भारत आणि अणुशक्ति

भारताने दोन वर्षांपूर्वी अमेरिका व इतर काही राष्ट्रांबरोबर अणुशक्ती या विषयाबाबत काही करार केले त्यानिमित्ताने बरीच राजकीय वादळे निर्माण झाली. काही शास्त्रीय स्वरूपाची माहिती समोर आली पण फारच थोड्या जणांना याबद्दल पुरेशी माहिती असते, त्यामुळे वादविवाद राजकीय स्वरूपाचेच राहिले. या संदर्भात काही स्वतः अनुभवलेली व बहुतेक वाचनातून जमवलेली माहिती आपणासमोर मांडण्याचा विचार आहे. करमणूक फारशी होणार नाही पण विषय जमेल तेवढा सुलभ करण्याचा प्रयत्न राहील.

सुरवातीला थोडी ऐतिहासिक माहिती. दुसर्‍या महायुद्धापर्यंत अणुशक्ती हा फक्त शास्त्रज्ञांचा विषय होता. अणुस्फोटातून ऊर्जा प्रचंड प्रमाणात बाहेर पडत असल्यामुळे बॉम्ब बनवण्यात तिचा उपयोग करण्यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्नशील होते. युद्धाच्या अखेरच्या पर्वांत जर्मनीचे लक्ष रॉकेटच्या विकासाकडे लागले आणि नाझीवादाच्या उदयानंतर अनेक आघाडीचे जर्मन शास्त्रज्ञ युद्धापूर्वीच देश सोडून गेले होते. या दोन गोष्टींमुळे जर्मनीने अणुशक्तीकडे पुरेसे लक्ष दिले नव्हते. अर्थात हे प्रचंड खर्चाचेही काम होते. जपानलाही त्यांचे प्रयत्न सोडावे लागले होते. मात्र अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अनेक देशांचे शास्त्रज्ञ बरीच वर्षे एकत्रितपणे अणुशक्तीवर संशोधन करीत होते. त्यांत अमेरिकेत पोचलेले जर्मन शास्त्रज्ञही होतेच. बॉम्ब बनवण्यासाठी युरेनियम लागणार होते. युरेनियमच्या खाणी सुरू करण्यापासून तयारी होती. निसर्गात मिळणार्‍या युरेनियममध्ये बॉम्बसाठी लागणार्‍या U235 या प्रकाराचे प्रमाण अत्यल्प असते. ते वाढवणे, (enrichment), हे एक किचकट व खूप खर्चाचे काम असते. ०.७२ % वरून हे प्रमाण ८०% पर्यंत वाढवावे लागते तेव्हा अणुबॉम्ब बनतो. किरणोत्सर्गामुळे हे काम अतिशय धोकादायकही असते.

मात्र ३-४% पर्यंत जरी प्रमाण झाले तरी त्याचा वापर करून Nuclear Reactor चालवता येतो. Reactor काही काळ चालला म्हणजे त्यांत वापरलेल्या अणुइंधनात निसर्गातील U235 बरोबर जो U238 हा युरेनियमचा दुसरा प्रकार मिसळलेला असतो त्याचे रूपांतर PU239, PU240 वगैरे प्लुटोनियमच्या प्रकारांत होते. प्लुटोनियम239 हा अतिशय घातकी प्रकारचा धातू असून त्याच्या विघटनापासून दुसर्‍या प्रकारचा व अधिक शक्तिशाली अणुबॉम्ब बनतो. (सुदैवाने प्लुटोनियम नैसर्गिकपणे मिळत नाही!) युद्धाच्या शेवटच्या पर्वांत या दोन्ही प्रकारचे बॉम्ब अमेरिकेने बनवले व जपानविरुद्ध त्यांचा वापर केला. हिरोशिमावर टाकलेला पहिला अणुबॉम्ब हा युरेनियमचा होता तर दुसरा नागासाकीवर टाकलेला प्लुटोनियमचा होता व त्याची घातकता फार मोठी होती. पहिल्या अणुबॉम्बच्या कचर्‍याच्या तपासणीतून जपानला कळले की हा युरेनियमचा बॉम्ब होता. त्यांना वाटले की युरेनियमचे आणखी बॉम्ब अद्याप अमेरिकेकडे नसणार, तेव्हा लगेच शरणागती पत्करण्याची गरज नाही. मात्र दुसर्‍या बॉम्बच्या कचर्‍याच्‍या तपासणीतून जपानला कळले की अमेरिकेने प्लुटोनियमहि बनवले आहे. हे दिसल्यावर मात्र जपानचा धीर खचला व त्यांनी शरणागती पत्करली. त्यावेळी प्रत्यक्षात, दर आठवड्याला एक असे हवे तेवढे प्लुटोनियम बॉम्ब टाकण्याची अमेरिकेची तयारी झालेली होती. सुदैवाने तिसरा बॉम्ब टाकावा लागलाच नाही. युद्धानंतर अमेरिका, रशिया व इतर अनेक राष्ट्रांनी या सर्व पायर्‍या ओलांडून पुढे वेगळ्या प्रकारचे व प्रचंड शक्तिशाली हायड्रोजन बॉम्बही बनवले व अनेक चांचण्या केल्या हे आपणाला माहीत आहेच. या विध्वंसक संशोधनाबरोबरच अणुशक्तीचा वीज उत्पादनासाठी उपयोग करण्याकडेही सर्व प्रमुख राष्ट्रे वळली होती.

भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत या क्षेत्रात भारताची अर्थातच नावालाच प्रगती होती व ती शास्त्रज्ञ पातळीवर. स्वातंत्र्यानंतर डॉ. होमी भाभा यांच्या प्रभुत्वाखाली भारताने Atomic Energy Commission स्थापन केले. पं. नेहेरूंचा डॉ. भाभांवर पूर्ण विश्वास होता व त्यांना(भाभांना) पूर्ण स्वातंत्र्य होते. भारतातील अणुसंशोधन व विकास याचा टप्प्याटप्याने जो क्रम त्यांनी बांधून दिला त्यानुसार अद्यापही आपली वाटचाल चालू आहे. अनेक दिग्गज शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ गेल्या ५०-५५ वर्षात भारताला लाभले आहेत आणि भारताच्या या क्षेत्रातील प्रगतीकडे जगाचे कायम लक्ष असते. B. A. R. C. या ट्रॉम्बे येथील केंद्रापासून (मूळ नाव Atomic Energy Establishment, Trombay) भारताची या क्षेत्रातील वाटचाल सुरू झाली.

प्रथम थोडी शास्त्रीय माहिती फार खोलात न जाता पाहूया. मूलद्रव्ये, elements, म्हणजे काय हे आपणास शालेय काळापासून ऐकून ठाऊक असते. रेडियम वगैरे नावे आपण ऐकलेली असतात. अणू-परमाणूही ऐकलेले असाल. तीन महत्त्वाचे परमाणू म्हणजे न्यूट्रॉन, प्रोटॉन व इलेक्ट्रॉन. प्रोटॉन व न्यूट्रॉन वजनात सारखे असतात पण प्रोटॉनवर धन विद्युतभार असतो, न्यूट्रॉनवर विद्युतभारच नसतो. इलेक्ट्रॉनवर ऋणविद्युतभार असतो पण त्याला वजन जवळपास नसतेच. सर्व मूलद्रव्यांच्या अणूंमध्ये हे परमाणू असतात. अणूमध्ये किती प्रोटॉन असतात यावर अणू कोणत्या मूलद्रव्याचा हे ठरते. हायड्रोजन हा सगळ्यात हलका अणू, त्यात एकच प्रोटॉन असतो. युरेनियम हा सगळ्यात जड धातू आहे. त्याच्या अणूत ९२ प्रोटॉन असतात.

निसर्गात युरेनियम फार थोड्या प्रमाणात मिळतो. भारतात तर फारच थोड्या प्रमाणात मिळत होता. मुद्दाम शोधाशोध केल्यावर १९६० नंतर त्याची पहिली खाण ओरिसात जादुगुडा येथे सुरू झाली. त्यानंतर अथक शोधाअंती भारतात आणखी तीन-चार ठिकाणी त्याच्या खाणी चालतात असे वाचले. मी १९५९ ते १९६२ या काळात AEET येथे नोकरी केली. तेव्हा माझ्या एका तरुण तमिळ सहकार्‍याने जादुगुडा येथील खाणीसाठी सुरवातीचे सर्व्हेचे काम केले होते असे आठवते. आता भारत या बाबतीत काही प्रमाणात स्वयंपूर्ण आहे.

भारतात नैसर्गिकपणे मिळणार्‍या युरेनियमच्या मातीत कचरा सोडून फक्त अर्धा-पाऊण टक्का युरेनियम २३५ व उरलेले युरेनियम २३८ ( थोडे २३४ही) असते. हे युरेनियमचे दोन प्रमुख प्रकार, Isotopes, आहेत. यांत फरक काय? दोन्हीच्या अणूंच्या वजनात किंचित फरक असतो. दोन्हीमध्ये protons ९२च असतात पण न्यूट्रॉन १४३ आणि १४६ असतात. युरेनियम २३८ हा stable असतो तर U235चा अणू हा आपोआपही फुटत असतो! मात्र फार थोड्या प्रमाणात. पण युरेनियम २३५च्या अणूवर एखादा न्यूट्रॉन जोरात आदळला तर तो अणू लगेच फुटतो व त्यातून दोन वेगळेच अणू (त्यापैकी एक बेरियम), २ ते ३ सुटे वेगवान न्यूट्रॉन आणि बरीच ऊर्जा बाहेर पडते. हे सुटे न्यूट्रॉन पुन्हा दुसर्‍या U235 अणूंवर आदळून ही क्रिया चालू राहते व उर्जा भराभर वाढत जाते. यालाच chain reaction म्हणतात. ही बाहेर पडणारी ऊर्जा हीच अणुऊर्जा. (हे अतिशय प्राथमिक दर्जाचे वर्णन आहे. मलाही वाचून एवढेच कळले आहे!). हिचा बरावाईट उपयोग करण्यासाठी नैसर्गिक युरेनियम मधील U235 चे प्रमाण वाढवावे लागते. याला enrichment म्हणतात. या कामाची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट व खर्चीकही आहे. हे प्रमाण जास्तीत जास्त ३-४ टक्क्यांपर्यंत वाढवून त्याचा उपयोग research किंवा power reactors मध्ये करता येतो म्हणून त्याला Reactor Grade असे म्हणतात. (मात्र नैसर्गिक युरेनियमचाही अगदी कमी पॉवरच्या reactors मध्ये उपयोग करता येतो.) किमान २० टक्क्यांपर्यंत हे प्रमाण वाढले तर त्यापासून कमीजास्त विध्वंसक शस्त्रे बनतात. म्हणून याला weapons usable grade म्हणतात. मात्र प्रत्यक्ष अणुबॉम्ब बनवण्यासाठी U235चे प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत वाढवावे लागते. हे सोपे नसल्यामुळे अमेरिकेने हिरोशिमावर असा पहिला बॉम्ब टाकल्यानंतर अमेरिकेने स्वतः व इतर राष्ट्रांनीही अणुबॉम्बसाठी युरेनियमऐवजी सुरवातीपासूनच प्लुटोनियमचा वापर करणे पसंत केले. फक्त चीनने पहिला अणुबॉम्ब युरेनियमचाच बनवला होता असे वाचले.

