पृष्ठे

सांजवेळी साथीला सूर देउन जा ना...!

सांजवेळी साथीला सूर देऊन जा ना
रंग मावळतीचे जरा उधळून  जा ना

तो सूर्य विझत चालला नभात एकटाच
भाळी आभाळाच्या चंद्रकोर रेखून जा ना

छे, कशास चर्चा त्या चतकोर आभाळाची
या घराच्या आठवणी उजळवून जा ना

चेहरे लेऊन येतील खोटी स्मिते अनेक
लक्ष्मणरेषा अंगणी जरा आखून जा ना

चांदण्यात वाचेन मी निरोप बोलके तुझे
इथल्या वार्‍यास तुझा गंध देऊन जा ना

पाऊले घेऊन चालली परक्या देशी तुज
मेघतुडुंब नैनात चैत्रमास फुलवून जा ना

कवयित्री: नयना वानखेडे

४ टिप्पण्या: