मॅच


"येत्या सहामाहीत आपण पुण्याच्या टीम बरोबर मॅच घेतोय" सकाळच्या प्लॅनिंग मीटिंग नावाच्या टाईमपास सेशनमध्ये बॉसनं तोफ डागली.
" आँ "
" कसली ?"
आणि काहीश्या चमत्कारिक आवाजात प्रतिक्रिया उमटल्या
" आपण येत्या सहामाहीत पुण्यातल्या कंपनीच्या टीम बरोबर क्रिकेटची मॅच घेणार आहोत " बॉसच्या या निवेदनावर आमच्या गोटात उत्साह सळसळला.
" मॅच स्टेडियमवर असेल, किमान पन्नास ओव्हर्सची आणि सीझन बॉलवर खेळायची आहे !" उत्साह आणखी वाढला
" आपल्याला ट्रेनिंग द्यायला एक प्रशिक्षक बोलावला आहे तो परवा येईल, त्याच्या बरोबर रोज किमान दोन तास सराव करणं गरजेचं आहे!" उत्साह चरमसीमेला भिडला.
" पण ते ऑफीसअवर्स नंतर!" उत्साहावर पाणी पडलं

सकाळच्या मीटिंगमधला विषय दोन दिवस पुरला. आपण कसे एकेकाळी क्रिकेट खेळायचो इथपासून ते माझ्याशिवाय आमच्या शाळेची टीम मॅचच रद्द करायची इथपर्यंत, एक एक जण आपापलं शौर्य वर्णत होता.

परवाचा परवा आज उजाडला.
क्रिकेट प्रशिक्षक नावाचा तो भरगच्च पोटाचा आणि आडव्या शरीराचा प्राणी कंपनीत येऊन दुपारीच दाखल झालेला. शक्य तितक्या वेळा त्याला भेटून आपापली उपस्थिती लोकांनी दाखवलेली, तो ही तोंडभर हसून प्रत्येकाशी बोलत होता.
मोजके काही तास, पण तितक्या वेळातही ऑफिसमधली बोलीभाषाच बदलली.
" सर, पर्चेस डिपार्टमेंटसाठी कुरियर आहे कुणाकडे देऊ? " कुरीयरबॉय नायरकडे चौकशी करत होता.
" वो, मेरे स्लिप मे बैठा है उसके पास दे दो " नायरनं बरोबर उलट्या दिशेला बोट करत सांगितलं. भंजाळलेला कुरीयरबॉय त्या बोटाच्या दिशेनं टॉयलेटकडे निघालेला, त्याला थांबवून योग्य ते मार्गदर्शन करत बाकीच्यांनी आपापल्या स्लिप आणि कव्हर्सला कोण आहेत याची नोंद घेतली.

संध्याकाळी पाचाच्या ठोक्याला सगळे मैदानात हजर, अगदी स्वतःच्या खुर्चीला मंत्र्याची खुर्ची समजून चार चार तास जास्त चिकटून बसणारे लोकही हजर झालेले.
मैदानात, याला मैदान म्हणणं म्हणजे.......जरा अतीच पण तसंही आपण जॉन अब्राहमला नाही का अभिनेता म्हणतं, एका कोपर्‍यात कीट नावाची बोचकी पडलेली. त्यातल्या असंख्य गोष्टी पाहताना मला तरी लहानपणीचं क्रिकेट आठवलं. एक बॅट नावाचं फळकुट, घासून टक्कल दिसायला लागलेला टेनीसबॉल हेच आमचं कीट. यष्ट्या म्हणजे स्टंप्स कुठल्याही भिंतीवर आखता यायचे नाहीतर दोन चपला आहेतच.
ग्लोव्हजचे बॉक्स, शरीराच्या वेगवेगळ्या भागांचे पॅड्स कसलेसे गार्ड, हेल्मेट्स हा ढीग नुसता. कळेचना नक्की काय काय कुठे कुठे लावायचंय ते.
आपापल्या तडाख्यात जे जे सापडेल ते ते चढवून आणि इंग्रजांसारखी घुसखोरी करून बळकावलेल्या बॅट घेऊन दोन- चार जण तरी पळालेच, मैदानाच्या एका कडेला जे काही मच्छरदाणीसारखं दिसत होतं तिकडे.

