संगणकावर अत्यंत सोप्या पद्धतीने देवनागरी मराठीतच लिहा

‘ई-मेल लिहा मराठीतच’ हा माझा लेख ई-सकाळ च्या ८ ऑगस्ट २०११च्या अंकात आला होता त्यावर वाचकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यानंतर अनेकांनी ई-मेल मराठीत पाठवायला सुरुवातही केली. (लिंक: http://www.esakal.com/esakal/20110808/4944118130661140007.htm).

त्यानंतर अशाच लिप्यंतर पद्धतीने (transliteration) सोप्या रीतीने ‘ऑफ लाईन’ मराठीत लिहिण्याची सोय आहे का याचा मी शोध घेतला आणि मला अनेक अशा संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) सापडल्या. पण त्यात सर्वात सोप्या आणि मोफत मिळणार्‍या अशा दोन प्रणाली सापडल्या की ज्याद्वारे आपण मराठीत (विशेषत: MS Officeच्या निरनिराळ्या applicationsमध्ये, अगदी गुगल टॉकमध्येही) अत्यंत सोप्या पद्धतीने निर्दोष आणि जलद मराठी लिहू शकतो. त्या दोन प्रणालींची माहिती देत आहे.

त्या दोन प्रणाली म्हणजे १) PramukhIME आणि २) Google Marathi IME या दोन्ही प्रणाली आपल्या संगणकावरची अत्यंत कमी जागा व्यापतात. त्या आंतरजालावरून (internet) उतरवून घेणे (download) अतिशय सोपे आहे. त्या स्थापन (install) करायला जेमतेम ५ मिनिटे लागतात आणि त्यांचा वापर करून इंग्रजी कळफलक (की बोर्ड) वापरून मराठी शब्दांच्या इंग्रजी स्पेलिंगप्रमाणे टाईप करून (लिप्यंतर करून) जलद मराठी टायपिंग करता येते. प्रथम PramukhIME प्रणालीची माहिती घेऊ आणि मग Google Marathi IMEची. या दोन्ही प्रणालींचे वेगवेगळे फायदे आहेत. ते खालील विवेचनावरून समजून येतील. त्यामुळे आपल्याला जी प्रणाली जास्त सोयीस्कर वाटेल तिची निवड करून आपण ती वापरू शकता.

प्रथम PramukhIME ची माहिती घेऊ. ही प्रणाली स्थापन (install) करणे अत्यंत सोपे आहे. त्यासाठी Google वर जाऊन तेथे www.marathityping.com ही लिंक टाईप करा आणि सर्च वर क्लिक करा. त्या पानावर थोडेसे खाली Pramukh IME - Marathi typing software अशी अक्षरे दिसतील त्यातील सूचनांमधील PramukhIME या निळ्या रंगाच्या अक्षरांवर क्लिक करा. डाउनलोडच्या सूचना मिळतील त्या प्रमाणे ती प्रणाली उतरवून घ्या. आता संगणकाच्या फलकाच्या (screen) उजवीकडे खाली EN अशी अक्षरे असलेला language bar दिसेल. मग MS Wordमध्ये जा आणि त्या language barच्या EN वर क्लिक करा. की तेथे MA ही अक्षरेही दिसतील त्यावर क्लिक केले की तुम्ही मराठी टाईप करू शकाल. F12 ही कळ (key) दाबली की आपण इंग्रजी-मराठी आलटून पालटून टाईप करू शकता. या प्रणालीत दीर्घ वेलांट्या, दीर्घ उकार, तसेच ट, ठ, ड, ढ ण यासाठी कॅपिटल अक्षरांचा वापर करावा लागतो आणि ‘अ’कारांत अक्षरांसाठी शेवटी a हे अक्षर टाईप करावे लागते (उदा. ‘प’ साठी ‘pa’) आणि ‘आ’कारांत अक्षरांसाठी शेवटी ‘aa’ किंवा A टाईप करावे लागते (उदा. पा साठी paa किंवा pA). अर्थातच काही अक्षरे टाईप करताना Shift key दाबावी लागते. हा एक दोष म्हणता येईल (प्रत्यक्षात तो दोष नाही, पण त्यामुळे टायपिंगच्या वेगात फरक पडतो). ज्यांना मराठी शुद्ध लेखनाची माहिती आहे त्यांना हे सहज जमते. यात की-पॅडची सोयही आहे. की-पॅड दिसण्यासाठी CTRL+F12 दाबा. की-पॅडवरील अक्षरे /चिन्हे वापरून आपण चंद्रबिंदू , ङ, ॐ वगैरे टाईप करू शकता. याच्या Helpमध्ये आपल्याला येणार्‍या सर्व प्रश्नांची उकल केलेली आहे. या प्रणालीच्या डाउनलोड करण्याबद्दल किंवा टायपिंगबद्दल काही शंका असल्यास आपण मला ई मेल करून विचारू शकता. प्रत्यक्षात ही प्रणाली अगदी ‘बरह’ प्रणाली सारखीच आहे फरक एवढाच की ही प्रणाली मोफत आहे. यात सध्या एकाच वेळी देवनागरीतील ३+१ भाषा (संस्कृत, मराठी आणि हिंदी आणि नेपाळीही!) अधिक ८ इतर भारतीय भाषा अशा ११ भाषांचे लेखन आपण करू शकतो. फक्त language bar वर क्लिक करायचे आणि ड्रॉप-डाऊन मेनू वरून हवी ती भाषा निवडायची (क्लिक करायची).

