इनव्हिक्टस!

Invictus01_Poster.jpg
त्तावीस वर्ष गोर्‍या लोकांनी तुरुंगात खितपत पडायला लावल्यावर - आणि त्यापैकी बहुतांश काळ सहा बाय पाच फुटांच्या एका खोलीत काढायला लागल्यावर - एका सामान्य कृष्णवर्णीय माणसाची सुटकेनंतर काय प्रतिक्रिया होईल? सुटल्यावर पहिली गोळी त्याने एका गोर्‍याला घालणे हीच. आणि समजा त्याच माणसाच्या ताब्यात देशाची धुरा सोपवली तर? कल्पना करवत नाही ना?

पण इथेच माणूस आणि देवमाणूस यातला फरक स्पष्ट होतो. ही गोष्ट आहे अर्थातच नेल्सन मंडेला यांची. इतकी वर्ष तुरुंगात खितपत पडल्यावरही 'सूड' ही भावना या महामानवाला शिवली देखील नाही. इतकंच नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्षपद हातात आल्यावर राष्ट्र उभारणीच्या प्रयत्नांमध्ये गोरे आणि काळे यांना बरोबर घेऊन राष्ट्रीय एकात्मता कशी साधता येईल हेच प्रमुख उद्दिष्ट त्यांनी ठेवलं.