मग बॅट मिळाल्या नसल्या तरी पायांना पॅड वगैरे बांधून आम्हीही तिकडे गेलो.
प्रत्यक्षात ती मच्छरदाणी एका बाजूने उघडीच होती, तिलाच नेट म्हणतात. माझ्या आठवणीत तरी नेट बॅडमिंटन आणि व्हॉलीबॉलमधेच पाहिल्यासारखी वाटत होती.
या तथाकथित नेटमध्ये व्यवस्थित आखून घेऊन स्टंप्स उभे होते. उत्साहाच्या भरात हातात बॅट घेतलेल्या लोकांनी हवेत बॅट फिरवून वगैरे दाखवल्या. इतक्यात प्रशिक्षक नावाचा तो पहाडी खडक आलाच.

" आजपासून आपण सराव सुरू करत आहोत!" ओळखी वगैरे करून घेण्याच्या फंदात न पडता तो गरजला.
" आता वॉर्मअप, कितीजण पॅडअप झालेयत?" पॅडअप म्हणजे सगळेच पॅड घातलेले लोक आमच्याकडे विजयी नजरेनं पाहत होते.
" चला बॅट उचला!" सगळ्यांकडे एकदम पाहत तो म्हणाला. इतकेजण एकदम बॅटिंग करणार ? या इवल्याश्या जागेत ? बाकी काही होवो न होवो पण  हे  एकमेकांची डोकी बॅटनं फोडतील, मग काय करायचे ?आणखीही काही प्रश्न मनाच्या डोहातून वर तरंगले होते पण प्रशिक्षकरूपी खडकाच्या पुढच्या वाक्यानं ते बुडून तळाला गेले.
" आता रनिंग बिटवीन विकेट्स! " असं म्हणून त्याने थेट बॅट हातात घेऊन धावायची खूण केली.
बिचारे मघाशी विजयाचा आनंद दिसणार्‍या डोळ्यांमध्ये वॉर्साचा तह केल्यासारखी आर्तता दिसत होती आणि त्याचा आसुरी आनंद आमच्या मनात फुलत होता.
" तुम्ही लोक, तुम्ही स्ट्रेचिंग करायचंय! "  कुणीतरी म्हटलंच आहे आनंद हा औट घटकेचा असतो.
स्ट्रेचिंग हा अतिशय त्रासदायक प्रकार असतो, हे ज्याने कुणी अनुभवलंय तोच यातली वेदना जाणू शकतो. अहो, तुम्ही कागदाला लावायचा रबर ताणायचा म्हटला की ताणला जातो हो, पण म्हणून टायरचा रबर ताणायचा प्रयत्न करायचा का ?
तिकडे आमच्या पॅडअप केलेल्या मंडळींचे हाल आणखी वाईट होते, धावायचं म्हटलं तर गुढघ्यावर आलेले पॅड धावू देत नव्हते आणि न धावावं तर हा पहाड अंगावर चाल करून येत होता, या गडबडीत लोळणफुगडीचा खेळ चांगलाच रंगला होता, अगदी त्यांचे कपडे रंगले होते, त्याही पेक्षा जास्तच.

