"आणि ग्रंथोपजीविये...'
म्हणतात जे मराठी भाषा होणार ही असे नष्ट
मिळणार काय करुनी व्यर्थ हिला वांचवावया कष्ट?
त्यांना हेच पुसा की ’मरणोन्मुख होय आपुली माय
म्हणुनी औषध काही पुत्री देऊ नये तिला काय?
माता तशी स्वभाषा, सेवाया हाय आपणा उचित;
किंबहुना मातेहुनि अधिक हिची योग्यता असे खचित
दे जन्म माता, भाषा व्यवहार चालवी सकळ;
मातेशिवाय जन्महि जाय , न भाषेशिवाय एक पळ
रक्षी म्हणूं तरी ती बाल्यापुरतीच काळजी वाहे;
आबालवृध्द–रक्षण–कार्य ही दक्ष सारखी राहे.
उपकार थोर ऐसे नित्य जिचे आपणावरी होती,
हो कां दीन, कधी नच योग्य उपेक्षावया तरी हो! ती.
ह्यास्तव ज्या कोणा ह्या निजभाषेचा असेल अभिमान,
देवोत सादरें मम विनतीकडे ग्रंथकार ते कान.
गंगाधर रामचंद्र मोगरे यांची "मराठी ग्रंथकारास प्रार्थना' ही कविता साधारणतः स्वातंत्र्योत्तर कालखंडानंतर जो शालेय अभ्यासक्रम आखला गेला त्यापूर्वीच्या कालखंडातली आहे म्हणजेच विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या कालखंडातील आहे असे ढोबळ मानाने धरून चालले तरी या कवितेला आता उणापुरा आठ ते नऊ दशकांचा काळ लोटला असला तरीसुद्धा परिस्थितीत सुधारणा का होऊ नये हा कळीचा प्रश्न उद्भवतो. मराठी वाचनसंस्कृतीतला महत्त्वाचा वाटा मराठी नियतकालिकांनी उचलला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. याचे मुख्य कारण असे की नियतकालिके ही हलक्या-फुलक्या वाङमयापासून ते साहित्यातील गंभीर विषयांपर्यंत थेट पोचविण्याचे सशक्त माध्यम म्हणून काम करीत आहेत. मागचा साधारण शंभर वर्षांचा कालखंड बघितला तर मनोरंजन, करमणूक, विविधज्ञानविस्तार आदींपासून किर्लोस्कर, स्त्री, अभिरूची, हंस ते आजच्या ललित, अंतर्नाद या वाटचालीपर्यंत अनेक मैलाचे दगड निर्माण झाले आहेत. तरीपण आजची परिस्थिती बिकट झाली आहे हे नक्की.
ह्या परिस्थितीचा आढावा घेताना असे लक्षात येते की दृक् श्राव्य माध्यमाचे वाढते प्रस्थ , वृत्तपत्रांच्या पुरवण्यातून येणारे साहित्य, इंग्रजी माध्यमातून शिक्षण आणि सकस व दर्जेदार साहित्याची निर्मिती न होणे ह्या मुख्य कारणांबरोबरच इतरही दुय्यम कारणांमुळे मराठी वाचनाची पडझड होत आहे. ही सगळी कारणं तर खरीच आहेत परंतु व्यवहारातली कारणे आणखीन भयावह आणि अस्वस्थ करणारी आहेत.
पुण्यातून चालणार्या एका प्रसिद्ध, केवळ साहित्याला वाहून घेतलेल्या संपादकाचे मनोगत पुरेसे बोलके आहे. नऊ लाख मराठी भाषा बोलणार्या महाराष्ट्रात उच्च सांस्कृतिक आणि वाङमयीन अभिरूची जपणार्या या मासिकाचा खप अवघा एक हजार पाचशे साठ असावा? हे एक मोठे कोडेच आहे. या मासिकाचे पूर्णवेळ, व्यक्तिगत पातळीवर काम करूनही अशी निराशा पदरी यावी ही खंत या संपादकांनी व्यक्त केली. अशा मासिकांची भिस्त केवळ वर्गणीदारांवर अवलंबून असते. कारण जाहिरातीचा ओघ हा गुळगुळीत, चित्रपट-विषयक, मसालेदार अशा मासिकांकडे असतो. ध्येयनिष्ठ, वाचनसंस्कृती जपण्याकडे नसतो हे कटू सत्य आहे. साहित्य संस्कृती मंडळातर्फे मिळणारे अनुदान इतके अल्प असते की त्यातून कुठलाच खर्च भागत नाही. त्यातून व्यक्तिगत पातळीवर चालणार्या नियतकालिकाला तर तेही मिळत नाही. आर्थिक व्यवस्थेचा डोलारा सांभाळला न गेल्याने अशा मासिकांचे भवितव्य धोक्यातच येते परंतु काही दर्जेदार, चोखंदळ, रसिक वाचकांच्या भरोशावर अशा मासिकांची वाटचाल सुरू आहे. लेखाच्या आरंभी दिलेली गं.रा.मोगरे यांची कविता देखील याच विषयावर भाष्य करणारी आहे. मातृभाषेच्या प्रेमाखातर कवीनी केलेली कळकळीची विनंती हृदयाला भिडणारी आहे. निजभाषेच्या प्रेमापोटी नि:स्वार्थ मनोवृत्तीने कार्य करीत राहा असे सांगणरे मोगरे पुढे म्हणतात–
यास्तव विदवज्जन हो, उघडा उघडा स्वबुद्धिभांडारे;
अज्ञानध्वांत हरा, नाना ग्रंथ प्रकाशन–द्वारें.
