सायकल !

माझ्या दोन इच्छा आहेत. हो इच्छाच..! स्वप्न नाही म्हणू शकत कारण, मला जी काही विचित्र स्वप्नं पडतात त्यांची पुर्तता होणे, ही गोष्ट आमच्या सौ. ने सुग्रास भोजन बनवण्याइतकी अशक्य आहे.

मागे मला 'मी व्हाईट हाउसमध्ये राहतोय' असलं अतिरेकी (की अमेरिकी?) स्वप्न पडलेलं मी माझ्या परमप्रिय मित्र गोपाळला सांगितलं. त्याने गंभीर सिनेमात घेतात तसा मोठ्ठा पॉज घेण्याची आपली 'वाईट हौस' पूर्णं करून घेतली.
"अरे मग त्यात काये..! घराला सफेद रंग लाव. व्हाईट हाउसमध्ये राहत असल्याचा फील येईल." असं म्हणून हिरव्यागार गवतातून दोन ससे बाहेर पडावेत, तसे झुपकेदार मिशीआडून पुढे आलेले दोन दात आणखीनच बाहेर काढत गोपाळ हसला.
त्याच्या श्रीमुखात भडकवून त्याला दिवसा तारे दिसल्याचा 'फील' आणावा, असा उग्र विचार त्याक्षणी माझ्या मनात उत्पन्न झाला होता. 'फील'हाल तो विचार मी तेव्हा मनातून रहित केला.

असो. तर माझ्या त्या दोन इच्छा पुढीलप्रमाणे आहेत. एक.... सायकल चालवायला शिकणे आणि दुसरी..... पोहायला शिकणे.
पैकी पोहायला शिकण्यासाठी मी पाण्यात हात - पाय मारून पाहिले, परंतू जशी पाण्याने माझ्या नाका - तोंडात एंट्री घेतली तशी मी पाण्यातून एक्झिट घेतली. तदनंतर जेव्हा कधी आम्हा मित्रांची टोळी दगडू मळेवाल्याच्या आडात डुंबायला जायची तेव्हा मी आडाजवळच्याच एका कातळावर बसून डुंबणार्‍या मित्रांची वस्त्र सांभाळत बसे.
अशारितीने माझ्या पोहण्याच्या इच्छेवर 'पाणी' सोडून मी मनात 'भूल जा स्वीम स्वीम' म्हणालो अन आपला मोर्चा सायकलकडे वळवला.


आमच्या गावात तेव्हा सर्वात जास्त काळ सायकलवर हिंडणारा एकमेव प्राणी म्हणजे पोस्टमन. तो कधी आमच्या घरासमोरून आपल्या सायकलची घंटी वाजवत गेला म्हणजे मला त्याचा मोठ्ठा हेवा वाटे.
तशी आमच्या चुलत्यांची सायकल होती म्हणा. पण आता ती चालण्याच्या स्थितीत नव्हती. आपले पंक्चर झालेले दोन्ही पाय गळून पडलेल्या अवस्थेत ती कित्येक वर्षे आमच्या घराच्या पाठीमागील भिंतीला टेकून उभी आहे.

शेजारच्या गावातल्या यश्टी स्टँडवर सायकल रिपेरिंगचं एक दुकान होतं, तिथं ती रंजलेली - गांजलेली (की गंजलेली?) सायकल नेऊन दोन्ही टायरचे पंक्चर काढले, ब्रेकचं काम केलं. तिथंच मी जमा केलेले पैसे संपले. सायकलमधील सीट उखडलेली असणे, पायंडलचे रबर जाऊन नुसतीच ती लोखंडी गुळगुळीत नळी शिल्लक राहणे इ. इ. छोटे मोठे दोष अजून तसेच होते. असू देत. जसे पैसे जमतील तसे एक - एक काम करत जाईन, मी आपल्या मनाची समजूत काढली.