आमचं स्ट्रेचिंग संपलं आणि एकदाचा तो कॅचचा सराव करू म्हणाला, मनात कुठेतरी सुटल्याची भावना आली, पण ही कोठडीतून सुटका होती तुरुंगातून नाही याचा प्रत्यय लगेचच आला.
एकतर हा सीझन बॉल म्हणजे तसं दणकट प्रकरण. मी आजवर त्यांची फॅक्टरी पाहिली नाहीये पण खात्री आहे की ती कुठल्यातरी नदीच्या काठी असावी, आणि नदीतून काढलेल्या गोट्यांना तासून त्यावर पातळसं कागदी आवरण लोखंडाच्या तारेने शिवत असावेत. टी.व्ही.वर मॅच पाहताना आपण एक झेल सुटला तरी त्या खेळाडूचे पितर बाहेर काढतो पण एकूण या चेंडूचं हे राकट प्रेम पाहता यापुढे त्यांनी सगळे झेल सोडले तरी माफ आहेत.
प्रशिक्षक नावाचा तो खडक जीव खाऊन चेंडू एकेकाकडे फेकत होता आणि चेंडूचा प्रेमळ स्पर्श टाळण्याचा आम्ही मंडळी आटोकाट प्रयत्न करत होतो.
त्या दिवसाचा सराव संपला तेव्हा पायातले गोळे आणि हाताला येणार्‍या झिणझिण्या सावरत आम्ही घराकडे सुटलो.

दुसर्‍या दिवशी उपस्थिती कमी होईलसं वाटलेलं पण, बरीच मंडळी सुतकी चेहरे घेऊन का होईना हजर होती.

आज आमची बॅट हातात घ्यायची पाळी होती. मला उगीचच वाटून गेलं की कालची मंडळी माझ्याकडे बळी द्यायला निघालेल्या बोकडाकडे पाहावं तश्या नजरेनं पाहत आहेत.

समोरच्या ढिगातून पॅडमॅन शॉर्टस्‌, थाय गार्ड, आर्म गार्ड, ग्लोव्हज, पॅड्स वगैरे सामग्री अंगावर चढवावी लागली. इतकं सगळं अंगावर घातल्यानं उगीचच पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण जास्त झाल्याची भावना मनात येऊन गेली. त्यात भर म्हणून हातात बॅट घेतल्यावर धावणं सोडाच पण हालचाल करणंही जड वाटायला लागलं. द्रविडला `दी वॉल' असं का म्हणतात ते आता कळलं. इतका सरंजाम अंगावर बाळगून भिंतीसारखं उभं राहणंच तो पसंत करत असेल, त्यांतून एखादी बाऊंड्री मारल्यावर तो इतका वेळ नुसता चेंडू तटवत दम खाणं आलंच.
तर असली सगळी कवचकुंडलं चढवून मी त्या जाळ्यात शिरलो खरा पण.....

" तुम्ही विकेट कीपरचे पॅड बांधलेयत, बॅटिंग पॅड बांधून या आधी! " खडक वासला.
खरंतर मी स्वतः:ला भाग्यवान समजत होतो की कुणातरी बुटक्या माणसाचे पॅड सापडले म्हणून, माझ्या तर जेमतेम गुढघ्यापर्यंत येत होते ते, आता कळलं ते यष्टिरक्षकाच्या सोयीसाठी असतात. मुळात, या समोर दिसणार्‍या यष्टी उखडायची संधी कधी मिळते याच्याकडे डोळा ठेवून असलेल्या माणसाला यष्टी`रक्षक' का म्हणतात हे मला अजून उमगलेलं नाहीये.
मघाचे पॅड्स बदलून गुढघ्यावर येणारे पॅड सांभाळत मी आपला पडायला लागलो, अंहं,शब्द चुकला नाहीये पळण्यापेक्षा पडण्यातच आमची प्रगती जास्त होतं होती म्हणून `पडायला' म्हणालोय.
सगळ्यांना बर्‍यापैकी धूळ चारुन झाल्यावर आज आमच्या खडकाला बॅटिंग शिकवण्याची इच्छा झाली खरी. आमचे हात आता शिवशिवायला लागले पण हातांना काही करायची संधी मिळालीच नाही कारण `फुटवर्क' नावाचा एक प्रकार क्रिकेटमध्ये असतो हे माहीतच नव्हतं.
हातात बॅट सांभाळत समोरच्या न दिसणार्‍या चेंडूकडे पाहत मागे पुढे पाय टाकण्याचा गरबा किंवा एखाद्या आदिवासी नृत्याशी साधर्म्य दाखवणार्‍या नाचाची सुरवात झाली.
क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच आपल्याला `फ्रंटफूट' म्हणजे पुढचा पाय आणि `बॅकफूट' म्हणजे मागचा पाय असले दोन जादाचे पाय असल्याचा शोध लागला,यापूर्वी मी आपला स्वतः द्विपाद असल्याच्या भ्रमात होतो.   
दिवस सरत होते आणि आमची कासवछाप प्रगती होत होती, बरेचसे मच्छरटाईप सहकारी क्रिकेटमधून स्वेच्छानिवृत्ती घेऊन मोकळे झालेले त्यामुळे शिलकीतल्या खेळाडूंचे बर्‍यापैकी हाल चालू होते.
`फुटवर्क' आणि `डिफेन्स'वरून `ड्राइव्ह'कडे झेप घेणारे आम्ही नेमकेच जण राहिलेलो. हे ड्राइव्हज म्हणजे एक चमत्कारिक प्रकार आहे, मैदानावर कुठेही चौकोन नसताना `स्क्वेअर ड्राइव्ह' कसा काय मारायचा हो !