२) आता Google Marathi IME ची माहिती घेऊ. Google Marathi IME हे सॉफ्टवेअर डाउनलोड कसे करायचे याचे फार छान प्रात्यक्षिक youtube वर उपलब्ध आहे, पण त्याची माहिती लिखित स्वरुपात उपलब्ध झाल्यास मराठी बांधवांना त्याचा जास्त उपयोग होईल अशा अपेक्षेने ते लिखित स्वरुपात देत आहे. याची कृतीही अगदी सोपी आहे. ती अशी आहे. प्रथम Googleवर जाऊन पुढील लिंकवर क्लिक करा www.google.com/ime/transliteration/ की तुम्हाला Google IME Google Input Method: Type anywhere in your language असा स्क्रीन दिसेल.

त्यात डावीकडे माहिती दिली आहे. (ही माहिती नीट वाचून मग downlod केल्यास जास्त चांगले. पण पुढील सूचना नीट पाळल्यास काही अडचण येऊ नये). उजवीकडे Choose your IME language अशी लांबट खिडकी दिसेल. त्या खिडकी शेजारी एक खाली टोक असलेला बाण (downward arrow) दिसेल. त्या बाणावर क्लिक केले की अनेक भाषांची नावे दिसतील. त्यातून ‘मराठी’ शोधून काढून त्यावर क्लिक करा. नंतर या खिडकीच्या खालच्या बाजूला Download Google IME असे निळ्या रंगाचे बटन दिसेल. त्या बटणावर क्लिक करा.

यानंतर File download security warning असा स्क्रीन येईल. त्यावरील ‘Run’ बटन क्लिक केले की downloadची प्रक्रिया चालू होईल. यापुढील कृती Windows 7 आणि Windows XP धारकांसाठी थोडीशी वेगळी आहे. ज्यांना सॉफ्टवेअर डाउनलोड करण्याचा अनुभव आहे त्यांनी आलेल्या सूचनांप्रमाणे सॉफ्टवेअर Run करून installation ची कृती पूर्ण करावी.

सर्वसाधारणपणे ही कृती पुढीलप्रमाणे आहे. (यात आपली operating system आणि आपल्या संगणकावरील setting यानुसार थोडाफार बदल होऊ शकतो).

File download security screen वर Do you want to run the software असा संदेश आला तर Run या बटणावर क्लिक करा. त्यावेळी Waiting to download Google Marathi input’ या स्क्रीनवर ‘Downloading Marathi input’ असा संदेश येईल. ते downloaing संपले की नेहेमीप्रमाणे एक End User License Agreement चा संदेश येईल. यात डावीकडे खाली ‘I accept’ असे शब्द दिसतील. त्याच्या डावीकडील चौकोनात क्लिक करा आणि खाली ‘Yes’ या बटणावर क्लिक करा. मग installation चालू असल्याचा संदेश येईल आणि ते संपल्यावर Marathi Setup Wizard has been completed या स्क्रीन वर Finish हे बटन क्लिक करा. की तुमचे आभार मानणारा संदेश येईल. आता स्क्रीनच्या अगदी खालील बाजूस किंवा वरील बाजूस उजवीकडे नीट बघा. तेथे एक छोटासा Language bar दिसेल. त्यावर इंग्रजी EN ही अक्षरे दिसतील. आता MS Word चालू करा. नेहेमीप्रमाणे एक कोरे डॉक्युमेंट (blank document) उघडेल. Language bar वरील ‘EN’ या अक्षरांवर क्लिक करा. आता एक drop down list येईल. त्यातील MA (मराठी) वर क्लिक करा. की तुम्हाला खालीलप्रमाणे IME चा वेगळा Shortcut bar सुद्धा दिसेल.

त्यात मराठी ‘अ’ हे देवनागरीतील अक्षर दिसेल. आता तुम्ही मराठीत लिहायला सिद्ध झालात. (IME च्या Shortcut barमध्ये जर इंग्रजी ‘A’ असेल तर त्यावर क्लिक करा की ते मराठी ‘अ’ मध्ये बदलेल. आधीच ‘अ’ हे अक्षर असेल तर ते तसेच राहुद्या). आता टाईप करा ‘shriganesh’ आणि स्पेस बार दाबा. तुमच्या इंग्रजी अक्षरांचे रुपांतर ‘श्रीगणेश’ मध्ये झालेले दिसेल! (गणपतीच्या नावाने शुभारंभ केलेला केव्हाही चांगला!). टाईप करताना दरवेळी कर्सरच्या खाली एक छोटी खिडकी आणि त्यात तुमच्या शब्दाला ४/५ मराठी पर्याय दिसतील. तुम्हाला वाटेल हे काय लचांड आहे? प्रत्यक्षात तो तुमचा मदतनीस आहे. स्पेस बार दाबला की ती खिडकी त्या पर्यायांपैकी पहिला शब्द टाईप करून नाहीशी होईल. टाईप केलेला शब्द तुम्हाला नको असेल तर तेच स्पेलिंग परत टाईप करा आणि त्या खिडकीतील तुम्हाला हवा असलेला पर्याय निवडून (क्लिक करून) स्पेस बार दाबा. योग्य तो शब्द टाईप होईल. सरावाने आपण अनेक युक्त्या शिकून मराठी अचूकपणे टाईप करू शकाल. आणि इंग्रजी टायपिंगच्या वेगाने मराठी टायपिंग करू लागल! जेव्हा मधेच एखादा इंग्रजी शब्द/वाक्य टाईप करायचे असेल तेव्हा F12 ही key दाबा किंवा language bar वरील ‘अ’ वर क्लिक करा. की तुम्ही इंग्रजी टाईप करू शकाल. पुन्हा F12 ही key दाबली किंवा ‘अ’ वर क्लिक केले की परत मराठीत टायपिंग करू शकाल! आहे की नाही मजा?

काही संगणकांवर शब्दांच्या पर्यायांऐवजी शब्द न दिसता चौकोन दिसतात. अशावेळी Arial Unicode MS या प्रकारचा आपल्या IME भाषेस आधारभूत (support) असलेला Unicode font स्थापित (इन्स्टॉल) करावा लागतो. यासाठी वर दाखवलेल्या IMEच्या Shortcut barमधील gear icon (काटेरी चक्राचे चिन्ह) क्लिक करून, Helpमधील Customizationमध्ये दिलेली कृती करा.

या प्रणालीमध्ये ज्यांना अनेक भाषा टाईप करायच्या आहेत त्यांना त्या भाषा वेगवेगळया स्थापन (install) कराव्या लागतात. स्थापन (install) करण्याची पद्धत तशीच आहे. स्थापन करताना आधी ती भाषा select करून मग installation करा. टायपिंगच्या वेळी भाषा बदलताना language barमधील drop down listमधून ती भाषा निवडा (EN, MA, KD वगैरे). म्हणजे तुम्ही टायपिंग केलेले शब्द त्या भाषेत (अनुक्रमे इंग्रजी, मराठी, कन्नड) उमटतील!

मी स्वतः इंग्रजी, मराठी, कन्नड, जपानी, गुजराती वगैरे अनेक भाषातील मजकूर लिहून बघितला आहे. आपण भिन्न भाषिक जरी एकमेकांशी भाषेवरून भांडत असलो तरी येथे त्या सर्व भाषा सुखाने एकत्र नांदतात!

मराठी करता काही fonts आपण नेहेमीप्रमाणे निवडू शकतो. नेहमीच्या fonts च्या यादीतून आपण ‘मंगल’ ‘अपराजिता’ आणि ‘Arial unicode MS’ हे तीन fonts निवडू शकतो.

बाकी सर्व गोष्टी, म्हणजे अक्षरांचा आकार (size) / रंग बदलणे, अक्षरे ठळक करणे वगैरे MS Word च्या सर्व सुविधा आपण मराठी करताही वापरू शकतो.

समजा installation केल्यावरही language bar दिसला नाही तर? तर मग डेस्कटॉपवर right click करा आणि Toolbars निवडून (select करून) Language barवर क्लिक करा. जर Toolbarsमध्ये Language bar दिसत नसेल तर तो Control panel मधून खालील कृतिद्वारे आपण तयार करू शकतो.

Windows 7/Vista करता language bar दिसण्यासाठी 1. Control Panelवर जा. तेथे Region and Language Options वर क्लिक करा. आलेल्या स्क्रीन वर Keyboard and Languages tabवर क्लिक करा. 2. आता Change keyboards हे बटन क्लिक करा की Text services and input languages हा स्क्रीन उघडेल. 3. Language Bar tabवर क्लिक करा. 4. येथे Docked in the taskbar च्या डावीकडील गोल बटन (radio button) क्लिक करा 5. Apply बटन क्लिक करा.

Windows XP करता Windows XP ही operating system वापरणार्‍या संगणकांवर मात्र मला एक अडचण आली. त्यात बर्‍याच वेळी Language bar दिसत नाही. अशा वेळी, 1. Control Panelवर क्लिक करा यामुळे → Regional and Language Options ही dialogue box उघडेल. तेथे Languages tab वर क्लिक करा आणि खाली “Supplemental language support Install files for complex script and right-to –left languages (including Thai)” असे लिहिलेले असेल त्याशेजारील चौकोनी खिडकीत क्लिक करा. मग एकदम खाली OK वर क्लिक करा. 2. यावेळी काही संदेश आला नाही तर ठीक आहे. पण जर संदेश आला की Wndows installation CD लागेल, तर ती CD टाकल्यावर संगणक installation पूर्ण करेल. आणि मग पुन्हा ही प्रणाली Run केल्यावर सर्व काही सुरळीत होईल. 3. Wndows installation CD बहुतेकांकडे नसते पण ज्यांच्याकडे असेल (उदा. संगणक दुरुस्त करणारे) यांच्याकडे ती मिळू शकेल. त्यामधली i386 ही फाईल भारतीय भाषांसाठी आवश्यक असते. यातूनही काही अडचण आल्यास सुरवातीच्या डाउनलोडच्या स्क्रीन वरील उजवीकडे Help आहे. त्यावर क्लिक करून त्याची मदत घ्या. तेथे सर्व माहिती इंग्रजीत दिली आहे.

या प्रणालीचा फायदा मराठी शुद्धलेखन फारसे न-जाणणार्‍या मंडळींना होतो कारण या पद्धतीने टाईप केल्यास स्पेस बार दाबल्यावर जे शब्द टाईप होतात ते, किंवा दिलेल्या पर्यायातून तुम्ही निवडलेले जे शब्द टाईप होतात ते ह्रस्व-दीर्घच्या बाबतीत बहुतांशी ‘शुद्ध’ असतात त्यामुळे तुम्ही जे मराठी टाईप करता ते बहुतांशी ‘शुद्धलिखित’ असते. त्यामुळे ‘शुद्धलेखनाचे वावडे’ असणार्‍यांना फारशी काळजी करण्याचे कारण नाही.

इंग्रजी शब्द देवनागरीत टाईप करायचे असल्यास काही वेळा काही प्रयोग करून ते जमू शकते. (उदा. ‘मेल’ हा शब्द ‘mail’ असा टाईप न करता ‘mel’ असा उच्चाराप्रमाणे टाईप करून स्पेस बार दाबा. ‘mail’ असे टाईप केल्यास ‘मैल’ असा शब्द येतो. ‘टाईप’ हा शब्द देवनागरीत लिहिण्यासाठी ‘taaip’ असे टाईप करा. ‘कॉम्प्युटर’ असा शब्द देवनागरीत लिहिण्यासाठी ‘compyutar’ असे टाईप करा वगैरे वगैरे...). या गोष्टी आपण आपल्या शिकू शकतो. काही अडचण आल्यास मला ई मेल करून विचारा.

काही मराठी शब्द किंवा अक्षरे (उदा. ङ, ॐ. चंद्रबिंदू) वगैरेंसाठी आपण मराठी की-पॅडची मदत घेऊ शकतो. मराठी की-पॅड दिसण्यासाठी वर दाखवलेल्या IME shortcut मधील ‘अ’ अक्षरा शेजारच्या की-बोर्डच्या छोट्या चिन्हावर (icon) क्लिक करा, म्हणजे मराठी की-पॅड दिसू लागेल. त्यातील अक्षरे क्लिक करून आपण अशी अक्षरे टाईप करू शकतो. परत त्या की बोर्डच्या छोट्या चित्रावर क्लिक केले, की तो की-बोर्ड नाहीसा होतो. त्या की-बोर्डच्या छोट्या चित्राशेजारी एक gear icon (काटेरी चाकासारखे चित्र) आहे. त्यावर क्लिक केल्यास एक मेनू दिसतो. त्यातून तुम्ही आणखी काही गोष्टी करू शकता. या मेनूमध्ये Help सुद्धा आहे, ती क्लिक करून आपल्या अडचणी सोडवू शकता.

या प्रणालींची वैशिष्ट्ये आणि मराठी लेखनाचा उपयोग कोठे कोठे, कोणाला आणि कसा करता येईल? १) ज्यांना फक्त इंग्रजी लिपी येते, पण इंग्रजी भाषेचे ज्ञान अगदी कमी आहे असे संगणक वापरू इच्छिणारे खेडेगावातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, कामगार वगैरे यांना फारच उपयुक्त. (अर्थात इंग्रजी फर्डे बोलणार्‍या ‘हाय-फाय’ मराठी भाषिकांनीही मराठीचा वापर करण्यात लाज बाळगायचे कारण नाही!)

२) मराठी लेखक, कवी यांना कागदाचा कमीत कमी वापर करून लेखन करता येईल (मनासारखे लिखाण न झाल्यास कागदाचे बोळे करून टाकत बसायला नको, उगाच पर्यावरणाचे नुकसान!). विशेषत: ज्यांचे अक्षर अगदी वाईट आहे अशा लेखक मंडळींना त्यांचे विचार स्पष्टपणे संगणकाद्वारे कागदावर मांडता येतील. लेखन प्रक्रिया (word processing), संपादन वगैरे अगदी सोपे झाल्यामुळे, खाडाखोड नसलेला आणि बिनचूक असा लेख तयार करता येईल आणि पुढील प्रक्रिया (टाईप सेटिंग वगरे) अचूक आणि वेगाने करता येईल. मुद्रित शोधन (proof reading) करणेही सोपे होईल.

३) एकावेळी अनेक भाषांमध्ये लिहिण्याची सोय असल्याने शब्दकोश तयार करणे सोपे होईल (अशा एका जपानी-मराठी शब्दकोशाच्या कामात मी सध्या सहभागी आहे, ज्यात संगणकाच्या माध्यमातून आंतरजालाद्वारे अनेक देशातील अनेक व्यक्ती आपले योगदान देत आहेत).

४) प्रत्येक भारतीयास संगणकावर अगदी सोप्या रीतीने आपल्या मातृभाषेत लिहिण्या/वाचण्याचे सुख मिळेल.

५) संगणकाचा प्रसार भारताच्या अगदी कानाकोपर्‍यापर्यंत होऊ शकेल (अर्थात आपण आपल्या मातृभाषेचा वापर शक्य तेथे कटाक्षाने केला तर! आणि तशी इच्छाशक्ती असेल तरच!) आणि त्यामुळे संगणक-साक्षरता वाढीस लागेल.

६) महत्त्वाचे म्हणजे या प्रणाली मोफत आहेत. त्या संगणकावरची जास्त जागा व्यापत नाहीत आणि वापरण्यास अत्यंत सोप्या आहेत. त्यामुळे ‘संगणकावर मराठी वापरणे अवघड आहे’ अशी सबब सांगून ‘देवनागरीतील मराठी’मध्ये लिहिण्याची टाळाटाळ करणार्‍या मंडळींची तथाकथित अडचण दूर झाली आहे.

७) या पद्धतीने लिहिताना इंटरनेट चालू ठेवण्याची आवश्यकता नाही.

८) अशी MS Wordमध्ये मराठीत लिहिलेली मेल कॉपी करून G mailवर आणि Yahoo mailवर चिकटवून (पेस्ट करून) पाठवता येते. ती पलीकडच्या व्यक्तीस मराठीत दिसते. तसेच G mailवर प्रत्यक्ष (direct) लिहिताही येते. पण Yahoo mailवर मात्र प्रत्यक्ष (direct) लिहिता येत नाही. ती इतर application (MS Word वगैरे) लिहून कॉपी करून चिकटवूनच पाठवावी लागते. फेसबुक वर सुद्धा प्रत्यक्ष मराठीत लिहिता येत नाही. पण कॉपी-पेस्ट करता येते.

९) गुगल संभाषणवर (Google talk)  chat (गप्पा) करताना त्या चॅटिंगच्या फलकावर (screen) देवनागरी मराठीत लिहिता येते. म्हणजे आता Google talkवर chat करताना तुम्ही देवनागरी मराठीत chat करू शकता! ते करताना पलीकडची व्यक्ती मराठी अक्षरे पाहून ‘चाट’च होते. आणि ते त्या अर्थानेही chating होते. एकदा रोमन लिपीत मराठीत चॅटिंग करायच्या ऐवजी देवनागरीत मराठी चॅटिंग करून पहा म्हणजे त्यातील गम्मत कळेल.

११) मी संगणकात साठवलेल्या मराठी आणि हिंदी गाण्यांच्या याद्यासुद्धा देवनागरीत केल्या आहेत. त्यामुळे गाण्यांचे बोल चटकन वाचता येतात आणि पाहिजे असलेले गाणे यादीतून चटकन निवडून winamp वर वगैरे लावता येते. इंग्रजी (रोमन) लिपीत लिहिलेले हिंदी/मराठी गाण्याचे बोल वाचणे किती विचित्र असते हे सगळ्यांना माहित आहेच. तसेच फोटोंच्या खालील माहितीपूर्ण मजकूर, त्यातील व्यक्तींची नावे वगैरे गोष्टी मराठीत लिहिता येतील.

१२) गुगलने असे म्हटले आहे की Google IME या प्रणालीत त्यांनी काही सुधारणा (updates) केल्या, तर (जरी आपण हे IME त्यावेळी वापरत नसाल तरीही) ती नवीन आवृत्ती (version) आपोआप आपल्या संगणकावर स्थापित होईल.

१३) MS Officeच्या Power Pointच्या पारदर्शिका (transparencies)मध्ये सुद्धा या प्रकारे मराठीत प्रत्यक्षपणे (direct) लिहिता येते त्यामुळे मराठीमध्ये पारदर्शिका करणे सोपे झाले आहे.

१४) MS Office च्या Excelमध्ये मी मराठीत लिहून पहिले आणि व्यवस्थित मराठीत लिहिले गेले इतकेच नाही तर आकडे मराठीत लिहिले आणि त्यांच्या बेरजा करून पहिल्या त्याही मराठीत आल्या!

अशा अनेक applicationsमध्ये या प्रणालीचे उपयोग आहेत. अर्थात आपण जसजसा याचा वापर करत जाऊ तसे आपण परिपूर्णरित्या मराठी वापरू शकू. संगणकावर मराठीत लिहिण्याच्या सर्व सुविधा मोफत उपलब्ध आहेत पण आपण त्यांचा जास्तीत जास्ती वापर करणे आवश्यक आहे. हा लेख मी Google IME या प्रणालीचा वापर करूनच लिहिला आहे.

याबाबतीत आपल्याला काही अडचण आल्यास जरूर मला विचारा. मी संगणक तज्ज्ञ नसलो तरी मला जेवढे शक्य आहे तेवढे मार्गदर्शन आपल्याला जरूर करेन.

आपण आपल्या संगणकावर मराठीत टाईप करायला सुरवात करालच, पण हे प्रत्येकाने आपल्यापुरतेच न ठेवता कमीत कमी ४/५ जणांना शिकवा. इतर भाषिकांनाही हे असेच त्यांच्या भाषेतही लिहिणे शक्य आहे असे सांगा.

खाली दिलेल्या Youtube लिंक वर उपयुक्त माहिती चित्रफितीच्या स्वरुपात दिली आहे ती जरूर पहा. गुगल आय एम इ –एक मस्त टंकलेखन सुविधा (वीरेंद्र तिखे) http://www.youtube.com/watch?feature=player_detailpage&v=V30KOiqH5DQ Marathi Typing with Google IME on WinXP (खांडबहाले) http://www.youtube.com/watch?feature=player_detailpage&v=XRy3_Gmt5ak
माझ्या मते, आपण सर्वांनी मराठी लेखनाबाबत आपल्याकडे असलेले ज्ञान जर आंतरजालाच्या सहाय्याने एकमेकांस माहित करून (share) दिले तर आपल्या संगणकावर ‘बहुतांशी मराठी आणि फक्त आवश्यकतेपुरतीच इंग्रजी’ असे चित्र दिसायला वेळ लागणार नाही. आपणांपैकी कोणाला या संगणक प्रणालीचा उपयोग करताना काही नवीन ‘शोध’ लागले तर मला आणि इतरांनाही सांगा. यामुळे मराठी भाषा परिपूर्ण रीतीने संगणकावर आरूढ होऊ शकेल.

संगणक म्हणजे इंग्रजी भाषा हे समीकरण बदलणे आपल्याच हातात आहे. आपला संगणक लवकरात लवकर मराठी बाबत साक्षर होवो ही सदिच्छा.

लेखक: डॉ. हरी दामले
’उत्कर्ष’, ५२/१
सहजानंद सोसायटी,कोथरूड,
पुणे ४११०३८
फोन: ९८२२२१०९५२
hari.damle@gmail.com

1 टिप्पणी:

विनायक म्हणाले...

डॉ.हरीजी, मराठी भाषा वापर व लिखाण त्या करता तुमचे हे प्रयत्न फार स्तुत्त्य आहेत. ह्या लेखात देवनागरी वापराच्या प्रत्यक्ष संगणकाने केलेल्या कामाच्या प्रतिमा (स्क्रीन शॉट) वापरल्या असत्या तर जास्त परिणाम साधला असता.