मला कधी एकदा सायकल शिकतोय असं झालं होतं. सायकल शिकेपर्यंत कुणीतरी सायकल पकडणं आवश्यक होतं. मी गावातील अनेक गल्ल्या हिंडून काही मित्रांना बोलावून आणले.
"आधी मला एक राउंड पायजे." या अटीवर प्रत्येकाने माझ्या सायकलवर टांग टाकून माझं घर ते खालच्या आळीपासून मैलभर असलेल्या स्मशानापर्यंत एवढा मोठ्ठा राउंड मारून नंतर "माझ्या आईने मला बाजारातून अमुक आणायला सांगितलंय","माझ्या बापानं मला शेतावर बोलवलयं." अशी कारणे सांगून त्यांनी आधी जशी सायकलला टांग दिली, तशीच आता मलापण टांग दिली.

आता उरलो होतो फक्त मी आणि माझी सायकल.
एकलव्याने जशी गुरुविना एकट्यानेच धनुर्विद्या आत्मसात केली तशी मीदेखील एकट्यानेच सायकल शिकण्याचा निर्धार केला. सायकलवर टांग टाकून जरा घाबरतच पायंडल मारले. डोळे कधीच गच्च मिटले होते. काही वेळाने हळूहळू डोळे उघडले आणि काय आश्चर्य..!! मी सराईतपणे सायकल चालवत होतो. ढोपरं न फोडता पहिल्याच प्रयत्नात सायकल शिकणारा जगात बहुधा मी एकमेव असेन.
मग काय विचारता? गावातली कुठली गल्ली अशी बाकी नसेल जिथे माझ्या सायकलच्या चाकांच्या रेषा उमटलेल्या नसतील.
काही दिवसांत मी सायकल चालवण्यात मास्टर की काय म्हणतात? तो झालो. आईपण माझ्यावर खूश होती. म्हणजे याआधी कुठलंही काम करण्यासाठी टाळाटाळ करणारा मी कधी दुकानातून सामान घेऊन ये, कधी चक्कीत दळण टाकून ये इ. कामे सायकलवरून त्वरित आणि आवडीने करू लागलो.
आता मी सायकलने उतारावरून जाताना बिनधास्त पायंडलवरले पाय काढून हँडलवर ठेवू शकत होतो. हँडलवरले हात काढून सिनेमातल्या हिरोसारखे केसांतून फिरवू शकत होतो.

एकदा मात्र वाईट घडलं. असंच उतावरून सायकलने सुसाट जात असताना मी सीटवरून उठून पायंडलवर उभा राहून अंगभर वारा झेलत राहिलो. उतार संपला तसा मटकन सीटवर बसलो मात्र.. माझ्या पार्श्वभागात सीटखालील उभी लोखंडी नळी योग्य जागा बघून थेट घुसली. तेव्हा माझ्या लक्षात आले, सायकलची सीट वरचेवर अशी निघतेच. आता ती सीट दणका सहन न झाल्याने मागे काही अंतरावर सायकलवरून उडी मारून धुळीत लोळत पडली होती.
पुढे काही दिवस मला परसाकडे बसायला प्रचंड त्रास होत होता.
ही एक दुर्दैवी घटना सोडली तर सायकलने मला कधी कुठलीही इजा केली नाही.

माझी सायकलमधील प्रगती पाहूनच की काय? सुमीने पक्याचा पत्ता कापून माझ्याशी जवळीक वाढवली. हळूहळू ती माझ्यावर पक्याच्या भाषेत सांगायचं झालं तर 'लव' करू लागली. माझ्याही तिच्या घरापुढील सायकल फेर्‍या वाढल्या.
सुमीला सायकलवर फिरवण्याची माझी कैक दिवसांपासूनची इच्छा अखेर एके दिवशी पुरी झाली.
आदल्या दिवशी मी तिला जास्त गजबज नसलेल्या गावाबाहेरच्या कच्च्या रस्त्यावर दुपारी भेटावयास बोलवले. दुपारच्या वेळी त्या रस्त्याला शुकशुकाट असतो.

मी शर्ट इन करून तयार झालो आणि सायकलवर टांग टाकून झपाझप पायंडल मारीत गावाबाहेरच्या त्या रस्त्याच्या दिशेला लागलो.
"अरे चैन उतरलेय बघ." रस्त्याने गावाकडे जाणारा चंदन आळीतला परश्या माझ्याकडे बघत बोलला.
मी सायकल न थांबवता खाली पाहिले. सायकलची चैन आपल्या जागेवर व्यवस्थित फिरत होती. मग परश्या असं का बोलला? या प्रश्नानं मी प्रचंड बे'चैन' झालो.
नंतर माझ्या लक्षात आलं, तो सायकलच्या चेनबद्दल बोलत नसून पॅन्टच्या चेनबद्दल बोलत होता. मी पॅन्टची खिडकी बंद केली आणि वाटेला लागलो.
बरं झालं बाबा..! परश्या अगदी देवासारखा धावून आला. नाहीतर सुमीसमोर माझी कोण फजिती झाली असती..!

