कोणार्क सूर्यमंदिर

कोणार्क हे ओदिशातील पुरी जिल्ह्यातले एक लहानसे शहर. कोन्यातील म्हणजे कोपर्‍यातील सूर्य (अर्क = सूर्य) असा कोणार्क याचा अर्थ आहे. १३व्या शतकात इथले सूर्यमंदिर बांधलेले आहे. यालाच ब्लॅक पॅगोडा असेही म्हणतात. पूर्व किनार्‍यावरील अनंतवर्मन चोडगंगदेव याने आपल्या गंग वंशाची सत्ता भारताच्या या पूर्व किनार्‍यावर स्थापन केली. या गंग वंशाच्या नरसिंहदेव (इ.स. १२३६ ते १२६४) या राजाने हे वालुकाश्मातले मंदिर बांधले. जालावर काही ठिकाणी याला लंगूल नरसिंह देव असे देखील म्हटलेले आहे. असो. जगातील सर्वांत आश्चर्यकारक अशा धार्मिक पुराणवास्तूंपैकी एक असलेले हे मंदिर हा ओदिशामधील मंदीरस्थापत्यातील शिरपेंच आहे. ऋग्वेदकालापासून सूर्य ही भारतीयांची लोकप्रिय देवता आहे. सर्वात प्राचीन वाङ्मय असलेल्या ऋग्वेदकालापासून चालत आलेली सूर्यदेवाची खालील प्रार्थना पुढे देत आहे:

आपल्या तेजस्वी किरणावर तोलत चांगले तेच हे सूर्यदेवा तू घेऊन येशील. जन्म घेतलेल्या सर्व प्राणिमात्रांना तू जाणणार्‍या अशा या तुला सूर्यदेवा, तुझा रथ ओढणार्‍या सात अश्विनी तुला आमच्याप्रत घेऊन येत आहेत. हे सूर्यदेवा, तुझी दृष्टी दूरवर पोहोचते, तुझे किरणरूपी केस चमकदार आहेत. या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरलेल्या अंधःकारातून तुझा दिव्य प्रकाश पाहत हे देवाधिदेवा आम्ही तुजप्रत आलेलो आहोत.

कवितेतील प्रतीकांचा अर्थ आपल्याला जर कोणी समजावून सांगितला तर त्या कवितेतील सौंदर्याचे दर्शन झाल्याचा आनंद द्विगुणित होतो. तसेच सुंदर शिल्पकृती पाहताना त्यातील प्रतीकांचा अर्थ समजावून घेतल्यास शिल्पकृतीतले सौंदर्य पाहतानाचा आनंद द्विगुणित होतो. कोणार्क इथे धर्म आणि विज्ञान यांची अप्रतिम सांगड शिल्पकलेशी घातलेली आहे आणि त्यामुळे ही एक अजोड अशी शिल्पवास्तू ठरली आहे. किंवा असं देखील म्हणता येईल की विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी हिंदू धर्मातील अप्रतिम अशी लोकप्रिय प्रतीके इथे शिल्पाकृतीतून वापरलेली आहेत. सूर्याची ही प्रतिमा आर्यांबरोबर भारतात आली. प्राचीन बाबिलोनियन (सध्याच्या इराक) आणि इराणी संस्कृतीतून ही सूर्यप्रतिमा भारतीय संस्कृतीत रुजली असे बहुतेक इतिहासकारांचे मत आहे. परंतु रथाच्या आकाराचे मंदिर बांधण्याची विलक्षण कल्पना मात्र पूर्णपणे अभिनव आणि अलौकिक सृजनाचा स्पर्श असलेली अशी आहे. आणि म्हणूनच हा जागतिक सांस्कृतिक ठेवा आहे असे युनेस्कोने जाहीर केलेले आहे. त्याचबरोबर मंदीरस्थापत्य हा देखील एक मनोरंजक आणि आनंददायी विषय आहे. त्याबद्दल लेख बोजड न करता जमेल तशी वेळोवेळी जास्तीत जास्त सोप्या भाषेत माहिती येईलच.

ओदिशाचा विजयी राजा नरसिंह देव याने युद्धरथाच्या स्वरूपात विजयाचे प्रतीक उभारले. मंदिरांचे नगर असलेल्या पुरीपासून जवळच्या ठिकाणी बांधलेले हे एक सूर्यमंदिर आहे. या स्थानाला त्याने कोणार्क असे नाव दिले. कोणार्क म्हणजे कोपर्‍यातील अर्क = कोपर्‍यातील सूर्य. वास्तू जरी त्याच्या मुस्लिमांवरील विजयाचे प्रतीक असले तरी मंदिराचे नाव मात्र खगोलशास्त्राचेच प्रतीक आहे. खगोलशास्त्राची त्या राजाला अतीव ओढ होती.

मंदिराचा प्रचंड आकार भगवान सूर्यदेवाच्या रथाचा आहे. रथ सात स्वर्गीय घोड्यांनी ओढलेला आहे आणि रथाला चाकांच्या बारा जोड्या आहेत. यापैकी आता सहाच घोडे शिल्लक आहेत. इतिहासात मानवाने महत्त्वाच्या विविध घटनांची नोंद करणे, भविष्यातील लोकांसाठी संदेश देणे, आपल्या भावना, आपले तत्त्वज्ञान याची नोंद करणे यासाठी वाङ्मयातून, दस्तावेजामधून आणि चित्रे, शिल्पे आदी कलाकृतीमधून जागोजाग प्रतीकांचा वापर केलेला आहे. रामायण, महाभारत, ओडिसी इलियड इ. प्राचीन महाकाव्यापासून संत ज्ञानेश्वर, बोरकर, बालकवी, कुसुमाग्रज, मर्ढेकर, ग्रेस, इत्यादी कवी, जी. ए. कुलकर्णी, डॅन ब्राऊन इत्यादींसारख्या आधुनिक काळातील साहित्यिकांनी आपापल्या साहित्यात विविध प्रतीकांचा अप्रतिम असा सौंदर्यपूर्ण वापर केलेला आहे तर काही अभिनव प्रतीके स्वतःच निर्मिलेली आहेत. विविध वास्तूत, शिल्पात देखील अशाच विविध प्रतीकांचा वापर केलेला आहे.

राजा नरसिंह देव याला खगोलशास्त्रात अतीव स्वारस्य होते. सात घोडे हे आठवड्याच्या सात दिवसांचे प्रतीक आणि बारा चाके हे बारा महिन्यांचे प्रतीक समजले जाते. चाके अप्रतिम कोरीव कामाने नटलेली आहेत. प्रत्येक चाकाला आठ अर्‍या आहेत. दिवसाला आठ प्रहर असतात म्हणजे आठ अर्‍या हे आठ प्रहरांचे प्रतीक आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराशी दोन सिंह पहारा देतात. दोन्ही सिंह युद्धातील एकेका हत्तीचा संहार करताना दाखवले आहेत. म्हणजे हिंदू धर्माने बौद्ध धर्मावर विजय मिळवला. सिंह हे हिंदू धर्माचे तर हत्ती हे बौद्ध धर्माचे प्रतीक आहे. हे दोन्ही हत्ती योद्ध्यांच्या एकेका शरीरावर उभे आहेत. सिंह हे शौर्याचे तर हत्ती हे संपत्तीचे देखील प्रतीक आहे. गजांत लक्ष्मी हा शब्दप्रयोग आपण ऐकलेला असेलच . म्हणजे संपत्तीने अगोदर मानवतेचा विनाश केला तसेच शौर्याने संपत्तीवर विजय मिळवला असा देखील यातून अर्थ काढता येतो. मला धर्म, तत्त्वज्ञान यात अजिबात गती नाही. यातील प्रतीकांचे काही अर्थ महाजालावरून उचलले आहेत तर कोणार्कला भेटलेले ‘सरकारमान्य मार्गदर्शक’  श्री. पांडे यांनी काही अर्थ सांगितले आहेत. सूर्यमंदिर दाखवताना पांडेजी जागोजाग वेदातली, गीतेतली संस्कृत वचने देत होते. ढोबळमानाने संस्कृत मला कळते पण त्यांनी दिलेल्या संदर्भातली अचूकता जाणण्याचे ज्ञान मात्र माझ्याकडे नाही. रवींद्रनाथ टागोर म्हणतात, "इथे पाषाणांच्या भाषेने मानवी भाषांना मागे टाकले आहे." सूर्यमंदिर पाहताना आलेला विस्मित करणारा अनुभव शब्दांकित करणे सर्वसामान्यांना तरी कठीणच आहे.

