अमृततुल्य जगाच्या स्मृती !

हातात सामान घेऊन रेल्वे स्टेशनातून बाहेर आल्यावर पहाटेचा हवेतला शिरशिरता गारवा मला चांगलाच जाणवू लागला. अंगावरची शाल घट्ट लपेटत मी दहा पावले पण चालले नसेन तोच आजूबाजूचे रिक्षावाले ''किधर जाना है? '' करत मागे येऊ लागले होते. सरळ रिक्शात बसून घर गाठावे की गारठलेल्या शरीरात चहाचे इंधन भरून गोठलेल्या मेंदूला तरतरी आणावी या विचारांत असतानाच समोर एक अमृततुल्य चहाची टपरी उघडी दिसली. झाले! माझा रिक्शात बसायचा विचार बारगळला व पावले आपोआप अमृततुल्यच्या रोखाने वळली.

दुकानाबाहेरचे पाण्याचे ओहोळ, आत लाकडी बाकड्यांना दाटीवाटीने खेटून असलेली टेबले, नुकताच ओला पोछा केलेली फरशी, स्टोव्हचा भसभसता आवाज, उकळत्या दुधाचा वातावरणात भरून राहिलेला सुवास आणि चादरी-स्वेटरांत गुरफटलेले, तल्लीन होऊन चहाचा आस्वाद घेणारे ग्राहक... त्या वातावरणात माझ्या शरीरातच नव्हे तर मनातही उबेची आश्वासक वलये आकार घेऊ लागली.

''घ्या ताई, चहा घ्या, '' दुकानाच्या मालकाने माझ्यासमोर पांढर्‍या कपातून आटोकाठ भरून बशीत ओघळलेला, वेलदोड्याचा सुंदर दरवळ येत असलेला वाफाळता अमृततुल्य चहा आणून ठेवला आणि तो दुसर्‍या गिर्‍हाईकाची ऑर्डर बघायला गेला. सर्वात अगोदर मी खोल श्वास घेऊन त्या चहाचा भरभरून सुगंध घेतला. मग तो पहिला सावध घोट. तरी जीभ पोळलीच! शेवटी सरळ बशीत चहा ओतून त्याचा भुरका घेतला. अहाहा... तीच ती चव, तोच स्वाद... मन बघता बघता जुन्या काळात गेले.  

Each cup of tea represents an imaginary voyage.  ~Catherine Douzel

माझे व अमृततुल्य चहाचे फार जुने नाते आहे. अगदी मला आठवत असल्यापासूनचे. थंडीचे दिवस, रस्त्यावरच्या शेकोटीचा खरपूस गंध, गुलाबी धूसर गारठ्याने कुडकुडलेली, स्वेटर-कानटोप्या-शालींच्या ऊबदार आवरणांत उजाडलेली सकाळ.... एकीकडे रेडियोवर बातम्या चालू असायच्या, दुसरीकडे ताज्या वर्तमानपत्राच्या करकरीत पानांचा वास आणि सोबत असायचा तो उकळत असलेल्या आले-वेलदोडे घालून केलेल्या चहाचा सुवास! आणि या सकाळीची सुरुवात व्हायची ती श्री अंबिका अमृततुल्य भुवनामधील वर्दळीने!  