अशाच अनेक चमत्कारांची जमतील तशी उत्तरं शोधत आम्ही पुढे सरकत होतो.
आणि एक दिवस तो खडक आणखी दोन ठोकळे घेऊन आला,
" आज पासून हे तुम्हाला बोलिंग करतील " खडकरावाने जाहीर केलं
नेटमध्ये परत मलूल अशी उत्साही लाट पसरली. नायरनं बॅटवर झडप घातली आणि राव कालपासून फक्त यष्टिरक्षण करत असल्यानं तो तिथेच राहिला. नायरकडून जोरदार फटक्यांची अपेक्षा नसल्यानं आम्ही आपले जवळपासच्या जागेवर क्षेत्ररक्षक म्हणून उभे होतो.
दोन्ही ठोकळे पालीकडल्या यष्ट्यांच्या दोन्ही बाजूस पावलं मोजत होते. आता हे दोघेही एकदम बोलिंग करणार की काय ? नायरच्या नजरेत क्षणभर भिजल्या मांजराचे भाव होते, पण नाही.
आधी एक आणि नंतर एक असे दोघे धावत आले आणि त्यांनी बहुदा गोलंदाजीचा अंदाज घेण्यासाठी हात फिरवले, नायरनंही मग नुसतीच बॅट हवेत फिरवून त्यांना प्रतिसाद दिला. दोन्ही ठोकळे समोरच्या यष्ट्यांजवळचे चेंडू हातात घेऊन मागे गेले आणि पुन्हा धावत येऊन गोलंदाजीची ऍक्शन करून दाखवली. आता मात्र नायर संतापला.
" अरे, बोलिंग तो करो यार, सिर्फ ऍक्शन क्यू कर रहे हो ? " नायर उखडला. त्याला रावनंही साथ दिली.
" बोलिंगच तर करतायत ते, मागे बघा! " खडकराव गरजले.
रावच्या मागे नेटला खेटून चार चेंडू जमिनीवरून आमच्याकडे पाहत आम्हाला वेडावत होते, शक्य झालं असतं तर रॅडीफमेलच्या जाहीरातीसारखं शिवण उसवत त्यांनी नाचुनही दाखवलं असतं. म्हणजे ? यांनी मघाशी दोन्हीवेळा चेंडू टाकले ? मग दिसले कसे नाहीत ? ....
त्या दिवसाचा सराव थांबवण्यात आला.