ग्रंथप्रकाश करिता ह्यास्तव अगदी सरूं नका मागे;
म्हणजे उजाडले हें जाणुनि होतील तेच हो जागे.
सदभिरूचीच्या योगे पावुनियां योग्य संस्कारा,
राहील शुद्ध होऊनि जनमत, त्याचा झडोनि मळ सारा.
क्षयरोगमुक्त अंती तुमची होऊन देशभाषाही,
तुमच्या भव्य यशाने भरुनी टाकील हो दिशा दाही.
कवी मोगरे नुसती भाषेच्या पडझडीविषयी खंत करीत बसत नाही तर त्यावरील जालीम उपाय सुद्धा सांगताना दिसतात. हे उपाय एवढा काळ लोटल्यावरही तंतोतंत लागू पडतात. त्यामुळेच साहित्य अभिरूची संपन्नतेसाठी नियतकालिकांची निर्मिती व्हायलाच हवी. याचे मुख्य कारण दर्जेदार सकस साहित्याला ह्याद्वारे व्यासपीठ मिळायला हवे. साहित्यामुळेच मानवी जीवन समृद्धतेच्या दारापर्यंत पोचते हे निखळ सत्य आहे. नाहीतर प्राथमिक गरजा भागवून जगणारा प्राणी व मनुष्य यात अंतर काय राहील? तसेच मातृभाषेच्या विकासासाठी, तिच्या जोपासनेसाठी अशा नियतकालिकांची आवश्यकता आहे. दर्जेदार साहित्यामुळेच भाषेला महत्ता प्राप्त होत असते. समाजाला उच्च विचारांचे योगदान हे केवळ भाषेच्या माध्यमातूनच मिळत असते. साहित्यनिर्मितीसाठी वृत्तपत्रापेक्षा मासिकाचे माध्यम अधिक सक्षम आहे. अशा छोटया मासिकांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचे पुस्तकात रूपांतर होत असते. रसिकांच्या मनात घर करून राहिलेले साहित्य अशा मासिकांमधूनच प्रकाशित झाले आहे.
आठ ते नऊ दशकांपूर्वी केलेली ’मराठी ग्रंथकारास प्रार्थना' ह्या कवितेचे मूळ शीर्षक "मराठी ग्रंथकारास विनंती' असे होते . आर्या वृत्तातल्या ह्या कवितेत एकूण सदतीस आर्या होत्या. आता फक्त अठरा आर्या उपलब्ध आहेत. ह्या कवितेत एक मोठाच सकारात्मक आशावाद दडलेला आहे. श्रीकृष्णाने दिलेली निष्काम कर्माची दीक्षा इथे ग्रंथकारांना दिलेली आहे. एका ओळीमध्ये ते म्हणतात–
न म्हणा "रसिकचि नुरले'; दैवाचा जाहल्यामुळे कोप,
आहे संप्रति त्यांना, बांधव हो, गाढ लागली झोप.
अशाच साहित्याभिरुचीला जपणारे आणखीन एक दालन म्हणजे साहित्य संमेलन होय. परंतु त्याची आजची अवस्था बघता असा प्रश्न पडतो की ही संमेलने साहित्यिक सांस्कृतिक वारसा जपण्याकरिता, तो वृद्धिंगत व्हावा म्हणून होतात की साहित्यिकांच्या व राजकारण्यांच्या वाङमयीन प्रतिष्ठेसाठी होतात? अनुदानापोटी मिळालेल्या रकमेचा साहित्यविषयाला वाहून घेतलेल्या विधायक कार्यासाठी केला जातो का?खूप मेहनतीने आयोजित केलेल्या साहित्य संमेलनाचे फलित काय? असे प्रश्न उपस्थित न केलेले बरे! नाही का?