टिळक रोडवरच्या आमच्या घरासमोरच अमृततुल्य चहासाठी प्रसिद्ध असलेले हे अंबिका भुवन होते. रोज भल्या पहाटे आमच्यासाठी भूपाळी गायल्यागत चार - साडेचाराच्या सुमारास तिथे हालचाल सुरू व्हायची. अगोदर दुकानाचे मोठे शटर उघडण्याचा आवाज. थोडीफार साफसफाई, फर्निचर सरकवण्याचे आवाज. मग कपबश्या साफ करताना होणारा त्यांचा किणकिणाट. तोवर कोणीतरी दुकानासमोरची जागा खराट्याने साफ करून तिथे पाण्याचा सडा घातलेला असायचा. त्याच वेळी दुसरीकडे फर्‍याच्या स्टोव्हला पंप मारला जात असायचा. तो स्टोव्ह एकदाचा पेटला की भस्स भस्स आवाज करायचा. त्यावर भले थोरले पातेले चढविले जायचे. एव्हाना परिसरातील सायकलवरून फिरणारे पेपरवाले, दुधाच्या चरव्या सायकलला लटकवून हिंडणारे दूधवाले, भल्या पहाटे पोटापाण्यासाठी बाहेर पडलेले जीव अंबिका भुवनच्या दारात हळूहळू जमू लागले असायचे. कोणीतरी गारठलेल्या शरीरात ऊब आणायला बिडी पेटवायचे. त्या बिडीचा खमंग धूर हवेत पसरायचा. कोणी पाण्याचा जग घेऊन रस्त्यातच चुळा भरायचे. अंबिका भुवनचा मालक दुकानात काम करणार्‍या पोर्‍यावर मधूनच जोरात खेकसायचा. या सार्‍याला जणू एक लय असायची. एक अलिखित शिस्त. आणि हे सर्व पहाटे पावणेपाच - पाचच्या दरम्यान! आमच्या घरातील खिडक्या व बाल्कनी टिळक रोडच्या दिशेने उघडणार्‍या.... अंबिका भुवनच्या अगदी समोर. आम्हाला निजल्या निजल्या हे सारे आवाज साखरझोपेतच ऐकायला मिळायचे. पहाटेची मृदू-मुलायम अलवार स्वप्ने आणि अंबिका भुवनमधून येणारे हे प्रातःकालीन ध्वनी यांची जणू सांगडच झाली होती आमच्यासाठी!

घरी कोणी पाहुणे मुक्कामास असतील तर त्यांची मात्र थोडी फसगत व्हायची. त्याचे असे व्हायचे की भल्या पहाटे अंबिका भुवनमधून येणारे सारे आवाज ऐकून ती सारी कपबश्यांची किणकीण, धातूच्या बारक्या खलबत्त्यात चहाचा मसाला कुटण्याचा आवाज, स्टोव्हचा भुस्स भुस्स आवाज वगैरे आमच्याच स्वयंपाकघरातून येत आहे असा पाहुण्यांचा गैरसमज व्हायचा. आता थोड्या वेळातच चहा तयार होत आला की मग उठावे असा विचार करत ते डोळे मिटून त्या क्षणाची वाट बघत अंथरुणातच पडून राहायचे. प्रत्यक्षात आवाज पलिकडील बाजूच्या दुकानातून येत आहे याचा त्यांना पत्ताच नसायचा. मग कानोसा घेऊन, बराच वेळ झाला तरी कोणी उठवून चहा झाल्याची वर्दी का देत नाहीत म्हणून ते डोळे किलकिले करून बघायचे तो काय! पहाटेचे जेमतेम पाच वाजत असायचे!  

माझे एक काका तर नेहमीच जाम फसायचे. दर मुक्कामाला ते पहाटे अंबिका भुवनची वर्दळ सुरू झाली की उठून गजराचे घड्याळ पुन्हा पुन्हा निरखायचे. शेवटी काकू त्यांना म्हणायची, ''ओ, झोपा जरा! आताशी साडेचार वाजलेत... इतक्या सकाळी काय करायचंय उठून? '' आणि ते बिचारे एकीकडे चहाच्या तयारीचा आवाज येतोय, तरी पण स्वयंपाकघरात सामसूम कशी काय याचा विचार झोपभरल्या अवस्थेत करत पुन्हा एक डुलकी काढायचे.  

दिवसभर अंबिका भुवनवर तर्‍हेतर्‍हेच्या गिर्‍हाईकांची गर्दी असायची. अगदी पांढरपेश्यांपासून ते बोहारणी -लमाणी बायका-मजूर-फेरीवाले-भटक्यापर्यंत. कधी कोणी दरवेशी माकडाला किंवा अस्वलाला बाजूच्या खांबाला बांधून चहा प्यायला विसावायचा तर कधी डोंबारी, कधी कडकलक्ष्मी रस्त्यावरच पदपथावर चहा पिण्यासाठी फतकल मारून बसायचे. सकाळच्या प्रहरी लोकांना जागवत फिरणारे, मोरपिसांचा टोप चढविलेले वासुदेव महाशय देखील अंबिका भुवनच्या चहाने घसा शेकून मगच पुढे जायचे. अश्या लोकांच्या आगमनाची जरा जरी चाहूल लागली तरी अंबिका भुवनाभोवती बघ्यांची गर्दी वाढायची. इथेच जगभराच्या राजकारणाच्या, हवामानाच्या नाहीतर गल्लीतल्या घडामोडींच्या गप्पा झडायच्या. बातम्यांची देव-घेव व्हायची. वर्तमानपत्राची सुटी पाने ग्राहकांमधून फिरायची. जोशी-अभ्यंकर हत्याकांडानंतर काही काळ पुण्यात टिळक रस्त्यावर लवकर शुकशुकाट व्हायचा. तो काळ सोडला तर अंबिका भुवनची आमच्या रस्त्याला एक आश्वासक जाग असायची. रात्री मात्र आजूबाजूच्या इतर दुकानांच्या तुलनेत अंबिका भुवन लवकर बंद व्हायचे.  