पहिल्या काही आठवड्यातच फलंदाज तयार करता करता गोलंदाजीची बाजू विचारात घेतली गेलीच नव्हती ती आता आली.
सीझनच्या चेंडूने गोलंदाजी करणं तसं बर्‍यापैकी सोपं वाटतं पण प्रत्यक्षात तो बोटांच्या वेड्यावाकड्या हालचालींचा एक संच आहे. हाताच्या मधल्या बोटाला, तर्जनीला फारच जास्त महत्त्व असलं तरी बाकी बोटंच काय पण आख्खा हातही यासाठी पूरक असावा लागतो.
सुरुवातीला आमच्यातले लोकच गोलंदाजी करणार म्हटल्यावर आम्ही जरा सुखावलो, नाहीतरी या दोन ठोकळ्यांचे तोफगोळ्यांच्या वेगात येणारे चेंडू आधी शोधताना, दिसलाच तर त्यांपासून स्वतःला वाचवताना आणि वाचलोच तर यष्ट्या राखताना आम्ही भयंकर थकलो होतोच.
कुठे आमचं गल्लीतलं टप्पी टप्पी आणि  `एकटप्पा आऊट' वालं क्रिकेट आणि कुठे हा तोफखाना, हाल झाले हो जिवाचे ! त्यातच यॉर्कर नावाचा चेंडूप्रकार थेट पायाच्या पावलांवर आदळू पाहायचा, हे म्हणजे उभ्या इमारतीचा पाया तोडण्याचा प्रकार झाला. सुदैवानं पायात सेफ्टीशूज नावाचा चेंडूपेक्षाही दणकट प्रकार असल्यानं इमारती अजुन उभ्या होत्या.

सुरुवातीला भरून वाहणारा आमच्या गोलंदाजांचा उत्साह दोनच दिवसात पार मावळला. साधा चहाचा कप उचलायचा म्हटलं तरी दुसर्‍या हाताचा आधार द्यावा लागायचा. त्यांतून त्या खडकरावाचं प्रवचन
" चेंडू खांद्यातून सोड" एकदा तो मलाच म्हणाला.
खांद्यातून चेंडू सोडायचा ? मग तो पंज्यात कशाला धरायचा ? असल्या फालतू प्रश्नांना तिथे थारा नव्हता. दोन तास चेंडू खांद्यातून सोडता सोडता शेवटी मला शंका यायला लागली की एखाद्या चेंडूसोबत हातही उखडून फलंदाजाकडे जातो की काय ?आणि असं झालंच तर हा खडकराव त्याला `नो बॉल'  म्हणेल काय ? पण वाचलो आणि मानवी शरीर वाटतं त्यापेक्षा मजबूत असल्याची खात्री पटली.

महिना दिडमहीना असेच भरमसाठ कष्ट उपसत गेल्यावर एकदाचा तो दिवस उजाडला. आज आमच्या आमच्यात पहिलीच मॅच होणार होती. लायकीप्रमाणे दोन्ही टीममध्ये गोलंदाज, फलंदाज विभागून क्रमवारी लावली गेली. आजच्या दिवसात एकच फरक आमच्यात पडलेला तो म्हणजे पायातले बूट. एरव्ही लोखंडी वाटीवाले बूट घालून खेळताना किमान पावलांच्या सुरक्षेचा प्रश्न कधीच भेडसावला नव्हता त्यानं आजच डोकं वर काढलेलं.