परदेशात अशा छोट्या मासिकांना विद्यापीठे, निरनिराळी प्रतिष्ठाने चालवीत असतात किंवा सरकारचे पाठबळ मिळत असतेच. संस्थात्मक पातळीवर ज्या मासिकांचे काम चालते अशांचीही आपल्या देशात दूरावस्था आहे तिथे व्यक्तिगत पातळीवर चालणार्यांची काय कथा? सामाजिक उपक्रमांसाठी ज्याप्रमाणे निधी उपलब्ध केला जातो तसाच नियतकालिकांसाठी का उपलब्ध केला जाऊ नये?
ह्या सगळ्या नकारात्मक पार्श्वभूमीवर गं.रा. मोगरे यांचा आशावाद पुन्हा जिवंत होताना दिसतो. साहित्यप्रसारणाच्या सशक्त माध्यमाची उभारणी ’नेट’द्वारे झाल्याने पुन्हा नव्या आशेची पालवी फुटली आहे. परिवर्तन ही अशी प्रक्रिया आहे की जी थांबवली जाऊ शकत नाही आणि थांबविणे योग्यही ठरणार नाही. त्यामुळे भाषेला जिवंत ठेवण्यासाठी जे प्रयत्न आवश्यक आहेत ते सर्व करणे गरजेचे आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते की शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असले तरी आंतरिक विचारांच्या अभिव्यक्तीसाठी मातृभाषाच जवळची वाटते आणि या प्रेमापोटीच आजचे ब्लॉगविश्व समृद्ध झालेले दिसते. शेवटी असे म्हणतात की जगण्याचा प्रश्न आला की कितीही अडचणी येवोत त्यावर मात करण्याचा उपाय शोधला जातोच. त्यामुळेच लिहिते करण्याच्या या प्रयत्नांना दाद द्यायलाच हवी. ’पेरते व्हा'च्या धर्तीवर ’लिहिते व्हा'चा नारा द्यावासा वाटतो आणि या लिहिणार्यांना व्यासपीठ निर्माण करून देणार्या धुरीणांचे विशेष कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. विशेषतः तरुण वर्गाला आकर्षित करणारे हे माध्यम असल्याने यात त्यांचा विशेष सहभाग वाढलेला दिसतो आणि त्यामुळेच भाषेतील जोश, उत्साह, रसरशीतता वाढीस लागते हे आलेल्या साहित्यावर नजर टाकली तरी सहज लक्षात येते.
शब्दगाऽऽरवा २०११च्या या अंकाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अभिवाचन , काव्यवाचन, चित्रपट परिचय , मुक्त चिंतन, माहितीपूर्ण, छायाचित्रे , चित्र-कविता , तंत्रज्ञान, कथा, कविता, किस्से , ललित, विडंबन आणि खादाडी अशा विविध पूर्णं विषयांना स्पर्श करणारे लेख सामावले आहेत. स्वा. सावरकरांची ८ वीररूपे ध्वनीमुद्रणाच्या माध्यमातून सादर करण्याची कल्पना अभिनव आहे. शशिकांत गोखले आणि अथर्व गोखले या आजोबा आणि नातवाच्या जोडीने ही कल्पना उत्कृष्टरित्या साकारली आहे.
अरुंधती कुलकर्णी यांचा ’अमृततुल्य,’ आनंद घारे यांचा भोपळ्यावरील लेख हे ललित लेखनाचे नवीन पैलू उलगडणारे लेख आहेत. संगणकप्रिय मित्रांसाठी डॉ. हरी दामले यांचा ’संगणकावर अत्यंत सोप्या पद्धतीने देवनागरी मराठीतच लिहा’ हा लेख माहितीपूर्ण व उपयोगी आहे. या महाजालावरील दृकश्राव्य माध्यमामुळे विषयाचे बंधन नाही , त्यामुळे अॅंड्रॉइड अॅप्स हा नावीन्यपूर्ण मोबाईल तंत्रज्ञानावरचा विषय देखिल छानपैकी हाताळण्यात आलेला आहे.
वाङ्मयातील कथा, कविता, किस्से, विडंबन हे सारेच मनोरंजनासाठी समर्थ आहेत. प्रभाकर फडणीस यांचा अणुभट्टी या विषयावरील माहितीपूर्ण लेख चिंतन करण्याजोगा आहे. प्रत्येकालाच भविष्यात काय घडेल याची उत्सुकता असतेच परंतू एका पुस्तकाच्या माध्यमाद्वारे ही उत्सुकता कशी शमवली आहे ते प्रत्यक्षच वाचावे असे आहे. सोबत जिभेचे चोचले पुरवणारी "खादाडी " सर्वांना निश्चितच आवडेल. एकूणच विषयांचे वैविध्य , वैचारिक वाङ्मय., लालित्यपूर्ण विषय आणि अंकाची सौंदर्यपूर्ण रचना ह्या विविध मितींमुळे शब्दगाऽऽरवा रसिकांना भावेल हे निश्चितच!