आमच्या घरी कित्येकदा अंबिकाचा अमृततुल्य चहा घरपोच यायचा. तीही एक मजाच होती. शेजारी एका वकिलांचे ऑफिस होते. ते कामगार न्यायालयात वकिली करत. त्यांच्याकडे कामगार अशिलांची सततची गर्दी असे. आणि आमच्या घरी माझ्या वडिलांच्या ऑफिसात शेतकरी ग्राहकांची गर्दी असे. घरातच ऑफिस असल्यामुळे ही शेतकरी मंडळी जेव्हा जथ्याजथ्याने येत किंवा शेजारच्या वकिलांकडे कामगारांचा पूर लोटे तेव्हा त्यांच्यासाठी चहा यायचा तो अंबिकामधलाच! पण त्यासाठी चहाची ऑर्डर द्यायची माझ्या वडिलांची व वकिलांची पद्धतही मजेशीर होती. घराच्या बाल्कनीतून माझे वडील अगोदर समोरच्या अंबिका भुवनच्या गल्ल्यावर बसलेल्या मालकाचे लक्ष वेधण्यासाठी तोंडातून 'ट्टॉक ट्टॉक'चे मोठमोठे आवाज काढायचे. वकिलांकडे हे काम त्यांचा असिस्टंट करायचा. अंबिकाचा मालक एकतर गल्ल्यावर तरी असायचा किंवा स्टोव्हसमोर बसून मोठ्या थोरल्या ओगराळ्याने पातेल्यातील दूध एकतानतेने ढवळत असायचा. मधोमध अख्खा वाहता टिळक रोड! जर वाहतुकीचा आवाज जास्त असेल तर कित्येकदा वडिलांनी काढलेले ''ट्टॉक्कार'' त्या मालकाच्या लक्षातच यायचे नाहीत. मग त्यानंतरचा उपाय म्हणजे हातांची ओंजळ करून पोकळ आवाजाच्या टाळ्या वाजवायच्या. कधीतरी त्या टाळ्या ऐकून दुकानातील नोकर मालकाला खुणावायचा. मालकाने आमच्या बाल्कनीच्या दिशेने प्रश्नांकित मुद्रेने पाहिले की वडील अगोदर इंग्रजी 'टी' च्या खुणेने ती चहाची ऑर्डर आहे हे सांगून जितके कप चहा हवा असेल तितकी बोटे त्याला दाखवायचे. तो मालकही मग स्वतःच्या हाताची तितकीच बोटे समोर उंच नाचवून ''बरोबर ना? '' अशा अर्थी मुंडीची हालचाल करायचा. त्यावर वडिलांनी ''बरोबर!! '' म्हणून हाताचा अंगठा उंचावून ऑर्डर 'फायनल' व्हायची, किंवा हातानेच ''नाही, नाही, नाही'' करत पुन्हा एकदा बोटे नाचवायची!! कधीतरी दोन्ही पक्षांची बोटे एकसमान आली की ऑर्डरची देवघेव पूर्ण व्हायची! हुश्श!! हा सारा 'मूकसंवाद' बघायला मला फार मजा येई. या प्रकारात कधी कधी दहा - पंधरा मिनिटे आरामात जात. एकदा टाळ्या वाजवून अंबिकावाल्याचे लक्ष गेले नाही तर मग थोडावेळ शेतकरी मंडळींशी बोलून पुन्हा टाळ्या, ट्टॉक्कार इत्यादी इत्यादी. शीळ वाजवून लक्ष वेधायला घरमालकांची बंदी होती म्हणून, नाहीतर तेही केले असते! माझ्या आईचा या सर्व प्रकारावर वडिलांसाठी शेलका शेरा असायचा, ''एवढ्या वेळात समोर जाऊन चहाची ऑर्डर देऊन परत आला असतास! '' पण वडिलांना तीन मजले व अठ्ठावन्न पायर्‍या उतरून पुन्हा चढायचा कोण कंटाळा असल्यामुळे ते तिचे बोलणे कानांआड करायचे.  