दोन देशांमधली दरी मिटवण्यासाठी क्रिकेटचा वापर म्हणजेच क्रिकेट डिप्लोमसी आपल्याला नवीन नाही. मंडेलांनी देशांतर्गत एकी हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रग्बी या खेळाचा साधन म्हणून केलेला उपयोग मात्र नावीन्यपूर्ण म्हटला पाहिजे. इनव्हिक्टस हा अशाच धाडसी प्रयत्नांवर आधारलेला चित्रपट.
मंडेला यांची १९९० साली तुरुंगातून झालेली सुटका... इथे हा चित्रपट सुरू होतो. मग झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत त्यांचा पक्ष विजयी झाल्यावर राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडही होते. वाढत चाललेली गुन्हेगारी आणि बेरोजगारी  रोखणे आणि आर्थिक डोलारा सावरणे या आणि अशा अनेक आव्हानांना ते भिडतात. राष्ट्रीय रग्बी संघाच्या म्हणजेच स्प्रिंगबॉक्सच्या एका सामन्याला ते हजेरी लावतात तेव्हा यच्चयावत कृष्णवर्णीय प्रेक्षक हे आपल्याच राष्ट्रीय संघाच्या विरोधात घोषणाबाजी करताना तर विरोधी संघाला पाठिंबा देताना त्यांना दिसतात. कारण काळ्यांच्या दृष्टीने स्प्रिंगबॉक्स म्हणजे अपार्थाइड या वर्णद्वेषी कायद्याचं प्रतिनिधित्व करणारा संघ असतो. हे पाहिल्यावर कृष्णवर्णीय आणि गौरवर्णीय यांच्यातील दुरावा मिटवणं ही किती कर्मकठीण गोष्ट आहे हे त्यांच्या लक्षात येतं. पण "An optimist is a person who finds an opportunity in every calamity" हे वाक्य अंगी भिनवलेल्या मंडेला यांना या खेळातच एक आशेचा किरण दिसतो. जवळ जवळ वर्षभरातच दक्षिण आफ्रिका रग्बी विश्वचषकाचं यजमानपद भूषवणार असल्याने ही संधी साधून रग्बी हा खेळच राष्ट्रीय एकात्मता साधायला उपयुक्त ठरू शकेल अशी त्यांची मनोमन खात्री होते.
Invictus_sportscommittee.jpg
आधीच वर्णद्वेषी राजवटीचं प्रतीक म्हणून कृष्णवर्णीय जनतेत बदनाम असलेल्या स्प्रिंगबॉक्स संघाला त्याच्या वाईट कामगिरीचं कारण पुढे करून सरळ बरखास्त करावं अशा निर्णयाप्रत कृष्णवर्णीयांचं संख्याधिक्य असलेली दक्षिण आफ्रिकन क्रीडा समिती येते. पण निराळाच विचार आणि एक निश्चित ध्येय मनात असलेल्या मंडेलांच्या हस्तक्षेपामुळे स्प्रिंगबॉक्स संघाला आणखी संधी द्यावी या त्यांच्या विनंतीला समिती तयार होते. आणि मग सुरू होतो एक जबरदस्त प्रवास.
स्प्रिंगबॉक्स संघाने विश्वचषक जिंकल्यास ते राष्ट्रीय ऐक्य साधण्याच्या दृष्टीने एक मोठे यश ठरू शकेल असा विश्वास मंडेला स्प्रिंगबॉक्स संघाचा कप्तान François Pienaar (मॅट डेमन) याच्याकडे अप्रत्यक्षरीत्या व्यक्त करतात. तुरुंगात असताना त्यांना स्फूर्तिदायक ठरलेली Invictus ही कविता ते François ला ऐकवतात.
Invictus_mandelawithfrancois_office.jpg
हा अशक्यप्राय वाटणारा विजय प्रत्यक्षात आणायचा असेल तर कठोर परिश्रमांना पर्याय नाही हे जाणून François आणि त्याचे संघ ढोर मेहनतीला सज्ज होऊन प्रशिक्षण आणि सरावाला सुरवात करतात. एकदा तर मंडेला स्प्रिंगबॉक्स संघाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी हेलीकॉप्टरमधून सरावाच्या ठिकाणी अचानक भेट देतात. मंडेलांच्या कल्पनेशी संघनायक François सहमत असला तरी वांशिक संघर्ष, रक्तपात, आणि परस्पर द्वेष यांनी अनेक तपं देशात आंतरिक कलह माजवलेला असताना रग्बी हा खेळ देशात काळ्या-गोर्‍यांची कशी काय एकी घडवून आणणार अशी शंका अनेक दक्षिण आफ्रिकी नागरिकांना असते.
Invictus_mandelatrainingvisit.jpg
मंडेलांच्या सूचनेनुसारच संघातले खेळाडू फक्त बंदिस्त सरावात आनंद न मानता सामान्य नागरिकांत - मुख्यत्वेकरून कृष्णवर्णीय नागरिकात मिसळणे - हा सरावाचा एक भागच बनवून टाकतात. चित्रपटातला हा भाग अत्यंत हृदयस्पर्शी आहे. खेळाडू रस्त्यावर, मैदानात, गरीब वस्तीतल्या कृष्णवर्णीय लहान मुलांबरोबर खेळतात तेव्हा त्या लहानग्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद जे काही सांगून जातो, ते शब्दांत मांडणं निव्वळ अशक्य आहे. यासाठी हा चित्रपटच बघायला हवा.
Invictus_trainingwithchildren.jpg
सरावाचा भाग म्हणून लोकांत मिसळल्याने जनतेत एक सुंदर सकारात्मक संदेश जातो आणि अधिकाधिक कृष्णवर्णीय नागरिक स्प्रिंगबॉक्सला पाठिंबा देऊ लागतात. पहिल्या सामन्यात स्थानिक जनतेचा फारसा पाठिंबा मिळवू न शकलेला हा संघ मात्र दुसर्‍या आणि पुढच्या सामन्यांत  सर्व जमातींचे प्रेक्षक बघून हरखून जातो. अर्थात साक्षात राष्ट्राध्यक्ष मंडेला यांचा वरदहस्त या मोहिमेला असल्याने जनता अधिकच विश्वासाने आणि आत्मीयतेने स्प्रिंगबॉक्सकडे पाहू लागते. मंडेलांचा सशक्त पाठिंबा, नियोजनबद्ध सराव, जनतेच्या सर्व थरातून मिळणारा आणि दिवसेंदिवस वाढत जाणारा पाठिंबा यांनी संघाची कामगिरी सातत्याने सुधारत जाते आणि विजेतेपद तर सोडाच, पण हा संघ फार फार तर उप-उपांत्य फेरी गाठेल हा तज्ञांनी व्यक्त केलेला अंदाज खोटा ठरवत स्प्रिंगबॉक्सचा संघ न्यूझीलंड ऑल ब्लॅक्स या जगातल्या सर्वोत्तम संघाविरुद्ध अंतिम सामना खेळायला सज्ज होतो. अंतिम सामन्यात राष्ट्राध्यक्ष मंडेला हे स्प्रिंगबॉक्स संघाचा शर्ट घालून मैदानात दोन्ही संघांना शुभेच्छा देण्यासाठी अवतरतात.
Invictus_mandelawithfrancois_final.jpg

