सिगार पेटवून एक झुरका मारला आणि चक्क 'इन-हेलकेलाते बघून मला त्यांच्या त्या पेंट हाउसवरून खाली उडी मारावीशी वाटली आणि पुढ्यातली कोग्नक  प्यायची इच्छाही मेली. 'मोर नाचते म्हणून लांडोर नाचतेअसले हे उच्चभ्रू प्रकार बर्‍याच पेंट हाउसेस मध्ये होतच असतात.



खरे धमाल किस्से होण्याचे कुरण म्हणजे विमानप्रवासात मिळणारी दारू. एकतर विमानात दारू कितीकशीकोणती मागावी  ह्याचा संकोच माणसाला खूप नर्व्हस करतो. त्यात सतत हसणार्‍या हवाइसुंदर्‍यांच्या त्या कृत्रिम वागण्यामुळेही माणूस जरा बावचळून जातो. त्यांच्या  मधाळ पण कृत्रिम हास्यामुळे बर्फासारखा वितळून काही बाही करून जातो आणि मागे उरतात किस्से.


एकदा मी एका प्रवासात माझे अत्यंत आवडते पेय, रेड वाइन मागवली. माझ्या शेजारच्या महाशयांनीही रेड वाइन मागवली. हवाइसुंदरीने ग्लास आणि बाटली दिल्यावर तिच्याकडे त्यांनी बर्फ मागितला आणि ग्लासभर बर्फ घेऊन त्यात बाटलीतील रेड वाइन ओतली. मी हळूच डोळ्याच्या कोपर्‍यातुन हवाइसुंदरीकडे बघितले तर ती निष्काम कर्मयोग्याप्रमाणे, 'अजून काही सर?' असे म्हणत चेहेर्‍यावर तेच कृत्रिम हसू घेऊन पुढे गेली. तिला ह्या असल्या प्रकारांची सवय असावी.

एकदा एका सहप्रवाशाने व्हिस्की आहे का म्हणून विचारले. आहे आणि ती पण ब्लॅक लेबल म्हटल्यावर तर गडी एकदम खूश झाला. हवाइसुंदरीने विचारले,लार्ज ऑर स्मॉल सर”?  “एक्स्ट्रा लार्ज”, शेजारी. तिने ग्लासात बर्फ टाकून व्हिस्की ओतली आणि एन्जॉय युवर ड्रिंक सरम्हणून तेच कृत्रिम हास्य पसरून पुढे गेली.  आता तो 'एक्स्ट्रा लार्ज' असलेला ग्लास बर्फ आणि व्हिस्कीने भरून गेलेला त्यात पाणी टाकायलाही जागा नव्हती. ह्याला काय करावे ते कळेचना. 'नीट' घ्यायची सवय असावी लागते. तशी चव जिभेवर रुळलेली असावी लागते. एक घोट घेतला त्याने तसाच. पण त्याने त्याची झालेली पंचाईत त्याच्या चेहेर्‍यावर लगेच दिसली. तो घोट गिळावा की थुंकावा, आणि थुंकावा तर कुठे? असे भलेथोरले,  'एक्स्ट्रा लार्जप्रश्नचिह्न त्याच्या डोळ्यात उभे होते. कसाबसा त्याने तो घोट तोंड वेडेवाकडे करत गिळला आणि तो उरलेला ग्लास तसाच ठेवून दिला. त्या हवाइसुंदरीच्या नजरेला नजर द्यायची त्याला इतकी चोरी झाली की बिचारा न जेवता तसाच झोपून गेला.
आम जनता जाऊद्या हो, मागे एका मंत्री महोदयांनी असेच विमानात दारू पिऊन तमाशा केला होता. आपण 'चौफुल्याच्या बारीत' बसलेलो नसून विमानात आहोत हेच ते बिचारे विसरून गेले होते.


कामाच्या निमित्ताने मला परदेशी दौरे करावे लागतात. माझ्यासाठी ती पर्वणीच असते.  देशोदेशींची दारू चाखायची आणि घरी घेऊन (विकत हो) यायची संधी मिळते त्यावेळी. अशीच मी एकदा माझ्या मित्रांसाठी टकीला घेऊन आलो.  उत्साहाने त्यांना टकीलाची माहिती दिली. टकीला 'नीट' प्यायची पद्धत समजावून सांगितली (थोडीशी चावट असलेली फ्रेंच पद्धतही सांगितली). त्यावर फक्त एक जण 'नीटटकीला शॉट मारायला तयार झाला.  बाकीच्यांची काही छाती होईन 'नीटशॉट घ्यायची.  त्यांनी चक्क  सोडाकोक मागवून ती टकीला चक्क त्यांतून प्यायली. एकच बाटली आणली म्हणून माझा आणि माझ्या सात पिढ्यांचा उद्धार करून एक व्हिस्कीचा खंबा मागवला.  धरणीमाता दुभंगून मला त्याक्षणी पोटात घेईल तर किती बरेअसे वाटले त्यावेळी.