एकदा का चहाची ऑर्डर दिली की साधारण दहा-पंधरा मिनिटांनी अंबिका भुवनातील नाना एका हातात गरमागरम चहाची अ‍ॅल्यूमिनियमची पोचे पडलेली किटली व दुसर्‍या हातात कपबश्यांचा ट्रे घेऊन वर तिसर्‍या मजल्यावर आलेला असायचा. आल्यासरशी पटापट किटलीतून कपांमध्ये चहा ओतून तो किटली तिथेच बाजूला ठेवून द्यायचा व एका कोपर्‍यात उकिडवा बसून कान कोरत बसायचा. पांढर्‍या सफेद कपांमध्ये चहाचे ते सोनेरी-केशरी-पिवळ्या रंगाचे वाफाळते द्रव ज्या प्रकारे किटलीतून नाना एकही थेंब इकडे तिकडे न सांडता ओतायचा त्याच्या त्या कसबाचे मला खूप कौतुक वाटायचे. त्याच्या त्या 'कौशल्या'मुळेच असेल, पण जेवढ्या कपांची ऑर्डर दिली असेल त्यापेक्षा किटलीत कपभर चहा जास्तच असायचा. हिशेब मात्र दिलेल्या ऑर्डरीप्रमाणे व्हायचा.  

नाना आला असेल तर मी हातातला खेळ अर्धवट सोडून घरातून त्याला 'हाय' करायला येऊन जायचे. नाना मला एखाद्या दोस्तासमान वाटायचा. अंगावर मळका पोशाख, गालांवर पांढरट दाढीचे खुंट, विरळ पांढरे केस व त्यातून दिसणारे टक्कल, पडलेले दात असणारा नाना मला पाहून बोळके पसरून लखकन् हसायचा. त्याचे हसणे पाहून मलाही खुदुखुदू हसू यायचे. नानाची उंची खूप कमी होती. मला तो का कोण जाणे, पण माझ्याच वयाचा वाटायचा. कधी कधी तो कळकट खिशातून बिडी काढून शिलगावायचा व नाका-तोंडातून धूर सोडायचा ते पाहायला मला खूप मजा यायची. बिडीचा पहिला झुरका घेतला रे घेतला की नाना हमखास ठसकायचा. ''पाणी देऊ का? '' विचारले की मानेनेच 'नको नको' म्हणायचा.  

कधी अंबिका भुवनात गिर्‍हाईकांची खूप गर्दी असेल तर मग नाना चहाची किटली, कपबश्या वगैरे सरंजाम आमच्या घरी पोचवून लगेच दुकानात परत फिरायचा. मग मी बाल्कनीच्या कठड्याच्या नक्षीदार गजांना नाक लावून किंवा त्यांतून डोके बाहेर काढून त्याला हात करायचे. शेवटी आई पाठीत दणका घालून आत घेऊन जायची. तरी कधी नानाने कामातून डोके वर काढून माझ्या दिशेने पाहिले की मला कोण आनंद व्हायचा!  

घरी आलेला अमृततुल्य चहा मला तसा कधीच 'शुद्ध स्वरूपात' थेट प्यायला मिळाला नाही. ''चहा लहान मुलांसाठी चांगला नसतो, शहाणी मुलं दूध पितात, '' वगैरेच्या लेक्चर्सना मी बधणारी नव्हते. शेवटी हट्ट करकरून दुधात अमृततुल्य चहाचे चार-पाच चमचे मिसळून मीही ऑफिसात बसलेल्या शेतकर्‍यांच्या रंगीबेरंगी पागोट्यांकडे बघत बघत माझ्या स्पेशल 'चहा'चा आस्वाद घ्यायचे!