विज्ञानाच्या दृष्टीतून मात्र हे मंदिर हे सूर्याच्या सार्वभौम अशा वैश्विक साम्राज्याचे प्रतीक म्हणजे सूर्यकेंद्री विश्वाचे प्रतीक आहे तसेच हे कालमापनाचे देखील प्रतीक आहे. म्हणजे गॅलिलिओच्याही पूर्वी तेराव्या शतकात पाश्चिमात्य जगतात जेव्हा चर्चच्या प्रभावाखाली पृथ्वीकेंद्री खगोलशास्त्राचा पगडा होता तेव्हा भारतात मात्र आर्यभट, भास्कराचार्य यांच्यासारख्या प्रतिभावंत वैज्ञानिकांनी तसेच गणितज्ञांनी मांडलेली सूर्यकेंद्री विश्वाची संकल्पना प्रागतिक विचारांच्या राजांनी स्वीकारली होती. कोणार्कखेरीज जयपुरमधील आणि दिल्लीतील जंतरमंतर हे याचे आणखी पुरावे आहेत. जयपुरमधील जंतरमंतर हे प्रथम रजपूत राजे जयसिंह-२ यांनी नमुना म्हणून जयपुरला बांधले आणि त्यानंतर त्याचीच प्रतिकृती असलेले दिल्लीतील हे जंतरमंतर त्यांनीच नंतर मोहम्मद शाह यांच्या कालात इ.स. १७२७ ते १७३४ या काळात उभारले.

असो. कोणार्कचा समुद्रकिनारा लोकप्रिय आहे. आज हा किनारा मंदिरापासून २ किमी. दूरवर गेला आहे. परंतु त्या काळी समुद्र मंदिराच्या पायापाशी होता. समुद्रकिनार्‍यावर जाणार्‍या रस्त्याच्या दुतर्फा दमट वाळूत उगवलेली तिवरसदृश झाडे आहेत. मुंबईच्या किनार्‍यावर दलदलीत वाढणारी झाडे आहेत तशी. यावरून अंदाज बांधता येतो की या पाणथळीत झाडामध्ये वाळू आणि गाळ साचून इथे जमीन तयार झाली असावी आणि त्यामुळे समुद्र मागे हटला असावा. इथल्या समुद्राची शांतता मात्र फसवी आहे. तरी मुख्य आकर्षण मात्र कोणार्क मंदिरच आहे. प्रखर राष्ट्राभिमानाचे हे भव्य असे प्रतीक आहे. गोलाकार कळसांनी युक्त अशा कलिंग स्थापत्यशैलीतले हे मंदिर आहे. मुख्य कळस - यालाच रेखा देऊळ असेही म्हणतात - आता जरी नाहीसा झाला असला तरी तो लिंगराज आणि जगन्नाथ मंदिरांच्या कळसाशी मिळताजुळता होता. कळसाची जमिनीपासूनची उंची मात्र या दोन्ही मंदिरांवर मात करणारी अशी २२९ फुटांची होती. तुलनेसाठी देतो, पुरीचे जगन्नाथमंदिर आहे २१४ फूट तर भुवनेश्वरचे लिंगराजमंदिर १८० फूट. गाभार्‍यातील मूळ देवतेची मूर्ती नाहीशी झालेली आहे. सभागृह मात्र सुरक्षित आहे. आवार ८५७ फूट X ६१३ फूट आहे. सभागृह १२८ फूट उंच आहे. पूर्वमुखी मंदिर पूर्वपश्चिम आहे. सुरू आणि वालुकामय जमिनीत वाढणार्‍या इतर अनेक वृक्षांच्या छायेने इथला नैसर्गिक परिसर व्यापलेला आहे. बहुतांशी निसर्ग अजून तरी अबाधित आहे. मंदिराचे दगड सांधायला कोणताही चुना किंवा सिमेंट वापरलेले नाही. काचेच्या गुळगुळीत पट्ट्या जश्या एकमेकींना गोंदाने चिकटवल्यासारखा आपोआप घट्ट चिकटतात तस्सेच या मंदिराचे दगड एकमेकांना नुसतेच घट्ट चिकटून आहेत. आवश्यक तिथे दगडांना छिद्रे पाडून लोखंडी पिनांनी सांधे पक्के केलेले आहेत. काही ठिकाणी उघड्या पडून दमट हवेमुळे गंजलेल्या लोखंडी पिना आजही स्पष्ट दिसतात. 

प्रवेशद्वारापाशीच एक नटमंदीर आहे. सूर्याच्या उपासनेचा एक भाग म्हणून नर्तक इथे नृत्य करीत असत. त्याच रेषेत मुख्य मंदिराला जोडून ३० फूट चौरस आणि ३० फूट उंच असे जगमोहन म्हणतात ते सभागृह आहे. पाश्चात्यांच्या मते जगमोहन हे मुख्य मंदिराचे पोर्च म्हणता येईल. ओदिशात तशी इतरही अनेक मंदिरे आहेत. परंतु हे मंदिर ओदिशातील इतर मंदिरांच्या तुलनेत जास्त स्थापत्यसंतुलित वाटते. गाभार्‍यावरचे आणि नटमंदिरावरचे छत पडलेले आहे. गाभार्‍याला तीन बाजूंनी पुढे आलेल्या सूर्यदेवाच्या तीन सुंदर मूर्तींमुळे शोभा आली आहे. पूर्वाभिमुख मंदिरात सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणे थेट या मूर्तीपर्यंत पोहोचतात. दररोज या तीन सूर्यमूर्तींपैकी किमान एका तरी सूर्यमूर्तीवर सकाळची कोवळी सूर्यकिरणे पडावीत अशी योजना स्थापत्यकारांनी केलेली आहे. गाभारा आणि जगमोहन एकाच चौथर्‍यावर आहेत. मुख्य मंदिरावर सर्व बाजूंनी नक्षीदार वेलबुट्ट्या आणि भौमितिक आकृत्या कोरलेल्या आहेत तसेच नर्तकांच्या यक्षांच्या तसेच देवदेवतांचा भावविभोर नृत्याकृती आहेत. बहुतेक नृत्याकृतीत कामसूत्रातून घेतलेली कामुक हावभाव करणारी जोडपी आहेत. कालौघात वातावरणामुळे शिल्पे झिजली आहेत परंतु मूळ शिल्पातल्या कोरीवकामाचे सौंदर्य लपत नाही.

