अक्षर गणेश!

कदा ऑफिसमधल्या माझ्या एका मैत्रिणीने माझ्यासाठी 'अक्षर गणेश' भेट आणलेले. त्यात माझं आणि माझ्या बायकोचं नाव वापरून गणेश चित्र काढले होते. कॅलिग्राफी तर तुम्हा सगळ्यांना माहीतच असेल. त्याचाच प्रकार म्हणजे अक्षरातून किंवा शब्दातून एखादी आकृती काढणे. इथे अक्षरातून गणेश चित्र साकारलेले म्हणून त्याला मी 'अक्षर गणेश' म्हणालो. तसं अक्षरांमध्ये कलाकृती रेखाटणे नवे नव्हते मला. पण जेव्हा मैत्रिणीने सांगितले की ती व्यक्ती तुम्ही सांगितलेल्या नावातून अवघ्या २०-३० सेकंदात गणेश चित्र रेखाटते, मला ते विशेष वाटले. म्हटले या व्यक्तीला आपण एकदा भेटावंच. तिच्याकडूनच ती व्यक्ती कुठे असते त्याबद्दल माहिती घेतली आणि ठरवले की एखाद्या दिवशी चक्कर मारावी.

नंतर कालांतराने ती गोष्ट मी विसरूनच गेलेलो. पण एके दिवशी इंटरनेटवर काही शोधताना पुन्हा एकदा त्या व्यक्ती बद्दल एक दोन ओळी वाचण्यात आल्या, त्यात त्यांचं नाव आणि मोबाईल नंबरही होता. तडक फोन केला आणि विचारले की मला तुम्हाला भेटायचे आहे तर कुठे आणि केव्हा भेटू शकतो. मला अनपेक्षित असा आपुलकीपूर्ण प्रतिसाद मिळाला. त्यांनी स्वतःच भेटायला यायचे आश्वासन दिले आणि वेळही मला अनुकूल होईल अशीच ठरवली. मनात आले की माणूस खरंच कमालीचा मवाळ आणि आपुलकीने वागणारा आहे.

त्यांचं नाव आनंद टेके. सारस बागेत मेन गेटजवळच्या जिन्याच्या शेवटी बसलेले असतात. उन्हाळा असो की पावसाळा, गेली  ३-४ वर्षे ते नेटाने तिथे येतात. प्रथम गणेश दर्शन घेऊन आपल्या जागी येऊन बसतात, आणि वेळही ठरलेली सकाळी १० ते संध्याकाळी ७,  संकष्टीच्या दिवशी सकाळी ५.३०ला. हाती असलेल्या या कलेचा वापर पोटा-पाण्यासाठी करतात पण त्यातही त्यांची गणेश भक्ती आहे. रोज किती तरी अक्षर गणेश रेखाटतो आणि त्याला चित्र स्वरूपात का होईना जास्वंद वाहतो, त्यातच सगळं येतं मला असं त्यांचं म्हणणं. त्यांची इथे मुलाखत वजा गप्पा मांडण्याचा एकच उद्देश म्हणजे त्यांची कला इतर लोकांपर्यंत पोचावी.

नावावरून मला वाटलेले की ३० एक वर्षाची, मध्यम बांध्याची व्यक्ती असेल. पण जेव्हा त्यांना पाहिले तेव्हा हा विचार फोल ठरला. एक ३५-४० वर्षाची धिप्पाड बांध्याची असामी म्हणजे आनंद टेके असेल असा विचारही मनाला शिवला नव्हता. तर ठरल्याप्रमाणे आनंद माझ्या घरी आले. आधी सांगितल्याप्रमाणे आनंदजी खरंच कमालीचे मवाळ आणि आपुलकीने वागणारे निघाले. आल्या आल्या त्यांनी फोनवर खोटा पत्ता सांगितल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. नाष्टा करत करत मुलाखत वजा गप्पा रंगल्या.  त्यातल्याच काही गोष्टी इथे प्रश्नोत्तर स्वरूपात मांडतोय.

मी: तुमच्या कलेच्या आधी तुमच्याबद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल.

आनंदजी: माझ्याबद्दल काय सांगणार ? मी आनंद जगन्नाथ टेके. राहणार सांगवी, तसा मी मूळचा सोलापूरचा (हा निव्वळ योगायोग आहे!). शिक्षण म्हणाल तर १०वी सुद्धा पूर्णं शिकलो नाही. घरी दोघे भाऊ आणि तीन बहिणी. शाळा सोडल्यावर थोडे दिवस वडिलांसोबत किराणा दुकान चालवले. लग्नानंतर पोटा-पाण्यासाठी नोकरीच्या शोधात जे पुण्यात आलो ते आजवर पुण्यातच आहे.  मी, माझी बायको आणि आमचा एकुलता एक मुलगा असं छोटंसं कुटुंब आहे. माझे आई-वडील आणि भावंडं सोलापुरला असतात. मुलगा या वर्षी १०वीला आहे आणि गणेश कृपेनं सगळं व्यवस्थित चाललं आहे.