आता प्लुटोनियम म्हणजे काय हे पण थोडे पाहू. U238 मध्ये ९२ प्रोटॉन व १४६ न्यूट्रॉन असतात व हा निसर्गात मिळतो (त्याचे बरोबरच पाऊण टक्का U235 असतो) U238. हा radio-active नाही व स्वतः:हून फुटत नाही. मात्र U235 चे विघटन होताना जे सुटे वेगवान न्यूट्रॉन निघतात त्यातला एक U238 च्या अणूमध्ये घुसला तर एक नवीन अणू बनतो त्याला U239 म्हणतात किंवा 239pu म्हणजेच प्लुटोनियम म्हणतात.(९२ प्रोटॉन व १४७ न्यूट्रॉन). दोन न्यूट्रॉन घुसले तर 240pu (९२ प्रोटॉन व १४८ न्यूट्रॉन) असा याचा आणखी एक isotope बनतो. प्लुटोनियम २३९ हाही U235 प्रमाणेच विघटनक्षम असतो व त्याचा उपयोग reactors मध्ये आणि बॉम्ब बनवण्यातही होते. नागासाकीवर टाकलेला बॉम्ब यापासून बनवलेला होता. PU241 and PU242 असे आणखीही दोन प्रकार आहेत.

अणुबॉम्ब आणि अणुशक्ती या जोडीने जाणार्‍या गोष्टी आहेत. भारताने या दोन्ही क्षेत्रात काय प्रगती केलेली आहे हे आता पाहू.

भारताने ट्रॉंम्बे येथे पहिला अल्प शक्तीचा research reactor १९५५च्या सुमारास बांधला त्याचे नाव होते अप्सरा. (One MW.) त्यानंतर भारत व कॅनडा यांच्या सहकार्याने एक मोठा (40MW) रिसर्च रिअ‍ॅक्टर तेथेच बांधला गेला. त्याला कॅनडा-इंडिया रिअ‍ॅक्टर असे म्हटले जात होते. या CIR Project मध्ये मी काही काळ काम केले. त्यामध्ये वापरण्यासाठी Fuel Rods, जे युरेनियम ऑक्साइडचे असत, ते नंतर अमेरिकेकडून मिळत होते. त्यामुळे या रिअ‍ॅक्टरचे नाव नंतर CIRUS असे झाले. तरुण भारतीय इंजिनिअर व शास्त्रज्ञ यांची एक पलटणच या प्रकल्पावर काम करून तयार झाली. त्यानंतरही कॅनडाने भारताला अणुक्षेत्रात अनेक प्रकारे साहाय्य केले व शास्त्रज्ञ तंत्रज्ञांना प्रशिक्षण दिले. हा रिअ‍ॅक्टर नैसर्गिक युरेनियमचे fuel rods वापरतो.

(भारताकडे युरेनियमचे प्रमाण वाढवण्याची - enrichment - क्षमता तेव्हा नव्हती. मात्र कालांतराने १९९० पासून कर्नाटकात रट्टेहळ्ळी येथे एक enrichment plant सुरू झाला असे वाचनात आले. येथे बनणारा enriched uranium भारत बनवू पाहत असलेल्या Nuclear Submarineसाठी वापरावयाचा आहे. भारताच्या दुसर्‍या अणुस्फोटाच्या कार्यक्रमातही त्याचा वापर झाला असावा अशी शक्यता आहे. रट्टेहळ्ळी प्रकल्पाबाबत फार गुप्तता पाळण्यात येते व आता तो प्रकल्प संरक्षण खात्याच्या अखत्यारीत आहे.)