दुधाची 'भेसळ' न करता अमृततुल्य चहा पिण्याची संधी मला वडिलांबरोबर जवळपास बाहेर गेले की मिळायची. त्यांना घराच्या कोपर्‍यावर कोणीतरी ओळखीचे, मित्र वगैरे तर भेटायचेच भेटायचे. गप्पांच्या फैरीबरोबर अंबिकाचा अमृततुल्य चहा ठरलेला असायचा. अशा वेळी त्यांच्याकडे लाडिक हट्ट केला की त्यांच्या गप्पा विनाव्यत्यय चालू राहाव्यात यासाठी का होईना, पण आपल्याला बशीत थोडासा चहा ओतून मिळतो हे गुह्य उमगल्यावर अशी संधी वारंवार येण्यासाठी मी टपलेली असायचे. घरी येऊन आईसमोर 'च्या' प्यायल्याची फुशारकी मारायचे. त्या वेळी आपण चहा प्यायलो म्हणजे खूप मोठ्ठे झाले आहोत असे उगाचच वाटायचे!  

पुढे टिळक रस्त्यावरची ती जागा आम्ही सोडली तरी अमृततुल्य चहाची चटक काही सुटली नाही. परगावी येता-जाता, बाहेर भटकताना, मॅटिनी पिक्चर बघून घरी येताना अमृततुल्यला भेट दिली नाही तर चुकल्या-चुकल्यासारखे व्हायचे. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत पहाटे मंडईच्या व दगडू हलवाईच्या गणपतीचे दर्शन घेतले की शनिपारापाशी येऊन अमृततुल्य चहा ढोसणे व घरी जाऊन गपगुमान झोपणे हाही वर्षानुवर्षे ठरलेला कार्यक्रम असायचा. कॉलेजात असताना कधीतरी 'तंगी'च्या काळात दोस्त-कंपनीसोबत खिशातली-पर्समधली चिल्लर जमवून केलेली 'चहा-खारी' पार्टी देखील खास अमृततुल्य भुवनातच साजरी व्हायची. परीक्षेनंतर अवघड गेलेल्या पेपरचे दु:ख याच चहाच्या कपांमध्ये डुबायचे किंवा सोप्या गेलेल्या पेपरच्या उत्सवाला येथेच रंग चढायचा. या चहाची सर आजकाल चहाच्या नावे प्लॅस्टिकच्या पेल्यात मिळणार्‍या चॉकलेटी पिवळ्या रंगाच्या पाणचट उकळ्या गोडमिट्ट द्रावास येणे शक्य नाही!  

माझ्या परिचयातील अनेकजण अमृततुल्य चहाला ''बासुंदी चहा'' म्हणून नाके मुरडतात. तसा हा चहा रोजच्या रोज पिण्यासाठी नव्हेच! पण जेव्हा कधी हा चहा प्याल महाराजा, तेव्हा तबियत खूश होऊन जाते! अमृततुल्य चहाचा सुवासिक तवंग जसा जिभेवर व मेंदूवर पसरतो, चढतो तसा अन्य चहाचा क्वचितच पसरत असेल! असो. कोणीतरी म्हटले आहे, ''Tea is liquid wisdom. '' शहाणपणाच्या प्रत्येक टप्प्यावर मनात रुतून बसलेल्या स्मृतीही माणसाला प्रिय असतात. त्यामुळे त्या स्मृतींतील चित्रे, आठवणी, स्पर्श, चवी, दृश्ये जशीच्या तशी राहावीत यांसाठी त्याची धडपड चालते. माझ्या बालपणीच्या व नंतरच्याही कैक स्मृती या अमृततुल्य चहाच्या चवीत बद्ध आहेत. त्या निरागस वयातील स्वच्छ मन, प्रेमळ नात्यांची सुरक्षित ऊब, अचंबित करणारं जग आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मिळणारा निर्मळ आनंद यांची आठवण त्या अमृततुल्यच्या जोडीला मनात सामावली आहे. त्या जगाची सैर-सफर करायची असेल तर आजही म्हणावेसे वाटते... बस्स, एक प्याली अमृततुल्य चाय हो जाय.....!!  

लेखिका: अरुंधती कुलकर्णी.

1 टिप्पणी:

sayali.gr म्हणाले...

masta vatala...lagech amrut tulya chahachi tallaf aali..:)
sayali