मंदिराच्या काही भागाची पडझड झालेली आहे. प्रमाणबद्ध आकार हे या मंदिराच्या स्थापत्याचे वैशिष्ट्य. सूर्यमंदिर वस्तुसंग्रहालयात पडझड झालेल्या भागातील मूर्ती जपून ठेवलेल्या आहेत. संग्रहालय भारतीय पुरातत्त्व विभागाने चालवलेले आहे. अशी माहिती वाचली. परंतु प्रत्यक्षात ते संग्रहालय तिथे सापडले नाही.

जगमोहनचे छत तीन मजल्यात विभागले आहे. प्रत्येक मजल्यात मानवी आकाराएवढ्याच अप्रतिम अशा आकर्षक पोषाखात नटलेल्या स्त्रीमूर्ती आहेत. छायाप्रकाशाच्या खेळामुळे आतील दृश्य अगदी चित्रवत वाटते. भव्यता आणि शैलीच्या बाबतीत तर हे दृश्य अजोड आहे. भव्यदिव्य संकल्पनेतले हे मंदिर भव्य आकारामुळे आणि प्रमाणबद्ध रचनेमुळे तसेच स्थापत्यशास्त्रीय भव्यता आणि रेखीव वळणदार सौंदर्य यामुळे भारतातील सर्वात ठळक वास्तू बनले आहे.

३.९ मी उंच चौथरा एका बसक्या जोत्यावर आहे. या जोत्याला ओदिशाच्या स्थापत्यशैलीत बडा किंवा पिष्ट असे म्हणतात. चौथर्‍यावरून दक्षिण, पश्चिम आणि उत्तर अशा तीन दिशांना वर चढून जायला पायर्‍या आहेत. दर्शनी बाजूला मंदिराच्या पायाजवळून भिंतीवरून जाणारी friezes - चित्रपट्टी किंवा चित्रपट्ट कोरलेला आहे. यावर गजदळ, घोडदळ, पायदळ वगैरे चतुरंग सेनेची मिरवणूक आहे, शिकारीची दृश्ये आहेत, वृक्ष उपटून टाकणारे हत्ती, बाळांना पाजणार्‍या स्त्रिया, हत्तीला काबूत आणण्याचा प्रयत्न करणारे माहूत, प्रवाशांचे तांडे, धावपटूंच्या रांगा, स्वयंपाक रांधणार्‍या स्त्रिया असे असेच रोजच्या जीवनातले विविध प्रसंग कोरलेले आहेत. या चिरंतन स्मारकातून तत्कालीन घरगुती तसेच सामाजिक जीवनाची कल्पना यावी वा तशी नोंद करणे हा हेतू असावा. कोरलेल्या प्राण्यांपैकी दक्षिणेच्या बाजूचा जिराफावरून आपल्या ध्यानात येते की १३व्या शतकात त्या कोणार्क साम्राज्याचे व्यापारी संबंध पार आफ्रिकेपर्यंत पोहोचले होते.

चौथर्‍याचे पाच वैशिष्ट्यपूर्ण थरांचे पाच आडवे भाग पडतात. ही या एकाच मंदिराची खासियत आहे. यावर नक्षीदार वेलबुट्टी आहे आणि शेवटी चैत्य प्रतीकांच्या चौकटी आहेत.

चौथर्‍याच्या खालच्या तळघरासारख्या भागाचे सरळसोट उभ्या भिंतींनी भाग पाडून उपमंदिरे केलेली आहेत. चौथर्‍याखालच्या या तळघरात तीन छोटेखानी उपमंदिरे आहेत. इथून तीन सूर्यप्रतिमांकडे नेणार्‍या पायर्‍या आहेत. प्रत्येक उपमंदिरात रिकाम्या खोबणीत यात्रेला निघणारी, केस धुणारी, वीणावादन करणारी, पक्ष्याला गोंजारणारी अशी स्त्रीची विविध रूपे दाखवणारी स्त्रीशिल्पे आहेत.

त्यामधील भिंतींवर विविध प्रतीके, कामुक युगुले, आपल्या सौंदर्याचे प्रदर्शन करून उत्तान हावभाव करीत आव्हान देणार्‍या कामातुर तरुणी, नागनागिणीनी विळखा घातलेले मानवी अर्धशरीरे, बहुछत्री मेघडंबरी आणि सर्पपुच्छ आढळतात.

इमारतीमध्ये कधीकधी स्तंभाचा मागील उभा अर्धा भाग भिंतीत असतो व उरलेला अर्धा भिंतीतून पुढे आलेला असतो. अशा स्तंभांना pilasters म्हणतात. आपण त्यांना अर्धस्तंभ म्हणूया. चौथर्‍याच्या मध्यभागावर वरच्या विभागात पंचरथाचे अर्धस्तंभ आहेत. पंचरथ याचा अर्थ समजण्यासाठी सोबतचे Parts of Temple हे चित्र पाहा. अर्धस्तंभांवर बारीक कोरीव काम आहे. त्यात महिषासुरमर्दिनी (शाक्त संप्रदाय), जगन्नाथ (वैष्णव संप्रदाय), शिवलिंग (शैव संप्रदाय) इत्यादी आकृती कोरलेल्या आहेत. यावरून विविध संप्रदायांची एकमेकांबाबतची सहिष्णू वृत्ती दिसून येते.

इतर शिल्पांमध्ये, हत्तीवर आरूढ झालेला राजा, मंडपात बसलेल्या राजपुत्रांना वा उमरावांना प्रवचन दिले जात असतानाचे दृश्य आहे. त्याखाली त्यांचे हत्तीघोडे इत्यादी वाहने उभी आहेत तसेच काही साधी कौटुंबिक दृश्ये आहेत. चौथर्‍याच्या सर्वांत वरच्या बाजूच्या पट्टीवर कवाईत करीत जाणारे सैन्य, हत्तीचे कळप आणि राजदरबार यांची प्रतीके आहेत, त्याखाली आडवी खोबणपट्टी आहे.

रथचक्रे आणि त्यांचे अक्ष बारीक कोरीवकाम केलेले आहेत. रथचक्राचा व्यास २.९ मीटर आहे. जगमोहनच्या बाहेरील भिंतीला  बाहेरून रथचक्रे आसांसह दिसतात. चक्राबाहेर आसांत बसवलेली खुंटी (axle pin) देखील दिसते. चक्राचा मध्यभाग मणी ओवलेल्या अर्‍यांनी तसेच कमलपाकळ्यांनी सजवलेला आहे. प्रत्येक अरीच्या मध्यभागी सुबक वर्तुळाकार पदके आहेत. या पदकांवर विष्णू आणि सूर्य यांच्या आकृत्या कोरलेल्या आहेत. आपल्या सौंदर्याचे प्रदर्शन करून उत्तान हावभाव करीत आव्हान देणार्‍या कामातुर तरुणी, सरदार तसेच प्राणी आहेत.
मंदिरासंमुख आपण उभे राहिलो की उजव्या बाजूला दोन शाही हत्तींच्या प्रचंड आकृत्या आहेत.

नवग्रहदेवता असलेली एका प्रचंड शिळेला नवग्रहशिळा म्हणतात. ही नवग्रहशिळा मंदिराचे रक्षण करते असे मध्ययुगीन स्थापत्यात मानले जात होते ओदिशातील बहुतेक मंदिरात अशी नवग्रहशिळा दिसून येते. मुख्यशाळेच्या म्हणजेच जगमोहनच्या समोरील दरवाज्यावर सुमारे १८ फुटांवर एक सजलेली नवग्रहशिळा बसवलेली होती. क्लोराईटची ही शिळा १९ फूट १० इंच लांब, ४ फूट ९ इंच रुंद आणि ३ फूट ९ इंच उंच आहे आणि हिचे मूळ वजन २६.२७ टन होते. इ. स. १६२८ मध्ये खुर्दाच्या तत्कालीन मांडलिक राजाने (याचे नाव देखील नरसिंह देव असे होते) ती दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न केला होता.