’शब्दगाऽऽरवा’साठी अक्षर गणेशाच्या स्वरूपातील देखणे मुखपृष्ठ तयार केलेय श्री आनंद टेके ह्यांनी...त्यांचे शतश: आभार!
सुपर्णा कुलकर्णी.
१३ टिप्पण्या:
अभिनंदन सुपर्णाताई. छान झालंय संपादकीय आणि अंकही. अजुन पूर्ण वाचला नाहीये पण जमेल तसा हळूहळू वाचेनच. मुखपृष्ठावरील गणेशमूर्तीचे चित्रं आणि त्यातील "शब्दगारवा" हा विशेष भावला. अंकासाठी मेहनत घेतलेल्या सगळ्यांचेच आणि नेहमीचे यशस्वी देवकाका आणि श्रेयाताई यांचेही अभिनंदन.
अभिनंदन, ह्या अंकाने माझी हिवाळ्याची सुरुवात खास होणार आहे . संपादकीयच इतके छान आहे की अनकही अतिशय उत्तम असेल. आजपासून वाचायला सुरु करतोय.
अंक एकदम छान वाटला
सर्वांनी मेहनत घेतली, त्याचेच हे फ्ळ,
शुभेच्छा सह धन्यवाद !
मुक्तेश्वर
अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन! अप्रतिम दिसतोय अंक आणि अशा संपादकीयामुळे भारदस्तही! सर्वांना अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा! येणारे नववर्ष आपणा सगळ्याना आनंदाचे, भरभराटीचे आणि उत्तम साहित्याचे जावो! :)
अतिशय भारदास्त, चिंतन करायला लावणारे आणि शेवटी आशावादाला झुकलेले संपादकीय. अतिशय आवडले. अंक तर मेजवानीच आहे. अंकात सहभागी सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन ! :)
साहित्याला वाहून गेलेल्या मासिकांची दुर्दशा हे फक्त मराठीतच नव्हे तर अगदी हिंदीसह सर्वच भारतीय भाषांमध्ये आढळून येते हे माझे एक निरिक्षण. त्यातही चिंतनशील, आशयगर्भ मासिकांना तर अजूनच कमी लोकाश्रय असतो. हलके-फ़ुलके लेख असलेली मासिके जास्त खपतात. जालावर मात्र दोन्ही प्रकारच्या लेखांना चांगला वाचकवर्ग मिळतो. कदाचित फ़ुकटातली मेजवानी कोणी नाकारत नाही म्हणून असावे. :) काही का असेना, लोक वाचताहेत आणि मोठ्या संख्येने वाचताहेत ही आनंदाची बातमी नक्कीच आहे !
अवांतर :- लेखात मराठी भाषिकांची संख्या ही ९ ’लाख’ लिहिल्या गेली आहे, ९ ’कोटी’ हा योग्य आकडा आहे.
हिवाळ्यातही गारवा छान ऊब देत आहे. अंक मस्त आहे. सर्व मेहनत घेणाऱ्यांचे मनापासून अभिनंदन . कष्टांचे चीज छान झाले आहे.अंक प्रेक्षणीय , वाचनीय आणि श्रवणीय आहे !
अंक वरवर चाळलाय. आता निवांत वाचेन. छानच झालाय अंक! सर्व टीमचे कौतुक व हार्दिक अभिनंदन! :-)
अभिनंदन :) अंक देखणा दिसतोय एकदम. वाचतेय एकेक. या अंकाची मांडणी आवडली.
ह्या अंकाच्या कार्यकारी मंडळींनी मी गायलेली दोन विडंबन गाणी अंकात सहभागी केली म्हणून मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो. प्रमोद देवांच्या सतत पाठपुराव्याने हे शक्य झाले आहे. त्यांनी हि जबाबदारी माझ्या वर थोपली असे तेव्हा वाटले पण मला मिळालेल्या ज्या काही प्रतिक्रीया आहेत त्यातून एक वेगळा आनंद मिळाला. अंक सादर करण्याचा भार उचलणार्या प्रत्येक व्यक्तीला "कर आले जोडूनी जुळल्या सगळ्या त्या आठवणी" पहिल्या अंकाच्या !!
सर्वांचे मन:पूर्वक आभार आणि धन्यवाद.. :)
वाचावयास घेतला आहे.
अभ्यासपूर्ण, उच्च दर्जाचे संपादकीय! अंक सुंदर झाला आहे.
अंक फारच देखणा झालाय. ब्लॉगविश्वात एक नविन पायंडा पाडण्याचा स्तुत्य उपक्रम आहे. अ़ंक वाचतोय.
संपूर्ण संपादकीय वाचले. छान लिहिले आहे.
टिप्पणी पोस्ट करा