मी: तुम्ही व्यवसाय काय करता? म्हणजे 'अक्षर गणेश' व्यतिरिक्त काही?

आनंदजी: सध्याला 'अक्षर गणेश'वरच पोट-पाणी आहे आणि त्यातच मी आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या समाधानी आहे. तसं मी पुण्यात आलो तेव्हा, म्हणजे जवळ जवळ १९९६ पासून २००१ पर्यंत सिक्युरिटी सुपरव्हायजर म्हणून काम केलं. माझी शरीरयष्टी पाहून मला ते काम मिळालेलं. पण त्या कामात समाधानी नव्हतो म्हणून सांगवीतच घराजवळ छोटसंच दुकान थाटलं. वर्षभरात दुकानाला चांगली भरभराट मिळाली. पण घर मालकाच्या त्रासामुळे दुकान बंद करावं लागलं. उरलेला माल रस्त्यावर विकत असतानाच डॉ. कोडबागे यांच्याशी गाठ पडली. माझ्या देहयष्टीकडे पाहून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सुपरव्हायजरची नोकरी दिली. पुढे २००८मध्ये हॅप्पी थॉट्स मध्ये स्टॉककीपर म्हणून लागलो. असा प्रवास करत करत २००८ मध्ये 'अक्षर गणेश' कडे वळलो आणि आजही तिथेच आहे, ते ही समाधानी .

मी: एवढ्या सगळ्या व्यापातून तुम्ही 'अक्षर गणेश'कडे कसे काय वळलात?

आनंदजी: त्याला दोन गोष्टी कारणीभूत आहेत. एक म्हणजे माझी गणपतीवरची श्रद्धा. माझे आई-वडील सांगत की मला लहानपणापासून गणपतीबद्दल विशेष आवड होती. लहानपणी मी गणपतीसारखे दिसणारे दगड गोळा करायचो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यंगचित्र काढण्याचा छंद. त्या छंदामुळे मी कॅलिग्राफी करायला लागलो. वेगवेगळ्या नट नट्यांचे, व्यक्तींचे व्यंग चित्र काढायचो. मी काही राजकारणी आणि काही अभिनेत्यांना त्यांचे व्यंगचित्र काढून त्यांना पाठवलेत. त्यापैकी डॉ. अब्दुल कलामजी, अमिताभ बच्चन, राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे सह्या केलेले अभिनंदनपर शुभेच्छा पत्र आले आहेत, जे मी आजही जपून ठेवलेत.

जेव्हा मी सिक्युरिटी सुपरव्हायजर म्हणून काम करायचो तेव्हा फावल्या वेळात पेपर मधले शब्द कोडे सोडवायचो. त्यातून अक्षरांसोबत खेळायला लागलो, अक्षरांपासून वेगवेगळ्या आकृत्या काढायचो.  हॉस्पिटलमध्ये जेव्हा कामाला होतो तेव्हा सणासुदीला हॉस्पिटलच्या प्रांगणात रांगोळीने कॅलिग्राफी किंवा अक्षरांतून काहीतरी चित्रकाढणे वगैरे करायचो. २००८च्या दरम्यान राव म्हणून माझे एक जवळचे स्नेही आहेत त्यांच्या मुलीला मी सहज म्हणून तिच्या नावातून गणपतीचे चित्र काढून दिले. तिला ते इतके आवडले की तिने त्यांच्या ओळखीच्या सार्वजनिक आध्यात्मिक कार्यक्रमात नावातून गणपतीचे चित्र काढून द्यायचा स्टॉल लावायचा आग्रह धरला. हो नाही करत मी स्टॉल लावण्यास तयार झालो ते एका अटीवर. अट अशी होती की मी स्टॉलचे उद्घाटन मुख्य महाराजांच्या हस्ते करणार. ठरल्याप्रमाणे स्टॉल लावला, पण कार्यक्रम संपवून महाराज स्टॉल पाहायला येईपर्यंत अर्धा दिवस निघून गेलेला. तो पर्यंत बाकीच्या स्टॉलवर गर्दी जमलेली. महाराज आले तेव्हा त्यांना स्टॉलविषयी माहिती दिली. त्यांनी आश्चर्याने विचारले की माझ्याही नावाचा गणपती काढणार का? असे म्हणून त्यांनी नाव सांगितले. ते महाराज कर्नाटकचे असल्याने नाव जरा अवघड आणि मोठे होते. पण नेहमीप्रमाणे मी त्याही नावाचा गणपती अवघ्या २० सेकंदात काढून पूर्णं केला तेव्हा महाराजांनाही आश्चर्य वाटलेले. त्यावर त्यांनी खूश होऊन मी काय मोबदला देऊ असे विचारले. पण माझ्यासाठी त्यांनी दिलेली शाबासकीच महत्त्वाची होती.  पण त्यावर ते म्हणाले की 'फुकट मिळालेल्या गोष्टीला महत्त्व राहत नाही, तुला काहीतरी मोबदला घ्यायलाच हवा. आणि त्यात मीच तुझ्या स्टॉलची बोहनी करणार आहे. मग मी किती पैसे देऊ?'  त्यांच्या त्या शब्दाला मान ठेवून मी 'तुम्हाला जे योग्य वाटते ते द्या'  एवढंच म्हणालो. महाराजांनी माझ्या हातात दहा रुपयांची नोट ठेवली, जी मी आजही देव्हार्‍यात ठेवून पुजतो. एवढी वर्षं झाली आजही मी माझं मानधन १० रुपयांपेक्षा जास्त नाही घेत. एखाद्याने आनंदित होऊन जास्ती देऊ केले तरी ती जास्तीची रक्कम मी त्यांना परत करतो. कारण बाप्पाच्या कृपेने माझी परिस्थिती उत्तम आहे, आणि हे काम मी माझ्यासाठी न करता बाप्पाच्या भक्तांसाठी करतो. असंही बाप्पाला मी चित्ररूपी फुलं वाहून पुण्य कमावतोच ना. असंही मी फायद्यातच आहे.