CIR कार्यान्वित होण्याआधीच एक नवे प्रोजेक्ट ट्रॉम्बे येथे सुरू झाले. रिअ‍ॅक्टर काही काळ चालवला गेला की त्याच्या uranium fuel rods मधील U235 चे विघटन होते तसेच U238 च्या अणूंवर सुटे न्यूट्रॉन आदळून त्यांचे pu239 - pu240/pu241/pu242, उर्फ प्लुटोनियम मध्ये रूपांतर होत असते. वापरलेले fuel rod रिअ‍ॅक्टरमधून बाहेर काढून त्याची पावडर करून त्यांतील प्लुटोनियम मिळवण्याची तयारी भारताने लगेचच सुरू केली. त्यासाठी Plutonium extraction plant बांधण्यास लगेच सुरवात झाली. त्याचे डिझाइन बव्हंशी भारतीय होते. हल्लीच वारलेले डॉ. सेठना यांचा त्यात मुख्य भाग होता. या Main plant building च्या बांधकामाचे टेंडर काढण्यापासून बांधकामावर देखरेख करण्याचे काम मला मिळाले व दोन वर्षे या महत्त्वाच्या कामात माझा प्रत्यक्ष सहभाग होता. मात्र माझे काम फक्त बिल्डिंग बांधण्याचे होते. प्लुटोनियम मिळवण्याबद्दल मी पूर्णपणे अनभिज्ञ होतो व आजही आहे!

भारताने पाठोपाठ power reactors हि बांधण्यास तारापुर येथे सुरवात केली. हा वेळ पर्यंत अमेरिका भारतविरोधी नव्हती. तारापुरला अमेरिकन कंपनीनेच मुख्य काम केले. Power reactorsमधील fuel rodsमधील U238चेही pu239 - pu240 या प्लुटोनियम Isotopesमध्ये रूपांतर होतेच. fuel rods थोडाच काळ - ४-५ महिने - रिअ‍ॅक्टरमध्ये वापरलेले असले तर pu240 थोडा-6% - व pu239 जास्त असतो. fuel rod मधील युरेनियम संपेपर्यंत तो वापरला गेला तर pu240 जास्त प्रमाणात -25% - बनतो. त्याचा वापर करता येत नाही. तारापुर येथील पॉवर रिअ‍ॅक्टर्सचे डिझाइन असे आहे की रिअ‍ॅक्टर पूर्णपणे बंद न करताही त्यांतील काही fuel rods बदलता येतात त्यामुळे ४-५ महिनेच वापरलेले रॉड काढले म्हणजे त्यांपासून pu239 मिळवता येते. त्यामुळे तारापुर येथेही भारताने प्लुटोनियम प्लॅन्ट बांधले. यामुळे पुढील रिअ‍ॅक्टर्ससाठी भारताला स्वतः:चे प्लुटोनियम मिळू लागले.

भारताने CIRUSच्याच डिझाइनवर आधारित असा दुसरा मोठा (100 MW) रिअ‍ॅक्टर, ध्रुव नावाचा, BARC येथेच बांधला. हे काम भारतीय तंत्रज्ञ/शास्त्रज्ञांनीच पार पाडले. हाही research reactor आहे. यातील fuel rodsपासून भारताला weapons grade प्लुटोनियम मिळते व स्वतः: बनवलेला असल्याने त्यावर परकीय नियंत्रण नाही. याउलट, power reactorsमधील fuel rodsमधून तारापुर येथील प्लुटोनियम प्लॅन्ट मधून मिळणार्‍या प्लुटोनियमचा वापर करण्यावर काही बंधने आहेत. अणुबॉम्ब बनवण्यासाठी त्याचा वापर करता येत नाही.