मग पुढे काय होतं? François Pienaar च्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा स्प्रिंगबॉक्स संघ अंतिम सामना जिंकतो का? मंडेलांचं स्वप्न पूर्ण होतं का? हे सगळं बघायला मात्र चित्रपट प्रत्यक्षच बघा.
मला वाटलेला चित्रपटाचा सगळ्यात जमेचा भाग म्हणजे इतर चरित्रात्मक चित्रपटांसारखं (उदा. गांधी) कुठेही चरित्रनायकाचं अवास्तव उदात्तीकरण केलेलं नाही, त्याला देवत्व वगैरे बहाल केलेलं नाही. गोरे आणि काळे यांची एकी घडवून आणण्यामागे मंडेला यांची फक्त आणि फक्त मानवतावादी वृत्ती आहे असं न दाखवता त्यामागचा त्यांचा वास्तववादी दृष्टिकोन आणि राजकीय दूरदृष्टीही चित्रपटात दाखवली आहे. प्रशासकीय व्यवस्थेतले महत्त्वाचे घटक असलेले नोकरशहा आणि संरक्षण ज्यांच्या हातात ते सैन्य आणि पोलीस यांत असलेल्या गौरवर्णीयांचे अनुभव (आणि संख्याधिक्य सुद्धा) लक्षात घेऊन अतिशय कौशल्याने त्यांचे हितसंबंध जपत, कुणालाही फारसं न दुखावता कृष्णवर्णीयांनाही या विभागात योग्य संधी कशा मिळतील याची काळजी मंडेलांनी घेतली त्याचीही छोटीशी झलक आपल्याला बघायला मिळते.

मंडेला यांच्या अंगरक्षकामध्ये असलेले गोरे आणि काळे सदस्य यांच्यातली धुसफुस दाखवणारं दॄश्य इथे ठळकपणे आठवतं. एकाच वेळी गंभीर आणि गंमतीदार वाटणारं दृश्य लक्ष देऊन बघण्यासारखं आहे. तसंच आणखी एक दृश्य - आपल्याला गोर्‍यांसोबत काम करावं लागणार हे समजताच अंगाचा तिळपापड झालेला काळा अंगरक्षक जेसन, राष्ट्राध्यक्ष मंडेलांच्या ऑफिसात आपलं गार्‍हाणं घेऊन जातो. याच गोर्‍यांनी कदाचित आपल्यावर गोळ्या झाडल्या असतील मागे... असं उद्विग्नपणे म्हणणार्‍या जेसनला समजावताना मंडेला म्हणतात "Reconciliation starts here.........." हे वाक्य त्यांच्यातला नेता जागा असल्याचं दाखवतं तर "Forgiveness starts here too. Forgiveness libarates the soul. It removes fear. That is why it is such a powerful weapon.", या वाक्यातून त्यांच्यातला महामानव बोलतो.

पात्रनिवडीसाठी संबंधितांचं खास अभिनंदन केलंच पाहिजे. नेल्सन मंडेला यांच्या भूमिकेसाठी मॉर्गन फ्रीमन या ज्येष्ठ आणि गुणी चरित्र अभिनेत्याची इतर कुठल्याही पर्यायांचा विचार न करता झालेली निवड हा एक अचूक ठरलेला निर्णय. मॉर्गन फ्रीमन यांनी नेल्सन मंडेला यांच्या व्यक्तिमत्त्वाचा चांगलाच अभ्यास केलेला स्पष्ट दिसतो. संपूर्ण चित्रपट बघताना कुठेही आपण मॉर्गन फ्रीमन या स्टारला बघत नसून साक्षात मंडेलाच पडद्यावर वावरत आहेत असं वाटत राहतं इतका अप्रतिम मुद्राभिनय आणि मंडेला यांच्या देहबोलीची आणि उच्चारांची उत्कृष्ट नक्कल फ्रीमन यांनी केली आहे. मंडेला यांना बोलताना ज्यांनी टीव्हीवर ऐकलं असेल त्यांना फ्रीमन यांचं कौतुक करण्यावाचून पर्याय राहणार नाही. बॉर्न आयडेंटिटी आणि त्याचे सिक्वेल, ऑशन्'स चित्रपट मालिका, सिरिआना, द डिपार्टेड आणि अशा अनेक यशस्वी चित्रपटातून आपला चतुरस्र अभिनय सादर करणारा मॅट डेमन याने आपल्या नेहमीच्या डॅशिंग अ‍ॅक्शन हिरोचं बेअरिंग थोडं बाजूला ठेवून संयत अभिनयाचं सुंदर दर्शन घडवलं आहे. बॉलीवूडशी तुलना करायची तर अशा प्रकारच्या भूमिका आपल्याकडे जॅकी श्रॉफच्या वाट्याला यायच्या.