नवग्रहशिळेवरील प्रतिमा कोरण्याचे काम मात्र नीट केलेलं नाही. बर्‍याच प्रतिमा समूहाने एकाच आकारात बनवलेल्या वाटतात. बहुतेक मूर्तींच्या हातात जपमाळ आणि कमंडलू असून उंच टोकदार मुकुट घालून कमळावर बसलेल्या दिसतात. पुराणात याचे स्पष्टीकरण सापडते.

असो. कठोर काळाच्या फेर्‍यातून मात्र नवग्रहशिळा देखील काही सुटली नाही आणि फार काळ ती आपल्या जागी स्थिर राहू शकली नाही. १९व्या शतकाच्या शेवटी बंगाल एशियाटिक सोसायटीच्या सभेच्या वेळी समुद्रतीरापर्यंत ट्रामगाडीची सेवा सुरू करताना बंगाल सरकारने शिळा कलकत्त्याला नेण्याचा प्रयत्न केला. परंतु जेमतेम २०० फूट ती वाहून नेल्यावर त्यांच्याकडील निधी संपून गेला. नंतर पुन्हा काही वर्षांनी तसाच प्रयत्न झाला. वाहून नेणे सोपे जावे म्हणून शिळेचे दोन भाग करण्यात आले. तरीही प्रचंड वजनामुळे आणि वालुकामय मार्गामुळे ती काही हालवता आली नाही. शेवटी दोन फर्लांगावर ती सोडावी लागली. इथे ती साठ वर्षांपेक्षा जास्त काळ पडून होती. अगदी अलीकडे भारत सरकारने कोणार्क मंदिराच्या आवाराजवळच  एका मंडपात तिची स्थापना केली. सध्या शिळेचा मोठा भाग आवाराबाहेर आग्नेय दिशेला आहे.

आता दर शनिवारी तसेच मकरसंक्रातीला अनेक लोक या शिळेची म्हणजे नवग्रहांची होमहवनादी पूजा करून नैवेद्य अर्पण करायला कोणार्कला जमतात.

दरवर्षी डिसेंबरमध्ये इथे अभिजात भारतीय शास्त्रीय नृत्याचा समारोह होतो. यात ओदिशी म्हणजे ओडिसी शैलीचीही नृत्ये असतात. आणखी एक महत्त्वाचे सांगायचे म्हणजे एका खग्रास सूर्यग्रहणाचा मार्ग कोणार्कवरून गेला होता.

काळाच्या ओघात कोणार्क, तिथली मंदिरे आणि पवित्र स्थाने यांभोवती असलेले कीर्ती आणि समृद्धीचे वलय लोपले. या वास्तूची समृद्धी आणि हे वलय किती काळ होते आणि नक्की केव्हा ते लयाला गेले याबद्दल नक्की काहीही सांगता येत नाही. मंदिराची अशी दुर्दशा कशी काय झाली याला १०० टक्के विश्वासार्ह असा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. याबाबत इतिहास मूक आहे. काळाच्या गडद धुक्यात हे गूढ दडलेले आहे. परंतू या अप्रतिम मंदिराच्या पतनाबद्दल इतिहासकारांनी विविध तर्काधिष्ठित मते मांडलेली आहेत. ती पुढे देतो.
   
१. अपूर्ण बांधकाम: काही इतिहासकारांच्या मतानुसार या मंदिराचा कर्ता राजा नरसिंह देव हा मंदिराचे बांधकाम सुरू असतांनाच निवर्तल्यामुळे मंदिर अर्धवट अवस्थेत राहिलेले आहे. म्हणून मग अर्धवट राहिलेले बांधकाम कोसळले असावे. परंतु या मताला ऐतिहासिक कागदपत्रांचा मात्र आधार नाही. पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील मदाल पानजी याच्या तसेच १२७८ मधील एका ताम्रपटानुसार अभिलेखानुसार मंदिरकर्ता राजा नरसिंह देव याने १२८२ पर्यंत राज्य केले. बहुतेक इतिहासकारांच्या मतानुसार कोणार्क मंदिर १२५३ ते १२६० या काळातच बांधले गेले. म्हणून मग राजा निवर्तला तेव्हा मंदिराचे अर्धवट राहिलेले बांधकाम नंतर कोसळले या तर्काला पुष्टी मिळत नाही.

२. अपवित्रता: धर्मपादाच्या दंतकथेनुसार शिरोशिला बसवल्यावर धर्मपादाने आत्महत्या केल्यामुळे मंदिर अपवित्र झाले. त्यामुळे दुर्दैवाच्या फेर्‍याकडे नेऊ शकणारी ही अपेशी वास्तू स्वीकारली गेली नाही. याची दंतकथा पुढे क्रमांक ११वर दिलेली आहे. परंतु पुरीच्या मदाल पानजी इथल्या कागदपत्रात तसेच इतरही अनेक इतिहासकारांनी नमूद केलेले आहे की मंदिरात सूर्यदेवतेची स्थापना झाली आणि तिची कैक वर्षे नियमितपणे पूजा होत असे. त्यामुळे उपलब्ध पुरावे विरुद्ध जात असल्यामुळे ही कारणमीमांसा स्वीकारार्ह नाही.

३. मंदिरावर एक प्रचंड आणि प्रभावशाली लोहचुंबक भारशिला असल्यामुळे जहाजे इथे आकृष्ट होतात आणि विनाश ओढवून घेतात असे काही दंतकथांत म्हटलेले आहे. आणखी काही दंतकथांत म्हटले आहे की इथल्या भारशिलेतील लोहचुंबक गुणधर्मामुळे जहाजांची होकायंत्रे नीट काम करीत नसत आणि ती जहाजे मग भरकटत. म्हणून मग पोर्तुगीज किंवा मुस्लिम दर्यावर्दींनी इथली लोहचुंबक भारशिला काढून नेली. ही लोहचुंबक भारशिला मंदिराचा आधाराची मुख्य शिला किंवा मर्मशिला होती. या शिलेला दधिनौती असे देखील म्हणतात. याच शिलेच्या आधारामुळे इतर शिला आणि लोखंडी स्तंभ संतुलित राहिले होते. ही शिला काढल्यामुळे स्थापत्यशास्त्रीय संतुलन ढळले आणि मंदिराचा काही भाग पडला असावा. परंतु या तर्कालाही कागदोपत्री असा काहीही आधार नाही आणि इथे लोहचुंबक भारशिला वगैरे असल्याचा विश्वासार्ह ऐतिहासिक पुरावा देखील कोठे सापडत नाही. तसेच अशा उल्लेखात भौतिकशास्त्रीय दृष्ट्या हे बरोबर आहे की काय याचा भौतिकशास्त्रीय प्रयोगाने पडताळाही केल्याचाही कुठे उल्लेख नाही.

४. कोणार्क मंदिर पडण्याची आणखी एक कारणमीमांसा - ही सर्वात लोकप्रिय आहे - काळापहाड म्हणून दिली जाते. ओदिशाच्या इतिहासाप्रमाणे बंगालचा सुलतान सुलेमान खान कर्रानी याचा सेनानी काळापहाड याने १५०८ मध्ये ओदिशावर आक्रमण केले. काही कागदपत्रांनुसार काळापहाड हा हिंदू कायस्थ अधिकारी होता. परंतु नंतर त्याने इस्लाम स्वीकारला. शेख कबीर बातिनी याच्या अफसाना-इ-शहान प्रमाणे मात्र तो एक बातिनी अफगाण होता.