रस्त्यावर पोचलो तेव्हा सुमी चिंचेच्या झाडावर दगड फेकून चिंचा पाडताना दिसली. त्यातला एक दगड माझ्या कपाळाच्या दिशेनेपण आला. मोठ्या चपळाईने मी तो चुकवला.
"अगं जरा बघून फेक दगडं. कुणाचं कपाळ फुटलं म्हंजे?" सायकल एका झाडाला टेकत मी.
"आता ही सायकल डेपोला कशाला लावली? प्यासेंजर कवापासून खोळंबलंय इथं..!" कमरेत बेअरिंग बसवल्यासारखी या दिशेकडून त्या दिशेकडे फिरत, नाही - नाही म्हणणार्‍या पंख्यासारखी फिरत सुमी बोलली.
आता इतकं देखणं 'प्यासेंजर' समोर असताना वाहन डेपोला लावणं, हे म्हणजे बायकोची एखादी सुंदर तरुण मैत्रीण घरात आलेली असताना आपल्या डोळ्यांवरचा चष्मा काढून ड्रॉवरमध्ये ठेवण्यासारखे आहे.
मी लागलीच सायकल रस्त्यावर आणून तिवर टांग टाकली.
"बैस मागे." मी आपली मान मागे वळवत सुमीला बसण्यास सांगितले.
"मी नाय मागं बसनार." सुमी आपल्या दोन वेण्या हालवीत म्हणाली.
"मग?"
"मला फुडं बसायचयं." वेण्यांचा झोपाळा थांबला होता.
"अस्सं..! मग बस पुढं." दैवाला आणि मला हेच अपेक्षित असावं.
सुमी एकाच बाजूला दोन्ही पाय ठेवून हँडल पकडीत सायकलच्या समोरील दांडीवर बसली. मी ताकदीने पायंडल ढकलीत सायकल पळवू लागलो.

क्षणाक्षणाला हँडलवरील सुमीच्या कोमल हातांना माझ्या हातांचा स्पर्श होत होता.
सुमीने एकदम टायटानिक सिनेमातल्यासारखे आपले दोन्ही हात हवेतपण पसरवले. सुमीला खूप मजा येत होती. कधी तिच्या केसांतला खोबरेल तेलाचा वास माझ्या नाकात शिरत होता, तर कधी तिच्या वेणीला बांधलेल्या रिबीनीचं एखादं टोक माझ्या नाकात शिरून मला शिंका आणीत होता.
एकंदर सगळीच मौज होती. सायकलवर मनसोक्त हिंडून झाल्यावर आम्ही दोघे भेंडीच्या झाडाखाली विसावलो आणि सुमीने आपल्या पेटीकोटच्या खिशातून मघाशी पाडलेल्या काही चिंचा काढून मला दिल्या. आम्ही डोळे गच्च मिटत चिंचा खाल्ल्या आणि घराकडे परतलो.

त्याच संध्याकाळी सुमीचा बाप मुखात शिव्यांची कॅसेट टाकून उच्च आवाजात आमच्या घरापुढे धिंगाणा घालीत होता. चंदन आळीतल्या परश्याने दुपारी आम्हा दोघांना सायकलवर हिंडताना पाहिलं होतं आणि जाऊन जशीच्या तशी हकीगत सुमीच्या बापाच्या कानात सांगितली होती, हे त्या धिंगाण्यातून मला कळले. मघाशी देवासारखा धावून येणारा परश्या यावेळी चिडून गोलंदाजी करणार्‍या शोएब अख्तरसारखा धावत आला. ऐनवेळी मला अख्तरच कसा काय आठवला? ते एक खुदालाच मालूम...!
माझ्या चुन्याच्या डबीएवढ्या छातीत धडकी भरली.
माझ्या वडिलांनी प्रसंगावधान राखून सुमीच्या बापाला आमच्या घरात नेऊन बराच वेळ त्याची समजूत काढली तेव्हा कुठं तो चावी दिलेल्या खेळण्यासारखा गुमान त्याच्या घराकडे गेला.
अखेर 'मी सुमी राहते त्या गल्लीत पाऊल जरी टाकलं, तरी माझ्या तंगड्या तोडण्यात येतील.' (तोडल्यानंतर पाय.. पाय न राहता तंगड्या होतात, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.) या माझ्या वडिलांच्या धमकीने त्या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला.