कॉलेज जीवनात असताना कधीतरी मित्रांबरोबर बियर प्यायला सुरुवात होते, मजे-मजेत. पण त्यावेळी पैश्याची चणचण भयंकर असते. पॉकेट्मनी संपून गेल्यावर बियर प्यायची इच्छा झाल्यावर कशी प्यायची हा मोठा यक्षप्रश्न असतो कॉलेजकुमारांपुढे. मला आणि माझा एका  मित्राला नाही पडायचा  कारण त्या मित्राचा दादा आमचा सीनियर असल्यामुळे त्याच्याबरोबर आम्हाला बियर प्यायला मिळायची.
एकदा त्या  मित्राचे नातेवाईक  मुंबई बघायला  आले होते. योगायोगाने ते त्याला भेटले. गप्पा मारून परत जाताना त्यांनी त्याला 20 रुपयांची नोट दिली. महिनाअखेरीस आख्खे 20 रुपये म्हणजे मज्जाच हो. मग आमचा दोघांचे, ते 20 रुपये बियरवर उडवायचे ठरले. तेव्हा बियर  18 रुपयांना मिळायची. वाइन शॉपमधून बियर आणणे वगैरे गोष्टी  तर या आधी कधीच केल्या नव्हत्या. कसेबसे धाडस करून वाइन शॉप मधून बियर आणली. आख्खी बाटली हाताळणे आणि आता ती संपवणे असली दुहेरी जबाबदारी आम्हाला पार पाडायची होती. ह्याच्या आधी मित्राच्या दादाचे मित्र ग्लास भरून आम्हाला देत असत. आम्ही निमूटपणे तो ग्लास संपवून काहीतरी अचाट काम केले असा आव चेहर्‍यावर आणून त्यांच्यामधून निघून जायचो.
आता ते सर्व सोपस्कार आम्हालाच पार पाडायचे होते आणि तिथेच खरी गोची होती. ती बाटली उघडून  कशी आणि किती बियर ग्लासात ओतायची ह्यावर आमचे एकमत होईन. मी ह्यांआधी माझ्या  मामाला त्याच्या मित्रांबरोबर  दारू पिताना बघितले  होते. ते पाण्यातून घेताना त्यांना बघितल्यामुळे बियर मध्ये पाणी टाकून प्यावी असे माझे मत होते. तर त्याचे मत होते थम्प्स अप टाकून घेतात. मी माझी बाजू वरचढ होण्यासाठी वकिली मुद्दा मांडला, “जर  थम्प्स अप टाकले तर बियर काळी होईल, तुझ्या दादाबरोबर पिताना बियरच रंग पिवळाच होता”. हे त्याला पटले. त्या वरचढ झाल्याच्या खुशीत मला अजून आठवले की कधी कधी मामा  पाण्याऐवजी सोड्यातूनही घ्यायचा. मग मित्राला ते सांगितल्यावर तोही आज  एक भारी अचाट काम करायच्या खुशीत ‘बियर आणि सोडा अशा प्लॅनला झाला. बियर तर आणली होतीच, मित्र लगेच सोडा घेऊन आला. उरलेले 2 रुपयेही सार्थकी लागले.
मग आम्ही दोघांनी ती बियर सोड्यात मिक्स करून प्यायला सुरुवात केली. रंग पिवळाच होता पण चव नेहमीपेक्षा वेगळी लागत होती. अशी चव का लागते असा प्रश्न आम्हा दोघांनाही पडला. एकदाची ती बाटली संपली आणि अचाट काम करून 'सीनियर' झाल्याचा अभिमान उराशी दाटला. पण ते चवीचे कोडे तसेच होते. तो भुंगा काही केल्या पिच्छा सोडेना. मग एकदा परत मित्राच्या दादाबरोबर बसायची संधी मिळाली. तिथे त्याला आणि त्याच्या मित्रांना ती सर्व गोष्ट आम्ही सांगितली. ती ऐकून  सगळेजण येड्यासारखे खो खो हसत सुटले. कितीतरी वेळ ते हसतच होते अगदी डोळ्यात पाणी येईपर्यंत. मग त्यांनी आम्हाला त्या दिवशी व्यवस्थित 'दीक्षा' दिली.  तेव्हा आम्हाला दोघांना कळले की आम्ही कसला किस्सा करून बसलो होतो ते.  त्यानंतर बरेच दिवस कॉलेजमध्ये आम्हाला 'सोडामिक्स' असे नाव पडले होते.