तर अशा या तथाकथित धर्मांध काळापहाडने कोणार्क मंदिर आणि अनेक हिंदू मंदिरांचा विध्वंस केला. मदाल पानजी या पुरीच्या जगन्नाथाच्या मंदिरात हा इतिहास सापडतो. १५०८ मध्ये त्याने ओदिशावर कसा हल्ला केला त्याचे वर्णन आहे. कोणार्क मंदिरासहित त्याने ओदिशामधील अनेक हिंदू मंदिरातील मूर्तींचा विध्वंस केला. २०-२५ फूट रुंद दगडी भिंती असलेले कोणार्कचे सूर्यमंदिर तोडणे तसे अशक्यच होते. कसेतरी करून त्याने मग ‘दधिनौती’ म्हणजे कमानीची मुख्य आधारशिळा किंवा मर्मशिळा काढून टाकली आणि मंदिर पडायला वाव दिला. मग सावकाश ते टप्प्याटप्प्याने पडत गेले. बहुतेक मूर्ती त्याने फोडल्या आणि कोणार्कची इतर उपमंदिरे त्याने उद्ध्वस्त केली. परंतु दधिनौती काढण्यात मात्र त्याला यश मिळाले. दधिनौती काढल्यामुळे मंदिर टप्प्याटप्प्याने पडत गेले आणि वरून मंदिराचे दगड पडत राहिल्यामुळे मुखसालेच्या (याचा अर्थ बहुधा मुख = मुख्य, साला = शाळा म्हणजे सभागृह असा असावा) छताचे नुकसान झाले. भुवनेश्वरला फिरताना स्थानिक वाटाडे म्हणजे गाईड तोडफोड केलेली अनेक उद्ध्वस्त मंदिरे दाखवतात आणि ती काळापहाडने उद्ध्वस्त केली आहेत असे सांगतात.

५. सुमन्यूचा शाप: ओदिशातले थोर महाकवी श्री राधानाथ राय यांनी एका काव्यात चंद्रभागा म्हणून कथा सांगितली आहे. या कथेत या मंदिराच्या अधःपतनाची कथा आहे. सूर्यदेवाने सुमन्यू ऋषींची कन्या चंद्रभागा हिच्याशी गैरवर्तन केल्यामुळे तिने आत्महत्या केली. म्हणून मग सुमन्यू ऋषींनी सूर्यदेवाला शाप दिला. त्यामुळे सूर्यदेवाचे मंदिर कोसळले. अर्थातच इतिहास अशा अशास्त्रीय दंतकथांचा तसेच कितीही उत्कृष्ट असले तरी महाकाव्याचा स्वीकार ऐतिहासिक आधाराअभावी करू शकत नाही. परंतु आपले मनोरंजन मात्र चांगले होते.

६. स्थापत्यशास्त्रीय त्रुटी: काही अभियंत्यांच्या मते जसजसे मंदिराचे बांधकाम होत गेले तसतसे तत्कालीन पद्धतीप्रमाणे मंदिरात आतून व बाहेरून वाळू भरण्याचे काम सुरू झाले. आतली व बाहेरची वाळू पूर्ण काढल्यानंतर भिंतीवरील दाबाचे संतुलन ढळल्यामुळे मंदिर पडले. परंतु बर्‍याच इतिहासकारांनी हे स्वीकारलेले नाही कारण मंदिरात सूर्यदेवाचे सिंहासन आहे. मुळात अशी वाळू भरण्याची पद्धत तेव्हा प्रचलित होती हेच बहुसंख्य इतिहासकारांनी स्वीकारलेले नाही. त्याखेरीज इतर ठिकाणच्या कागदपत्रात (उदा. पुरी येथील मदाल पानजी) मंदिरात नियमितपणे पूजापाठ चालत असल्याचेही नमूद केलेले आहे त्याचे काय? असा त्यांचा रास्त आक्षेप आहे.

७. भूकंप: काही संशोधकांच्या मते भूकंपामुळे मंदिर पडले. जबरदस्त भूकंपामुळे एवढे मजबूत बांधकाम पडणे अशक्य नाही. परंतु असा जबरदस्त भूकंप झाल्याची आसपास कुठेही नोंद नाही हे कसे काय?  हे मंदिर पडण्याएवढा जोरदार भूकंप झाला असता तर संपूर्ण कोणार्क प्रदेश उद्ध्वस्त झाला असता आणि कुठेतरी त्याची नोंद सापडली असती. जर खाली परिच्छेद क्र. ११मध्ये उल्लेख केलेल्या  दंतकथेतले धर्मपाद, रामचंडी, बिशू महाराणा इतकी वर्षे लोकांच्या लक्षात राहतात तर भूकंपाच्या कथा राहिल्या नसत्या का? इतर भूकंपग्रस्त वास्तूंचे पडझड झालेले अवशेष आजूबाजूला सापडले नसते का? इथे मात्र असे काहीही आढळत नाही.

८. वीज पडणे: वीज पडून मंदिराची पडझड झाली हा दावा देखील स्वीकारार्ह नाही. मंदिराच्या भिंती २० ते २५ फूट रुंद असल्यामुळे वीज पडून एवढी पडझड अजिबात होऊ शकत नाही.

९. कमकुवत पाया: असेही म्हटले गेलेले आहे की कमकुवत पाया एवढ्या अवजड मंदिराचा भार पेलू शकला नाही. मंदिराचा पाया भक्कम होण्यासाठी तो नदीच्या खोल खबदाडीत  घातलेला आहे. तसेच पाया खचल्याच्याही कोणत्याही खाणाखुणा आढळत नाहीत. त्यामुळे या तर्काला पुष्टी मिळत नाही.

१०. उडणारे सिंह: अलीकडच्या काही संशोधकांचे असे मत पडले की सूर्यमंदिरावर, बरोबर जगमोहनवर सिंहाच्या चार प्रचंड दगडी मूर्ती होत्या. यापैकी एका मूर्तीचे तीन तुकडे मंदिरात तीन ठिकाणी सापडतात. एवढ्या प्रचंड वजनाच्या मूर्तींमुळे असंतुलन झाले. ते असंतुलित वजन त्या भिंतींना पेलवले नाही व त्या कोसळल्या. पण या दाव्यावर निष्कर्ष काढण्यासाठी आवश्यक असलेला सखोल अभ्यास अजून व्हावयाचा आहे.

११. आता दंतकथांबद्दल. गंग वंशाचा राजा नरसिंह देव - १ याने आपल्या राजवंशाच्या राजकीय सर्वश्रेष्ठतेचे प्रतीक म्हणून हे मंदिर बांधायला आदेश दिला. बाराशे स्थापत्यशास्त्रज्ञ आणि कुशल कारागीर यांनी आपल्या आयुष्यभराची प्रतिभा, आपले अविश्रांत श्रम आणि पूर्ण कसब तब्बल बारा वर्षे पणाला लावले. तेवढाच काल राजाने जमा झालेली करसंपत्ती खर्च केली. तरीही पूर्णत्वाचे चिन्हही कुठे दिसेना. मग ठरलेल्या दिवशी काम पूर्ण झालेच पाहिजे, अन्यथा सर्व शिल्पकारांना देहदंड होईल असा अंतिम आदेश त्याने काढला. सिबेई सामंतराय या प्रमुख सूत्रधाराने म्हणजे स्थापत्यकाराने असमर्थता दर्शवली. तेव्हा बिशू महाराणा या स्थापत्यशास्त्रज्ञाने ते पूर्ण केले. परंतु मर्मशिला आणि कळस बसवायचे काम मात्र अजून जमले नव्हते. सगळ्या स्थापत्यचमूने आता हात टेकले होते.  