या घटनेने मी बराचसा निराश झालो.
त्यावेळी माझ्या त्या स्थितीच्या बॅकग्राऊंडला
तेरी गलियों में ना रखेंगे कदम आज के बाद...
हे गाणं फीट्टं बसलं असतं.
आता मला सायकल फिरवण्यात कसलीच मौज वाटेना. मी नुसताच गावाबाहेरच्या त्या कच्च्या रस्त्यावरून उदासवाणा चकरा मारे.

परवा सायकलवरून प्रचंड वेगात खालच्या आळीला जाताना रस्त्यात एक म्हैस उभी असलेली लांबूनच मला दिसली. मी सायकलची घंटी बडव बडव बडवली. म्हैशीच्या कान आणि शेपटीखेरीज काहीच हालले नाही. मी म्हैशीच्या अधिक जवळ जाऊ लागलो. एकीकडे घंटी वाजवणं सुरूच होतं, पण म्हैस ढिम्म.
एक क्षण तर असा आला की, मी म्हशीला धडकणारच होतो पण चपळाईने मी सायकलचा हँडल फिरवला आणि म्हशीच्या शेजारून हाती टमरेल घेऊन परसाकडे निघालेल्या अंता चौगुल्याला मी सायकलसकट धडकलो.
अंत्या चौगुले टमरेलासकट किक मारलेल्या फुटबॉलसारखा जमिनीपासून काही फूट उंच उडत रस्त्यालगतच्या काटेरी कुंपणात जाऊन पडला. त्याच्या सर्वांगाचे काट्यांनी चुंबन घेऊन त्याला रक्तबंबाळ केलेले पाहून माझ्यापण अंगावर दुसर्‍या प्रकारचा 'काटा' आला. अंता चौगुले महाभारतातल्या भीष्माप्रमाणे कुंपणावर आडवा झाला होता. फरक इतकाच होता, तिथे बाण होते.... इथे काटे होते.
"भो**च्या..! ब्रेक नाय का मारता येत?" अपशब्दांच्या कोशातील निवडक विशेषणाने सुरुवात करत अंता चौगुले बोलला.
"अख्खी सायकल तर मारली. अजून ब्रेक काय वेगळा काढून मारू?" माझ्या या उर्मट उत्तराने अंता चौगुल्याचे डोळे आग ओकू लागले आणि त्याच्या तोंडाच्या गटारात तुंबलेल्या शिव्यांना बाहेर येण्यास वाट मिळाली.
तोपर्यंत बघ्यांची संख्या बर्‍यापैकी वाढली होती. त्यातल्याच काहींनी काट्यात उमललेलं फुलं वेचून काढावं, इतक्या हळुवारपणे अंता चौगुल्याला कुंपणाबाहेर काढून गुणा धुमाळाच्या बैलगाडीत घालून इस्पितळात दाखल केलं.
माझा हा पराक्रम परमपुज्य वडिलांच्या कानी गेलाच होता. त्यांनी हात दुखेपर्यंत मला बडवले... त्यांचे हात दुखेपर्यंत..!

काही दिवसानंतर वडिलांनी काही रूपयांच्या बदल्यात माझी सायकल एका भंगारवाल्याला देऊन टाकली.
एक सायकल आता इतिहासजमा झाली होती.

लेखक: अमित गुहागरकर

२ टिप्पण्या:

ashish16 म्हणाले...

मस्तच अम्या, आज तुझ्यामुळे जुनी गंजलेली सायकल पुन्हा रस्त्यावर धावायला लागली :)

क्रांति म्हणाले...

प्रचंड भारी!