Reactors मध्ये वर वर्णिलेली chain reaction ताब्यात ठेवणे हे प्रमुख काम असते. सुटे न्यूट्रॉन व ऊर्जा या दोन्हीवर नियंत्रण ठेवावयाचे असते. यामुळे रिअ‍ॅक्टर्स मध्ये fuel rods सारखेच महत्त्व moderators and coolers या दोन घटकांना असते. moderatorsचे काम सुटे व वेगवान न्यूट्रॉन पकडून चेन रिअ‍ॅक्शन वर ताबा ठेवण्याचे व coolersचे काम coreमध्ये निर्माण होणारी ऊष्णता काढून घेणे हे असते. ही काढून घेतलेली ऊष्णताच power-reactorsमध्ये विद्युतनिर्मितीसाठी वापरली जाते. moderatorsमध्ये heavy water हे महत्त्वाचे आहे. हे Heavy Hydrogen पासून मिळते. यात फरक काय? नेहमीच्या हायड्रोजनच्या अणूमध्ये एकच प्रोटॉन असतो. हेवी हायड्रोजनच्या अणूमध्ये एक प्रोटॉन आणि एक न्यूट्रॉनहि असतो त्यामुळे तो खरोखरच जड असतो. Heavy Waterही साहजिकच ’जड’ असते. त्यात पोहायला उतरलात तर बुडण्याची भीती नाही! भारताने याही बाबतीत स्वायत्तता मिळवलेली आहे. Natural Gasमध्ये किंचित प्रमाणात heavy hydrogen असतो तो वेगळा करणे हेही एक किचकट व खर्चीक काम आहे. भारताला Bombay Highमधून natural gas मिळू लागला त्याच्या वापरातून रेवस जवळ थळ-वायशेत येथे मोठा खत प्रकल्प बांधला गेला. मग तीच gas pipeline थोडी पुढे नेऊन गॅसपासून heavy water बनवण्याचा कारखाना उभा राहिला. त्याच्याशीही माझा थोडा बांधकामापुरता संबंध आला. नंतर असा कारखाना तारापुर व कोटा येथेही झाला. भारत Heavy Water च्या बाबतीत बराचसा स्वयंपूर्ण आहे. हल्ली वाचले की भारत Heavy Water अमेरिकेला निर्यात करतो!

तारापुर नंतर कोटा, कल्पक्कम, कारवार, नरोडा अशा इतर ठिकाणीही अनेक power reactors बांधले गेले आहेत व आणखी अनेक बांधले जात आहेत वा योजले आहेत. या रिअ‍ॅक्टर्समध्ये नैसर्गिक युरेनियम आणि प्लुटोनियम पासून बनलेले fuel rods वापरले जातात आणि pressurized heavy waterचा  moderator/cooler म्हणून वापर होतो. या दोन्ही बाबतींत भारत स्वयंपूर्ण आहे. मात्र Nuclear Power Reactorsच्या fuel rodsसाठी काही प्रमाणात आयातीवर अवलंबून राहावे लागते. जैतापुर येथे असाच एक रिअ‍ॅक्टर योजलेला आहे व त्यावरून वादंग सुरू आहे.

डॉ. भाभा यानी दाखवून दिलेल्या रस्त्यावरील पुढील पायरी म्हणजे breeder reactors. हे असे वेगळेच रिअ‍ॅक्टर्स असतात की त्यांत जळणार्‍या अणुइंधनाइतके (जवळपास) नवीन अणुइंधन त्यांत तयार होते! त्याचे काही प्रकार आहेत पण त्यातील शास्त्र किचकट आहे त्यामुळे त्यात जास्त शिरण्यात अर्थ नाही. भारताला त्यांचे महत्त्व का हे पाहू. भारतांत युरेनियम तसे थोडेच आहे पण थोरियम चिक्कार आहे. थोरियम स्वतः:हून विस्फोट होणारे नाही. U232 हे त्याचे वर्णन आहे. मात्र हे रिअ‍ॅक्टरमध्ये ठेवले तर त्याचेवर सुटे न्यूट्रॉन आदळून त्याचे रूपांतर U233 या Isotope मध्ये होते व हा U235 प्रमाणेच विस्फोट होणारा धातू आहे. त्याचा वापर करून आणखी पॉवर/रिसर्च रिअ‍ॅक्टर्स भारताला बांधता येतील.

भारताने कल्पक्कम येथे पहिला छोटा आणि प्रायोगिक breeder reactor बांधला व अनेक अडचणींनंतर तो १० वर्षांपूर्वी व्यवस्थित चालू झाला आहे. तसाच आणखी मोठा 500 MW Capacity breeder reactorही तेथेच बांधला जातो आहे. या रिअ‍ॅक्टर्समध्ये ठेवलेल्या, भारतात विपुल मिळणार्‍या नैसर्गिक थोरियम (U232) पासून मिळणार्‍या U233 (थोरियमचा Isotope)चा वापर करून एक छोटा प्रायोगिक रिअ‍ॅक्टरही सुरू झाला आहे. त्याचे नाव कामिनी असे आहे. यातून पुढील प्रगती करून थोरियम U233 वापरणारा भारतीय बनावटीचा मोठा power reactor जेव्हा प्रत्यक्षात येईल तेव्हा डॉ. भाभांचे स्वप्न खरे होईल. तो दिवस फार दूर नसावा असे वाटते. कालांतराने भारत थोरियमचा वापर करून मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करू शकेल.