नाणेफेक झाली, फलंदाजी, क्षेत्ररक्षणाचा निर्णय झाला, आता झक मारत आम्ही मैदानावर उतरलो. खडकरावांना काय वाटलं कुणास ठाऊक पण मलाच म्हणाले,
" तू पहिली ओव्हर टाक! "
पावलं दोन-दोनदा मोजून टाकली पण साली नेमकी एकमेकांच्या अंतराशी जुळेनातच मग अंदाजेच स्टार्ट घेऊन पहिला चेंडू टाकला.
" नो!" खडक पुन्हा एकदा वासला, अंपायर ना तो, काहीही म्हणेल.
पुन्हा एकदा पायांची मोजामोज आणि परत एकदा चेंडूफेक,
" नो!" आणि पुन्हा एकदा नो बॉलच. अहो पण का ? यावेळी माझं लक्ष होतं , पाय नक्की त्या चौकोनात होता.
" तू साइड सांगितली नाहीस! " इति खडकराव
च्यायला हे विचित्रच काम आहे, मी नाही सांगितली मान्य, पण तुम्ही विचारू तर शकता ना !
आणि मी कुठूनही टाकला तरी चेंडू फलंदाजाच्या समोरूनच टाकणार ना ? की असाच धावत जाऊन त्याच्या मागून चेंडू टाकून त्याला आऊट करेन असं वाटतंय तुम्हाला ? मनातले प्रश्न मनातच दडपले गेले.
हा एक आणखी आगळाच न्याय, चेंडू डाव्या हाताने की उजव्या हाताने हे मान्य, पण यष्टीला वळून (राउंड द विकेट ) आणि यष्टीवरून( ओव्हर द विकेट ) हा काय प्रकार ? दोन्ही प्रकारे चेंडू यष्टीच्या बाजूनेच टाकला जातो ना !
असो, पहिल्याचं ओव्हरमध्ये दोन चेंडू जास्त आणि त्याच्या दोन धावा वगळता मोजून तीन धावा झाल्या, माझ्यासाठी सुरुवात चांगलीच.
पाठोपाठच्या चार ओव्हर्स म्हणजे नुसती पळापळ, फलंदाजांना फारच जास्त वेळ मैदानात राहायचा कंटाळा आल्यामुळे त्यांनी परतीचे रस्ते धरायला सुरुवात केली.
ओव्हर आठवी आणि विरोधी टीमचे दहा खेळाडू आऊट धावसंख्या सत्तावीस, त्यातल्या चौदा धावा अवांतर मिळालेल्या. जिंकण्याची सोपी संधी चालून आलेली.
आता आमच्या गोटात मारामारी, कोण आधी जाणार. गडबडीत यष्टिरक्षक असलेला राव तयारच असल्यानं तो बॅट उचलून निघाला त्याच्या पाठोपाठ नायर,
 " जाके दो चार सिक्सर मारके आता है" म्हणत बावळटासारखा अ‍ॅबडॉमीनल गार्ड चालता चालता लावत निघाला. दूरून पहाणार्‍याला तरी ते चित्र जरा असभ्यच वाटलं असतं. नायरच्या नुडल्सछाप मनगटात सिक्सर मारण्याची ताकद असेल तर आशिष नेहराने चेंडू स्टेडीयमच्या बाहेर फेकायला हवेत !  

आमच्या डावाची सुरुवात, पहिलाच चेंडू आला आणि नायरची बॅट जागची हालेपर्यंत यष्टी उखडून गेला. रावने जरा तग धरला. खडकरावांच्या सूचना चालूच होत्या. फलंदाजांची परतण्याची घाई दिसतच होती.
अकरा धावा चार गडी बाद, माझी फलंदाजीला जायची वेळ झाली.
" जा के एक सिक्सर लगाओ, बोलिंगमे दम नही है !"  पहिला चेंडूसुद्धा न खेळलेला नायर मला सांगत होता.
" जरूर लगाऊंगा, लेकीनं वो पीच है ना ! उसको जरा बाऊंड्रीके बाजुमे शिफ्ट करो!" नायरला गोंधळात टाकत मी निसटलोच.
एक गेला, दोन गेले, चेंडू मागून चेंडू जात होते मी टिकलो होतो.
" टाइमिंगवर लक्ष दे!" समोरून खडकराव ओरडले. मी नकळत हातातल्या नसलेल्या घड्याळाकडे पाहिलं.
कसलं टायमिंग ? दिवसातून जेवण्याचं, चहाचं आणि वर्षातून इन्क्रीमेंटच्या टायमिंग खेरीज आम्ही कुठलंच टायमिंग कधी साधलेलं नाही हे याला कोण सांगणार ?
" पण... मी तर गेली वीस एक मिनिटं खेळतोयच की! " हे मात्र उघडच बोललो.
" हो, पण रन्स किती ? चार ? त्या सुद्धा कीपरनं मिसफिल्ड केलं म्हणून!" खडकाच्या या वाक्यावर मी काय बोलणार ?
त्यानेच काहीतरी नस्तर लावलं असणार, मी तिसर्‍या चेंडूवर त्रिफळाचीत.