बिशू महाराणाचा बारा वर्षांचा मुलगा धर्मपाद हा तिथे सहज मंदिर बांधायचे काम कसे काय चालते ते बघायला आला. स्थापत्यशास्त्रज्ञांना भेडसावणारी चिंता त्याला जाणवली. मंदिर बांधण्याचा तसा त्याला अनुभव नव्हता. तरीही मंदिर बांधण्याच्या स्थापत्यशास्त्राचे सखोल ज्ञान त्याला होते. मंदिराच्या शिरोभागी स्थापन करायची मर्मशिला बसवायचे कठीण असे गणिती सूत्र सोडवायचे आव्हान त्याने स्वीकारले आणि ते काम स्वतःच करून त्याने सर्वांना चकित केले. परंतु ही कामगिरी केल्यानंतर थोड्या दिवसातच त्या बालबृहस्पतीचे कलेवर समुद्रकिनारी मंदिरापाशीच आढळून आले. (तेव्हा समुद्रकिनारा मंदिराला लागूनच होता. आता तो २ किमी दूरवर गेला आहे.) आत्महत्या किंवा खून! बारा वर्षाच्या धर्मपादाने आपल्या समाजासाठी स्वतःचे प्राण वेचले असेच ही दंतकथा सांगते. एकापेक्षा एक श्रेष्ठ स्थापत्यशास्त्रज्ञ असताना एक बारा वर्षांचा मुलगा हे काम करून दाखवतो हे त्या ढुढ्ढाचार्‍यांना सहन झाले नाही. त्यामुळे त्यांनी कामात त्रुटी ठेवली आणि नंतर धर्मपादाचाही काटा काढला. याच त्रुटीमुळे नंतर मंदिर पडले. हे सत्य जर असेल तरी याला स्वीकारार्ह असा ऐतिहासिक पुरावा मात्र नाही. सत्य आणि कल्पिताची एकजिनसी सरमिसळ, दुसरे काय?

१२. घिसाडघाईने केलेले काम: काही संशोधकांच्या मते मंदिराचे काम पूर्ण करण्याच्या घिसाडघाईत मर्मशिला बसवण्याचे काम योग्य रीतीने झाले नाही. असंतुलित भार भिंतींवर आला आणि कालांतराने मंदिर पडले. यालाही स्वीकारार्ह असा ऐतिहासिक पुरावा नाही.

ते कारण काहीही असो. एक मात्र खरे की १५६८ पासून ओदिशा (ब्रिटिशांनी केलेला अपभ्रंश = ओरिसा) मुस्लिम अमलाखाली आला. हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न झाले आहेतच. पुरीच्या पंड्यांनी (पुजार्‍यांनी) मग जगन्नाथाच्या मूर्तीची विटंबना होऊ नये म्हणून ती काढून गुप्त ठिकाणी ठेवून दिली. त्याचप्रमाणे असेही म्हटले जाते की कोणार्कच्या पंड्यांनी सूर्यदेवतेची मुख्य मूर्ती काढून कित्येक वर्षे वाळूत पुरून ठेवली होती. नंतर ती मूर्ती उकरून काढून पुरीला नेऊन पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील इंद्राच्या मंदिरात नेऊन ठेवली. इतरांच्या मते मात्र कोणार्कची मूर्ती अजून सापडलेली नाही. परंतू दिल्लीच्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात ठेवलेली सूर्यप्रतिमा ही कोणार्कच्या मंदिरातीलच असू शकेल असेही ते म्हणतात.

जाताजाता सांगतो की पुरीच्या मंदिराच्या हिंदू देवतांच्या प्रतिमा धर्मवेड्या मुस्लिम शासकांच्या दृष्टीला पडल्या तर ते त्या फोडतील म्हणून हिंदूंनी पुरीच्या मंदिराच्या सर्व भिंती चुन्याने लिंपल्या. त्यामुळे कोणार्क मंदिराला दर्यावर्दी प्रवासी ब्लॅक पॅगोडा म्हणत तर पुरीच्या जगन्नाथ मंदिराला व्हाईट पॅगोडा. या चुन्याखाली सुंदर कोरीव काम आहे हे गेल्या तीसचाळीस वर्षातच कधीतरी चुन्याचा लेप निघाल्यामुळे ध्यानात आले व चुना काढून कोरीव काम उघडे केले.

असो. तथापि मूर्ती नाहीशी वा स्थलांतरित झाल्यावर तेथील पूजा बंद पडली ती पडलीच. कोणार्कची यात्राही मग बंद पडली. चाच्यांच्या उपद्रवामुळे कोणार्कचे बंदरही बंद झाले. कोणार्क हे जसे सूर्यपूजेसाठी दिमाखदार शहर होते तसेच ते व्यापारासाठीही वैभवशाली होते. दोन्ही बंद पडल्यावर मग कोणार्कचे अरण्य न व्हायला काही कारणच उरले नाही.

ओदिशामधे सध्या खुर्दा म्हणून एक जिल्हा आहे. १६२६ मध्ये तिथला तेव्हाचा राजा नरसिंह देव, हा राजा पुरुषोत्तम देव याचा मुलगा, मंदिराचा कर्ता नव्हे, मुघल दरबारातील राजा मान सिंग या राजस्थानी राजाचा मांडलिक होता. या मांडलिक नरसिंह देव याने मुख्य सूर्यमूर्ती आणि सूर्य आणि चंद्र यांच्या इतर दोन प्रतिमा पुरीला नेल्या. आता त्या दोन प्रतिमा पुरीच्या जगन्नाथाच्या मंदिराच्या आवारात आहेत.

पुरीच्या मदाल पानजी इथल्या कागदपत्रांवरून असे दिसते की १६२८ मध्ये वर उल्लेख केलेल्या खुर्दाचा मांडलिक राजा नरसिंह देव याने कोणार्कच्या मंदिराची मापे घेण्याचा आदेश दिला. मापे घेतली गेली तेव्हापर्यंत अमालकापर्यंत मंदिर धडधाकट उभे होते. म्हणजे २०० फूट उंचीपर्यंत. काळापहाडने इथला फक्त कळस, शिलामुकुट, पद्मध्वज आणि वरचा काही भाग उद्ध्वस्त केला होता.

ओदिशातील नागर शैलीतल्या मंदिराचा सर्वांत उंच कळस हा नेहमी गाभार्‍यावरच असतो. कळस हा एका आवळ्याच्या आकाराच्या चपट्या चेंडूसारख्या गोल फुगीर चक्रावर बसवलेला असतो. याला अमालक म्हणतात. सोबतचे हे चित्र पाहा.

वर म्हटल्याप्रमाणे मुख्यशाळेच्या दारातच नवग्रह पाटा नावाची अजस्त्र शिळा होती. खुर्दाच्या तत्कालीन राजाने ती दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न केला होता. नंतरची कथा वर आली आहेच. मग कोणार्कच्या मंदिरातून त्याने कोरीव काम केलेल्या इतर अनेक शिळा काढून त्या वापरून पुरीच्या मंदिराचे बांधकाम केले. मराठ्यांच्या काळात देखील कोणार्कच्या मंदिरातील सुंदर कोरीव काम केलेल्या शिळा वापरून पुरीच्या मंदिराची बाहेरील भिंत बांधून काढली.