भारताच्या अणुबॉम्ब बनवण्याच्या क्षेत्रातील प्रगतीबद्दल थोडक्यांत माहिती अशी की पोखरण येथील पहिला अणुस्फोट प्लुटोनियम (नागासाकी प्रकार) वापरून केलेला होता. हा स्फोट होईपर्यंत अमेरिका व इतर राष्ट्रे अंधारात होती. त्यानंतर भारतावर करडी नजर ठेवली जाऊ लागली व थोडेफार सहकार्य फक्त रशियाकडूनच मिळत राहिले. हळूहळू आपल्या power reactors साठी Enriched Uranium fuel rodsची टंचाई भासू लागली. पोखरणमध्येच दुसरा स्फोट झाला त्यात plutonium bomb तसेच hydrogen bomb देखील होता असा भारताचा दावा होता. Hydrogen Bombच्या पोटात हायड्रोजनचे Isotopes असतात व बाहेर Plutonium Bomb चे कवच असते. या कवचाचा स्फोट होऊन आतल्या hydrogen Isotopes वर प्रचंड दाब व उष्णता आदळते. त्यामुळे हे Isotopes एकजीव होऊन हेलीयम Gas तयार होतो, काही भाग नष्ट होतो आणि त्यामुळे फार प्रचंड प्रमाणावर उर्जा बाहेर पडते. मात्र इतर देशांचे अभ्यासाअंती असे मत बनले की यावेळेचा प्लुटोनियम बॉम्ब पहिल्या स्फोटासारखाच पण थोडा मोठा होता, त्याचा स्फोट बरोबर झाला पण त्याच्या पोटातील hydrogen bombचा स्फोट मात्र यशस्वी झालेला नव्हता. याबाबत भरपूर मतभेद व वादंग आहे..

भारताने स्वतः:हून प्रथम कोणाविरुद्धही अणुबॉम्ब वापरणार नाही असे वेळोवेळी जाहीर केले आहे. मात्र पुन्हा टेस्ट करण्यावर बंधने स्वीकारलेलीं नाहीत. भारताकडे काही अणुबॉम्ब (प्लुटोनियम आधारित) तयार असावे व अधिक लागल्यास ३-४ दिवसात जोडण्याची क्षमता आहे कारण भारताकडे weapons grade plutonium आहे असे जगातील अनेक जाणकारांचे मत आहे.

भारताने दोन वर्षांपूर्वी केलेल्या अणुकरारान्वये power reactorsसाठी आयात केलेल्या fuel rods पासून मिळणार्‍या प्लुटोनियमच्या वापरावर काही बंधने मान्य केली आहेत म्हणजे त्याचा वापर बॉम्ब बनवण्यासाठी करता येणार नाही. मात्र CIRUS, DHRUVA किंवा भविष्यातील नवीन research reactors मधील fuel rods वा त्यापासून मिळणार्‍या प्लुटोनियमवर कोणतीही बंधने भारताने स्वीकारलेलीं नाहीत. ही गोष्ट विचारात घेऊनच व राजकारण बाजूला ठेवून कराराबद्दल आपण मत बनवावे हे माझ्यामते उचित ठरेल. आज दिलेली माहिती आपणाला यासाठी उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.


लेखक: प्रभाकर फडणीस

1 टिप्पणी:

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

सोपे लिहिणे फार कठीण असते. आपल्याला ते बर्‍यापैकी साधले आहे असे वाटते. छान माहितीपूर्ण लेख.