मी: तुमच्या या छंदात म्हणा किंवा नोकरी सोडून तुम्ही पूर्णतः 'अक्षर गणेशा'त गुंतण्याच्या निर्णयाला घरच्यांचा काय प्रतिसाद होता?

आनंदजी: मी पुर्णतः 'अक्षर गणेश' मध्ये गुंतलो ते माझ्या बायकोमुळे. तिचा आधार नसता तर आज हे मानसिक समाधान नसते. जेव्हा स्टॉलला भरभरून प्रतिसाद आला तेव्हा तिनेच 'अक्षर गणेश'ची कल्पना सुचवलेली. सहज ट्रायल म्हणून मी एक दिवस कामावरून सुट्टी घेऊन शनिवार वाड्यावर सुरवात केलेली. पण लोकांचा म्हणावा तसा प्रतिसाद नव्हता. पण बायकोला वाईट वाटू नये म्हणून प्रतिसाद चांगला मिळाला म्हणून सांगावे लागे. नंतर शनिवार वाड्यावरच एकाने सारसबागेत तळ्यातल्या गणपतीजवळ बसत जा म्हणून सल्ला दिला. त्या प्रमाणे पुढच्या दिवशी बाप्पाच्या आवारात  बसलो, आणि खरंच खूप चांगला प्रतिसाद मिळाला. म्हटले बाप्पानेच बोलावून घेतले. तेव्हापासून नोकरी सोडून पूर्णं वेळ 'अक्षर गणेश'ला देतोय. यात माझ्या घरच्यांचा, आई-वडिलांचा, भावंडांचा किंवा माझ्या सासू-सासर्‍यांचा खूप आधार मिळाला. विशेष करून बायकोचे आणि पोराचे, कारण मी असलेली नोकरी सोडून रस्त्यावर असा चित्रं काढत बसतो यात त्यांना कमीपणा जाणवला नाही यासारखं मानसिक धैर्य दुसरं नाही.

तर अश्या या आमच्या गप्पा रंगलेल्या. त्यांच्या आयुष्यातल्या पुस्तकातली बरीचशी पानं त्यांनी माझ्यासमोर उलगडून ठेवलेली. खूपशी वैयक्तिकही होती जी मी इथे ऐकवली नाहीत. पण एकंदरीत एक गोष्ट जाणवली ती म्हणजे त्यांच्या खडतर आयुष्यात त्यांनी जपलेला छंदच त्यांच्या जखमांवर फुंकर घालतोय, मानसिक समाधान देतोय.

गप्पा मारत असतानाच आमच्या नावांची त्यांनी साकारलेली काही चित्रे -

१] मल्लिनाथ, तेजस्विनी आणि रुद्राक्ष.


२] विश्वनाथ, पुजा आणि अथर्व.


३] रुद्राक्ष आणि अथर्व.


अक्षरातून अवघ्या २०-३० सेकंदात गणेशचित्र साकारण्याची ही कला नि:स्वार्थ भावनेने लोकांसाठी करणार्‍या या व्यक्तीला भेटून खरंच खूप आनंद झाला.

लेखक: मल्लिनाथ करकंटी

३ टिप्पण्या:

विशाल विजय कुलकर्णी म्हणाले...

मल्लिनाथा, मस्तच रे :)

Unknown म्हणाले...

हा प्रकार आवडला, फक्त त्यांचे, त्या स्टॉलचे एक चित्र दिले असते तर सुयोग्य झाले असते. असे माझे मत आहे.

Shreya's Shop म्हणाले...

रानडेकाका +१, त्याखेरीज श्री.आनंद टेके यांचा दूरध्वनी क्रमांक मिळाला असता तर...!