पण आधी एक इशारा देऊ इच्छितो. दिग्दर्शक म्हणून क्लिंट इस्टवूड हे नाव आणि कलाकारात मॉर्गन फ्रीमन आणि मॅट डेमन ही नावं वाचून हा सिनेमा बघायला जाणार असाल तर पुन्हा विचार करा. कारण या दोघांच्या सशक्त अभिनयाने नटलेला हा चित्रपट मात्र थरारक, वेगवान, किंवा अंगावर काटा आणणारा वगैरे अजिबात नाही. अनेक ठिकाणी बर्‍यापैकी संथ तर काही ठिकाणी तर हा चक्क डॉक्युमेंटरी चालली आहे की काय असं वाटण्याची दाट शक्यता आहे. अनेकांना हा चित्रपट चक्क कंटाळवाणाही वाटू शकतो. सुरवातीला काही दृश्यांमध्ये संवादही कृत्रिम आणि पाठांतर करून म्हटल्यासारखे - म्हणजेच सहजतेनं न येता नाटकी वाटतात. पण कथेच्या आत्म्याशी मात्र चित्रपट संपूर्ण प्रामाणिक राहतो. शिवाय नेल्सन मंडेला नामक जादुगार, मॉर्गन यांनी इतक्या जबरदस्तपणे उभा केला आहे की चित्रपटातल्या बाकी त्रुटींकडे लक्षच जात नाही.

मंडेला यांच्या बरोबर उलट मार्गक्रमण केलेल्या शेजारच्या झिंबाब्वेतल्या रॉबर्ट मुगाबे यांच्या नेतृत्वाखाली आज झिंबाब्वेची अराजक, हिंसा, आणि भ्रष्टाचार यांच्यामुळे चाललेली ससेहोलपट आपण बघतोच आहोत. मंडेला यांनी स्प्रिंगबॉक्स रग्बी संघात गोर्‍यांच संख्याधिक्य असूनही हा संघ जास्तीत जास्त ताकदवान आणि यशस्वी कसा होईल याकडे लक्ष दिलं, तर मुगाबे यांच्या द्वेष आणि सूडानेच भरलेल्या राजवटीने देशाच्या सर्वच क्षेत्रात बजबजपुरी ही माजवली. कमकुवत असलेला - म्हणजे 'झिंबाब्वे उभा राहिला, आम्ही नाही पाहिला' - असा झिंबाब्वेचा क्रिकेट संघ फ्लॉवर बंधू, अ‍ॅन्डी ब्लिगनॉट, मरे गुडविन, पॉल स्ट्राँग, नील जॉन्सन, एड्डो ब्रँडिस यांच्यासारख्या अनेक गुणी खेळाडूंमुळे हळूहळू प्रगती करत सामने आणि मालिका जिंकायला सुरवात करत असतानाच त्यांना त्यांच्या गौरवर्णामुळे (रिव्हर्स रेसिझम/डिस्क्रिमिनेशन?) संघाबाहेरच नव्हे तर देशाबाहेरही पडायला भाग पाडून झिंबाब्वेतल्या क्रीडा क्षेत्राचीही ससेहोलपट केली. १९९५ साली रग्बी विश्वचषकाचं यजमानपद भूषवलेल्या दक्षिण आफ्रिकेने त्या पाठोपाठ २००३ साली क्रिकेट विश्वचषक आणि २०१० सालचा फुटबॉल विश्वचषकाचं यजमानपदही भूषवलं आणि खेळजगतावर आपला ठसा उमटवला.