असे बरेच किस्से आहेत, आता एवढेच बस, बाकीचे पुन्हा कधीतरी.

लेखक: ब्रिजेश मराठे

1 टिप्पणी:

chetansubhashgugale म्हणाले...

मूळतः विनोद कळण्याकरिता काही प्राथमिक माहिती असणे गरजेचे असते. ती नसेल तर विनोद समजत नाही. उदाहरणार्थ इथे खाली एक विनोद देतोय तो वाचा.

एका सकाळी जनरल शिफ्ट चालु होण्याच्या सुमारास कंपनीच्या लिफ्टमध्ये धक्का लागण्यावरून दोनजणांची भांडणे होतात. दोघे एकमेकांना ओळखत नसतात; फक्त कंपनीच्या प्रिमायसेस मध्ये युनिफॉर्ममध्ये असल्याने आपण दोघेही एकाच कंपनीचे एम्प्लॉयी आहोत हे त्यांना कळते.
पहिला (दुसर्‍यास दरडावून): तुला कळतंय का कुणाशी भांडतो आहेस तू ते?
(कंपनीत नव्यानेच रुजू झालेला) दुसरा : नाही. असा कोण मोठा टिकोजीराव लागुन गेला आहेस तू?
पहिला: सी.ई.ओ. आहे मी ह्या कंपनीचा.
दुसरा (ताठरतेने) : बरं असशील. मीही काही साधा नाही म्हंटलं.. डी.ई.ओ. आहे ह्या कंपनीचा.
पहिला (जरा नरमाईने): आय अ‍ॅम सॉरी सर. मी ओळखलं नाही. पण डी.ई.ओ. म्हणजे नेमकं काय?
दुसरा : आधी तू सांग. सी. ई. ओ. म्हणजे काय?
पहिला: सीईओ म्हणजे चीफ एक्झिक्युटिव ऑफिसर.
दुसरा : डीईओ म्हणजे डाटा एन्ट्री ऑपरेटर.

आता हा विनोद कळायचा असेल तर किमान इतकी माहिती तरी हवीच की सी.ई.ओ. हे कंपनीतले मालकाखालोखाल सर्वात महत्त्वाचे पद (क्वचित दुसर्‍या अथवा तिसर्‍या क्रमांकाचे) असते तर डाटा एन्ट्री ऑपरेटर हे अतिशय निम्न श्रेणीतील पद असून त्याचा कधीही लघुरूपात (डीईओ असा) उच्चार केला जात नाही. ही माहिती नसेल तर हा विनोद कळणे अशक्यच.

तद्वतच दारू, सिगरेट आदी व्यसनांपासून दूर असल्याने लेखात दिलेल्या एकाही किश्श्यातील विनोद समजला नाही. अर्थातच या अज्ञानाबद्दल व विनोद न कळल्याबद्दल कुठलीही खंत वाटत नाही.

असो.

काही वर्षांपुर्वी (बहुधा २००२ साल होतं आणि मी दिल्लीत होतो) फावल्या वेळेत हॉटेलातल्या टीवीवर सर्फिंग करता करता कुठल्यातरी वाहिनीवर एक हिन्दी चित्रपट मधूनच पाह्यला सुरूवात केली त्यावेळी जे दृश्य चालले होते त्यात -
एक खलनायक गटातली महिला त्यांच्या अड्ड्यावर आलेल्या नायकाला मद्यपानाचा आग्रह करते. तो नकार देतो. मग ती त्याला चहा, कॉफी किंवा इतर काही पेय पिण्याचा आग्रह करते. तो त्यालाही नकार देतो आणि मोठ्या स्टाईलमध्ये म्हणतो "समझदार लोग कुछ और नही पीते है सिवाय पानी के"

त्यानंतर मला काही कारणास्तव पुढचा चित्रपट बघता आला नाही. पण ते वाक्य मला फार आवडलं - खरंय पाण्याशिवाय इतर काही पेय पिलं आणि त्यात काही मिसळून दिलं गेलं तरी सहजी कळत नाही पण शुद्ध रंगहीन पाणी काचेच्या पात्रातून पिताना त्यात काही मिसळले जाण्याचा संभव कमी असतो. मीही अनोळखी लोकांच्या संपर्कात असताना पाण्याशिवाय इतर काही पेय (म्हणजे शीतपेय, सरबत इत्यादी. मद्यपान तर मी कुठेच करत नाही) न पिण्याचं हे पथ्य नेहमीच पाळतो.

हा प्रसंग इथे टाकण्याचं कारण म्हणजे बरीच शोधाशोध करूनही मला त्या चित्रपटाचं नाव आजतागायत समजलेलं नाहीये. इथे जर कुणाला ठाऊक असेल तर ते जरूर सांगावे.