सफेद वाटाण्याची उसळ!

साहित्य: सफेद वाटाणे, २ कांदे, १ चमचा सुके खोबरे, टोमाटो, आले, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढी  पत्ता,  मोहरी, जिरे, हिंग, तेल, तिखट, गरम मसाला, हळद अन मीठ.
कृती: वाटाणे ७-८ तास भिजवून ठेवा. भिजवलेले वाटाणे कुकरमध्ये शिजवून घ्या. १ कांदा गॅसवर अक्खाच भाजून  घ्या. भाजलेल्या कांद्याची वरची साले काढून घ्या. सुके खोबरे भाजून घ्या. भाजलेले खोबरे अन कांदा मिक्सरमध्ये वाटून पेस्ट करा. आले-लसूण-हिरव्या मिरच्या-कोथिंबीर  बारीक चिरून घ्या. टोमाटो ही चिरून ठेवा. १ कांदा उभा चिरून घ्या.
फोडणीसाठी तेल गरम करा. मोहरी अन जिरे फोडणीस  घाला. मोहरी तडतडली कि लसूण पाकळ्या ठेचून घाला. हिंग, कढी पत्ता, हिरव्या मिरच्या, आले, लसूण घाला. चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. हळद, तिखट अन गरम मसाला घाला अन परता. टोमाटो घाला अन झाकण ठेवून शिजवा. आता यात शिजवलेले वाटाणे घाला अन चांगले परतून घ्या. झाकण ठेवून शिजू द्या. आवश्यकतेनुसार पाणी घाला. चांगली उकळी आल्यावर अन वाटाणे व्यवस्थित शिजले की मग कांदा-खोबर्‍याचे वाटण घाला. पुन्हा उकळी देऊन चवीनुसार मीठ घाला. शेवटी बारीक चिरून कोथिंबीर घाला अन उसळ सजवा.
प्रेषक: आल्हाद पाटील

1 टिप्पणी:

Meenal Gadre. म्हणाले...

पावाबरोबर मस्त लागेल.