कागदपत्रांवरून असेही दिसते की कोणार्कचे नटमंदीर मुख्य मंदिराच्या इतर भागांच्या मानाने बराच काळ सुस्थितीत होते. परंतु मराठ्यांच्या शासनकाळात ती एक निरुपयोगी वास्तू आहे म्हणून तिची कोणीतरी बांधकामसाहित्य काढून घेण्यासाठी तोडफोड केली. 

इ.स. १७७९ मध्ये एका मराठा साधूने कोणार्कचा अरुण स्तंभ काढून पुरीच्या सिंहद्वारासमोर स्थापित केला. अशा तर्‍हेने १८व्या शतकाच्या अखेरपर्यंत कोणार्कचे सर्व वैभव लयाला गेले आणि त्याला एका अरण्याचे स्वरूप आले. कालांतराने मंदिराचा परिसर निर्जन झाला, एका रेतीने भरलेल्या, हिंस्र श्वापदांचा मुक्त वावर असलेल्या अरण्याने व्यापून गेला आणि तो सागरी चाच्यांचा निवासस्थान बनला. स्थानिक लोक दिवसाढवळ्या देखील तिथे जायला घाबरत असे सांगितले जाते. 

ही सर्व मीमांसा पं. सदाशिव राथशर्मा यांच्या ‘सन टेंपल ऑफ कोणार्क’ या ग्रंथात केलेली आहे. त्यामुळे त्यांना पद्मश्री - बहुधा ओदिशामधील पहिलीच - तर मिळालीच परंतु कोणार्कवरील संशोधनाला पुढे चालना मिळाली. यानंतरचे कोणार्क मंदिरावरील सर्व ग्रंथ या ग्रंथातील विवेचनावरच आधारित आहेत आणि त्यानंतर (कोणार्कच्या र्‍हासाची) कोणतीही नवीन कारणमीमांसा पुढे आलेली नाही. तरीही पुरीच्या मदाल पानजीचा लिखित इतिहास विश्वासार्ह आहे किंवा नाही, नसल्यास का नाही याबद्दलचे एखाद्या इतिहासकाराचे ठोस मत मला कोठे आढळले नाही. इतिहासकार बहुधा एकाच पुराव्यावर अवलंबून राहत नसावेत. या निष्कर्षाप्रत नेणार्‍या अशाच आणखी एका ठोस पुराव्याची त्यांना गरज वाटत असावी.

१३. प्राचीन काळापासून कोणार्क हे एक प्रमुख बंदर होते. मंदिर बांधण्यापूर्वीच्या काळातील, इसवी सनाच्या दुसर्‍या शतकातील ग्रीक भूगोलतज्ञ टॉलेमीला कोणार्क बंदर ठाऊक होते. एका लोकप्रिय दंतकथेप्रमाणे श्रीकृष्णाचा एक राजबिंडा पुत्र सांब याने एकदा एका पवित्र पण कुरूप अशा ऋषींची (हा ऋषी बहुधा अष्टावक्र मुनी असावा) टवाळी केली. त्याचा सूड घ्यायला त्या ऋषीने सांबावर मोहिनी टाकून त्याला एका तळ्यापाशी नेले. त्या तळ्यात कृष्णाच्या बायका स्नान करीत होत्या. सांब ते ‘मनोहर’ दृश्य टक लावून पाहत असताना त्या कुरूप ऋषीने हळूच तिथून पाय काढला आणि कृष्णाला पाचारण करून त्याच्या पुत्राचे प्रताप दाखवले. नग्नावस्थेतील आपल्या सावत्र मातांकडे आसक्तीने टक लावून पाहत असलेल्या सांबाला पाहून कृष्णाला राग आला आणि त्याला महारोग होईल असा शाप दिला. बिचारा सांब! त्याला काय ठाऊक त्या आपल्या सावत्र माता आहेत? पण मग नंतर कृष्णाच्या ध्यानात आले की सांबाला या लबाड ऋषीने जाळ्यात ओढून फसवलेले आहे. अरेरे! पण आता उशीर झाला होता. शाप तर परत घेता येत नव्हता. सांब मग गेला समुद्रकिनार्‍यावर. तिथे त्याने सूर्यदेवाची पार्थना करीत बारा वर्षे तप केले. त्यामुळे प्रसन्न होऊन सूर्याने सांबाला रोगमुक्त केले. त्याबद्दल कृतज्ञता म्हणून सांबाने नंतर तिथे एक सूर्यमंदिर उभारले. कोणार्क समुद्रकिनार्‍यापासून काही फुटांवरच एक कुंड आहे. हे सांब कुंड म्हणून ओळखले जाते. त्या द्वापार किंवा त्रेतायुगातही पण सांबासारखे वात्रटपणा करणारे टवाळ लोक होते हे वाचून बरे वाटले.  पुण्यात सध्या ज्या त्रेतायुगातल्या सहा आसनी रिक्षा धावतात त्या कृष्णाकडे होत्या की त्याच्या स्त्रिया रथातून अगर घोड्यावरून फिरायच्या त्याचा मात्र कुठे उल्लेख नाही. जर पुष्पक विमान होते तर सहा आसनी डुगडुग्या असायला हरकत नाही.

भारतात ही अशी इतिहास आणि दंतकथांची एकजिनसी सरमिसळ आढळते. दंतकथांतून तत्कालीन लोकांच्या प्रतिभेचे, सर्जनशीलतेचे मात्र सुरेख दर्शन होते. संशोधकांच्या मताप्रमाणे मात्र गंग राजा नरसिंह देव याने मुस्लिमांविरुद्धच्या विजयी मोहिमेचे स्मारक म्हणून मंदिर उभारले.

काहीही असले तरी मंदिरकर्त्या राजा नरसिंहदेवाने मात्र अकराव्या शतकातील शाही विश्वातील धार्मिक, लष्करी, सामाजिक आणि घरगुती बाबींची नोंद केलेली पाषाणयुक्त कालकुपीच निर्माण करून ठेवली हे खरेच. मदिराच्या अवशेषातील छोट्याशा वस्तूपासून प्रचंड वास्तूपर्यंत प्रत्येक चौरस इंच हा चित्रे आणि पुतळे यांच्या रूपाने सौंदर्य आणि डौल याबाबतीत अजोड अशा कोरीव कामाने नटलेला आहे.

चित्रांचे विषय आकर्षक आहेत. देवतांच्या, आकाशस्थ गोलांच्या, मानवी वादकांच्या, नर्तकांच्या, प्रेमिकांच्या, शिकारी आणि लष्करी लढायांपासून शाही विलासापर्यंत शाही जीवनातील प्रचंड दृश्यांच्या, हजारो प्रतिमा इथे आहेत. यात पक्षी आहेत, प्राणी आहेत, मुख्य मंदिरावर  हजारभर तर हत्तीच आहेत, पुराणातील व्यालासारखी काल्पनिक श्वापदे आहेत, बारीक कलाकुसरीने नटलेल्या वनस्पतींच्या तसेच भौमितिक वेलबुट्टीचा अमोल खजिना आहे. अमूल्य अशा ओदिशी कलेचा उच्च दर्जा सर्वत्र दिसत राहतो तसेच त्यातील वैज्ञानिक आणि तात्त्विक दृष्टिकोनामुळे शिल्पकला समजणे सोपे झाले आहे. मुख्यत्वेकरून जगमोहनच्या दुसर्‍या स्तरात आढळणार्‍या उत्तान शिल्पांबद्दल मंदिर प्रसिद्ध आहे खरे. या दृश्यांचा अर्थ काही ग्रंथात लावलेला आहे. पहिल्या दृष्टीक्षेपातच जाणवते ती त्यातून ओसंडणारी कलात्मक कोमलता आणि हालचालीतला लयबद्ध वेग आणि सौंदर्य. अकबराच्या दरबारातील अबुल फझल म्हणतो ‘पाहताक्षणीच आवडली नाहीत तरी ही शिल्पे पाहिल्याबरोबर आपण स्तंभितच होतो’. कोणार्कमधील इतर शिल्पात सतत दिसत राहते ती जीवनाबद्दलची कलासक्त आणि विलासी दृष्टी. ही शिल्पे तत्कालीन हजारो माणसे, प्राणी आणि दैवी व्यक्तींनी युक्त अशा व्यापक जीवनयात्रेचे वास्तव जिवंत करून आपल्याला त्या काळात घेऊन जाणारा एक ओढ लावणारा अविस्मरणीय अशा अनुभवाचा स्पर्श देऊन जाते.

मनाला स्पर्शून न जाणार्‍या अशा फक्त तीन प्रतिमा आहेत. त्या आहेत वर उल्लेखलेल्या तीन सूर्यप्रतिमा. चमकदार हिरव्याकाळ्या क्लोराईट दगडात खोदलेल्या. इतर सर्व शिल्पे आहेत वादळवार्‍याने झिजलेल्या वालुकाश्मातील. या प्रचंड सूर्यप्रतिमा अगदी समोरच ताठ उभ्या आहेत. कठीण दगडातल्या या मूर्तींचे सौष्ठवच वेगळे. देवतेचे आत्मिक संतुलन दाखवायला प्राचीन काळापासून याच पूर्वापार पद्धतीने मूर्ती दाखवतात. त्यांच्या उच्च प्रतिष्ठेमुळे त्या वेगळ्या सौष्ठवामुळे इतर शिल्पांपासून वेगळ्या उठून दिसतात. तरीही ही प्रतिष्ठा स्निग्ध, दयार्द्र आहे आणि त्यावर अलिप्ततेचा किंवा त्रयस्थतेचा लवलेशही दिसत नाही. दुःखित, पीडित भक्तांच्या दर्शनाने या देवतेला नक्कीच पाझर फुटेल असे वाटत राहते. वास्तवातील परंपरेचे दर्शन घडवणार्‍या शेवटच्या मंदिरांपैकी कोणार्क हे एक आहे. विझणार्‍या दिव्याची ज्योत विझताना आणखी तेजस्वी होते, आणखी काय! या अलौकिक पाषाणसृष्टीवर दयावंत होऊन राज्य करणार्‍या सूर्याच्या त्या सर्वांगसुंदर प्रतिमेकडे पाहताना वाटते की या परंपरपरेचा अंत देखील काही कमी शोकात्म नाही.

कोणार्क मंदिरातील उपमंदिरे:
कोणार्क सूर्यमंदिराच्या आवारात एके काळी २२ उपमंदिरे होती. त्यापैकी आता केवळ दोन उपमंदिरे उभी आहेत. बाकीच्यांची पडझड होऊन ती नामशेष झाली.

मायादेवी मंदिर: मुख्य देवालयाच्या पश्चिमेला देवालय क्रमांक २ चे अवशेष आहेत. हे मायादेवी मंदिर म्हणून लोकप्रिय आहे. सूर्याची एक पत्नी मायादेवी. पार्श्वभागी असणार्‍या सूर्यप्रतिमेमुळे हे मंदिर देखील सूर्याला वाहिल्याचे ध्यानात येते. मुख्य मंदिरापूर्वी हे बांधून पूर्ण झाले होते. हे मंदिर देखील पूर्वाभिमुख आहे. यात देखील गाभारा आणि जगमोहन एकाच चौथर्‍यावर आहेत. दर्शनी भाग शिल्पांनी मढवलेला आहे. गाभार्‍याचा आणि जगमोहनचा वरचा भाग गायब आहे. जगमोहनचा आतील भाग कोरीव आहे आणि गाभारा रिकामा आहे. वास्तुशैलीवरून अंदाज बांधता येतो की हे अकराव्या शतकाच्या उत्तरार्धात बांधले असावे. 

वैष्णव मंदिर:
कोणार्क मंदिराच्या आवारातील आग्नेय दिशेला वसलेले क्र. ३ म्हणून ओळखले जाणारे हे विटांनी बांधलेले छोटेसे असे मंदिर आहे. वाळूचे ढीग उपसताना हे १९५६ साली उजेडात आले. याचा पाया पंचरथाकृती आहे. यात गाभारा आणि जगमोहन आहेत परंतु वरचा भाग नाहीसा झालेला आहे. मंदिरावर बाहेरून कोरीवकाम नाही. बलराम तसेच वराह आणि त्रिविक्रम या दोन पार्श्वदेवता उत्खननात सापडल्या परंतु त्या आता कोणार्कच्या वस्तुसंग्रहालयात ठेवलेल्या आहेत. या मूर्तींवरून हे मंदिर हे वैष्णव मंदिर आहे हे ध्यानात येते. सुमारे अकराव्या शतकातले हे असावे.

तर हे सर्व वाचले आणि कोणार्क मला  वाकुल्या दाखवायला लागले. पण तेव्हा चैत्राचे प्रखर ऊन दिवसभर होते. तिथे सुखद हवेचा मोसम यायला अजून सहासात महिने होते. वाटले की तिथे गेले की की डोळ्यांसमोर तो काळ जिवंत होईल. राजा नरसिंहाचा लालजांभळा, किरमिजी, किनखापी दरबार डोळ्यांसमोर साकार होईल. मग सिबेई सामंतराय, बिशू महाराणा या स्थापत्यकारांचा वाद रंगेल. मग मन पुन्हा कोणार्क मंदिराकडे धावेल. स्थापत्यकारांच्या उभ्या घोळक्यातील कुमारवयाचा धर्मपाद हातात भूर्जपत्रे घेऊन त्यावरील आपली रेखाटने जमिनीवर खडूने, गेरूने नाहीतर फरशीवर कोळशाने किंवा वाळूत काठीने रेखाटून, आपली आकडेमोड आत्मविश्वासाने ओजस्वी भाषेत ज्ञानी, अनुभवसंपन्न, वयोवृद्ध स्थापत्यकारांना समजावून देईल. नंतर एकदोन आठवड्यांनी त्याचे निःशब्द कलेवर कुठेतरी आढळून येईल. भोवती लोकांचा घोळका जमा होईल. धर्मपादाच्या निवासस्थानी त्याचे आप्त शोकाकुल होऊन भान विसरतील. लोकांचे रिकामटेकडे तर्ककुतर्क कुजबुजू लागतील. अफवांचे पेव फुटेल. नंतर समाज धर्मपादाला विसरून पण जाईल. पण कुठल्यातरी हिंदू विद्यापीठात दरवर्षी स्थापत्यकारांची परिषद होऊन त्याची पुण्यतिथी साजरी होईल. 

ओदिशाची राजधानी भुवनेश्वरपासून अंतर ६९ किमी. पुरीहून ३२ किमी तर कटकहून ११४ किमी. आहे.
पाहण्याची वेळ ९.०० ते १८.००. प्रवेशशुल्क भारतीय आणि सार्कमधील इतर देशांच्या नागरिकांसाठी माणशीं रु. १०/-
इतर परदेशी व्यक्तींसाठी: माणशी अमेरिकन $ ५/- किंवा भारतीय रु. २५०/-
१५ वर्षांखालील मुलांना प्रवेशशुल्क नाही.


लेखक: सुधीर कांदळकर

२ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

सुधीरजी, चित्रण छान टिपले आहे. महिती तर छानच आहे.

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

धन्यवाद.