चित्रपटातील एका दृश्यात मंडेला यांच्या सुटकेनंतर त्यांच्या मोटारींचा ताफा एका रग्बी मैदानावरून जात असताना एक शा़ळकरी मुलगा शाळेच्या रग्बी प्रशिक्षकाला विचारतो, "हे कोण आहेत सर?"
त्याला उत्तर मिळतं, "It's the terrorist Mandela, they let him out. Remember this day boys, this is the day our country went to the dogs."
या पार्श्वभूमीवर मुगाबेंच्या सारखं वागणं मंडेला यांना अशक्य होतं का? नक्कीच नाही. लेखाच्या सुरवातीला उल्लेख केल्याप्रमाणे इतकी वर्ष ज्यांच्यामुळे तुरुंगात सडावं लागलं, तर बाहेर पडल्यावर पहिली गोळी त्यातल्याच एका गोर्‍यालाच घालावीशी वाटली असती. पण हाडाचे लोकशाहीवादी असलेल्या नेल्सन मंडेला यांच्या मनाला सूड, प्रतिशोध वगैरे तर नाहीच, पण गोर्‍यांप्रती द्वेषभावनाही शिवली नाही. दक्षिण आफ्रिकेत अनेक शतकं गोर्‍यांचे अत्याचार सहन केल्यानंतर काळ्यांची मानसिकता काय असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. तसंच 'आता काळ्यांच्या हातात राज्य गेलं - मग आपलं भवितव्य काय' ही चिंता गोर्‍यांनाही सतावणं साहजिकच. पण याही परिस्थितीतून मार्ग काढून मंडेलांनी दक्षिण आफ्रिकेला स्थैर्य मिळवून देण्याच्या दिशेने दमदार वाटचाल सुरू केली. अनेक जाती-जमातींमध्ये विभागले गेलेले आणि गुलामी आणि भेदभाव यांच्याखाली पिचलेले कृष्णवर्णीय आणि वर्षानुवर्ष फक्त राज्यकर्त्याची भूमिका करण्याची सवय झालेले गौरवर्णीय यांच्यात परस्पर सहकार्यच नव्हे तर सौहार्द निर्माण करण्याची किमया त्यांनी करून दाखवली. काळ्यांची प्रगती व्हावी आणि गोर्‍यांना हा देश त्यांचाच वाटत राहावा ह्या दोन्ही गोष्टी साध्य करण्यात आज जर दक्षिण आफ्रिका बर्‍याच अंशी यशस्वी झाला असेल तर तो निव्वळ नेल्सन मंडेला आणि त्यांच्या समविचारी सहकार्‍यांमुळेच.

चित्रपटातील एका दृश्यात एक सुंदर संवाद आहे. François Pienaar आणि त्याचा संघ मंडेला यांना ज्या तुरुंगात ठेवण्यात आलेलं होतं त्या तुरुंगाला भेट देतात. ते ठिकाण बघून एका संघसहकार्‍याशी बोलताना François म्हणतो ".......I was thinking about how you spend 30 years in a tiny cell, and come out ready to forgive the people who put you there." हे वाक्य ऐकल्यावर मंडेला नामक महामानवाला मनोमन वंदन केल्यावाचून राहवत नाही.

कधी कधी वाटतं की आपल्याकडे नेल्सन मंडेला यांच्याइतकी दूरदृष्टी असलेला, समाजाभिमुख राजकारण करणारा आणि अर्थातच त्यांच्या इतका करिश्मा असलेला नेता आपल्या देशाला मिळाला असता तर....... तर कदाचित आज जी बजबजपुरी माजली आहे ती माजली नसती. सार्‍या जर आणि तरच्या गोष्टी. भविष्यात असा नेता कदाचित निर्माण झालाच तर त्याच्यावर असा चित्रपट आपल्याकडे निर्माण होईलही. पण तोपर्यंत आपण चक दे इंडिया सारखे बालिश चित्रपट बघत राहण्यापेक्षा इन्व्हिक्टस सारख्या चित्रपटांचा आस्वाद जरूर घेऊ शकतो.
हा लेख वाचून चित्रपट बघावासा वाटल्यास आणि बघून चित्रपट आवडल्यास जरूर कळवा.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
सर्व छायाचित्रे: आंतरजालावरून साभार.

लेखक: मंदार जोशी
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

1 टिप्पणी:

शांतीसुधा (Shantisudha) म्हणाले...

>>कधी कधी वाटतं की आपल्याकडे नेल्सन मंडेला यांच्याइतकी दूरदृष्टी असलेला, समाजाभिमुख राजकारण करणारा आणि अर्थातच त्यांच्या इतका करिश्मा असलेला नेता आपल्या देशाला मिळाला असता तर....... तर कदाचित आज जी बजबजपुरी माजली आहे ती माजली नसती.>>> 100%

परीक्षण आवडलं.