माझ्या मागोमाग फलंदाजीला सचिन गेला, गैरसमज नको, हा नुसताच नावाचा सचिन आहे. जिंकण्यासाठी नऊच धावांची गरज आणि चारचार जण शिलकीत राहिलेले मॅच जिंकल्यात जमा होती. खेळ चालूच होता .. आणि
एक चेंडू सचिनच्या बॅटच्या ग्रीपजवळून उडाला, कॅचचं जोरदार अपील झालं. तिकडे सचिन हात झाडतोय.
खडकरावांनी अंपायरची जागा सोडली आणि सचिनकडे धावले, घाई घाईत त्याचा ग्लोव्ह काढून टाकला, सचिनच्या अंगठ्यातून रक्ताची धार... हातात ग्लोव्हज असून अंगठा फुटला ? सगळे शहारले.पाठीमागे फलंदाजीला जाणार्‍यांनी तर एकावर एक असे दोन ग्लोव्हज घालण्याचा प्रयत्न केल्याचं मी पाहीलं.

झाला प्रकार असा होता. हे ग्लोव्हज डाव्या हाताच्या फलंदाजाला आणि उजव्या हाताच्या फलंदाजाला वेगवेगळे असतात. याच गोष्टीचा नेमका पत्ता कुणालाच नव्हता. डावखुरा सचिन उजव्या हाताचे ग्लोव्हज घालून गेलेला, साहजिकच मोकळा अंगठा समोर आल्याने तो फुटला.
मैदानभर रक्ताळलेला हात घेऊन सचिन नाचतच होता, त्याच्यामागे प्रथमोपचार पेटी घेऊन आणखी चारजण पळत होते. हा धिंगाणा अर्धा तास चाललेला. त्या दिवशीची मॅच रद्द झाली.
खडकराव दुसर्‍या दिवशी सकाळपासून बॉसच्या केबिनमध्ये होते. तासाभरानं बॉसनं तातडीची मीटिंग घेऊन निर्णय जाहीर केला.
" आपण पुण्याच्या टीम बरोबर मॅच कँन्सल केली आहे!"
नंतर चौकशी केल्यावर खडकरावाने आमच्यासमोर हात टेकल्याचे कळले.
" तुम्ही पन्नास म्हणता, हे लोक सगळे मिळूनही वीस ओव्हर्स खेळू शकणार नाहीत!" जाता जाता आमच्यावर टिपणी करून गेलाच.

त्या दिवशीपासून ते क्रिकेट कीट आजपर्यंत स्टोअर्सच्या कोपर्‍यात गुपचुप गुंडाळी करून बसलेय. दुखर्‍या शरीरांना हळूहळू आराम पडतोय. पण एक मात्र आहेच...

भारतीय क्रिकेट काही कौशल्यपूर्ण खेळाडूंना मुकलेय.

लेखक: आशिष निंबाळकर

८ टिप्पण्या:

विशाल विजय कुलकर्णी म्हणाले...

चाफ़्या, खासच रे ! आवडेश :)

शांतीसुधा (Shantisudha) म्हणाले...

कथा मजेशीर आहे. खडकराव वरून खडकसिंग आठवला!! :-)

ashish16 म्हणाले...

धन्यवाद :)

मंदार जोशी म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
मंदार जोशी म्हणाले...

हहपुवा झाली.

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

छान. हहपुवा.

अमित दत्तात्रय गुहागरकर म्हणाले...

हास्यस्फोट..!!!

क्रांति म्हणाले...

झक्कास! प्रेक्षक ग्यालरीमध्ये बसून सगळा समारंभ पाहत असल्याचा भास झाला! :)