पृष्ठे

थरार ... अशेरीगड ट्रेकचा !



किल्ल्याची उंची   : १६८० फूट
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग           : पालघर
जिल्हा              : ठाणे
श्रेणी                : मध्यम


पालघर विभागात जे अनेक लहानमोठे किल्ले आहेत, त्यांच्यात प्रशस्त वाटावा असा हा अशेरीगड. आकार प्रचंड असल्याने हा गड बुलंद वाटतो.

इतिहास : अशेरीगड शिलाहारवंशीय भोजराजाने बांधला असा उल्लेख आहे. त्यामुळे या गडाचे आयुर्मान साधारणतः ८०० वर्षे आहे असे अनुमान निघते. पुढे १४व्या शतकात महिकावती नगरी (माहीम) येथील राजा बिंबदेव याने हा किल्ला जिंकून घेतला व या गडाचा उत्तम बंदोबस्त करून येथे आपले लष्करी ठाणे बसविले. पुढे पोर्तुगीजांनी वसईत बस्तान बसविल्यावर इ. स. १५५६ साली अशेरीवर हल्ला करून तो बळकाविला. या किल्ल्याचे महत्त्व लगेच पोर्तुगीजांच्या लक्षात आले व त्यांनी या गडाच्या मजबुतीकरिता अनेक नवीन बांधकामे केली. पुढे संभाजी राजांच्या कारकीर्दीत पोर्तुगीजांना धडा शिकविण्यासाठी इ. स. १६८३ साली तारापूरवर हल्ला करून बेचिराख केले. त्याच वेळी राजांनी अशेरीगड जिंकून स्वराज्यात सामील केला पण ऑक्टोबर १६८७मध्ये हा किल्ला परत पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. पुढे चिमाजी आप्पा पेशवे यांच्या वसई स्वारीच्या वेळी मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून  १७३७च्या कोंकण मोहिमेत हा गड जिंकून घेतला व परत मराठ्यांचे भगवे निशाण गडावर अभिमानाने डोलू लागले. १८१८ नंतर अशेरीगड इंग्रजांच्या हाती गेला.                                                          

ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुका आजही गडकोटांनी समृद्ध असलेला तालुका म्हणून ओळखला जातो. मुंबई- ठाणे शहरातील बहुतेक किल्ले आज नामशेष होण्याच्या मार्गावर असताना पालघर तालुक्यातील गडकोट मात्र लहान लहान डोंगररांगांवर अजूनही आपले अस्तित्व टिकवून बर्‍यापैकी अवस्थेत उभे आहेत. मुंबई- अहमदाबाद महामार्गालगत उभा असणारा "अशेरीगड" हा किल्ला मुद्दाम सवड काढून पाहावा असाच आहे. इतिहास काळात ठाण्याच्या उत्तर सीमेचे रक्षण करणार्‍या या किल्ल्याच्या परिसरात साग वगैरे कित्येक झाडांचे जंगल आहे. प्रामुख्याने जहाज बांधणीस उपयुक्त ठरणार्‍या लाकडांमुळे या गडाचे इतिहासकाळात फार महत्त्व होते.                                                                 

नियो-म्याड आणि क्लिक्स या दोन ग्रुप्स तर्फे रविवार दिनांक १८ डिसेंबर २०११ रोजी  "अशेरीगड" ट्रेक आयोजित केला होता. घाटकोपर/ठाणे इथून सकाळी ठीक सात वाजता बसने निघायचे ठरले होते. आम्ही काही जण घाटकोपरला बस मध्ये बसलो .. निघताना तसा थोडासा उशीरच झाला होता. ठाणे इथे आणखी काही जण बसमध्ये बसले. एकूण अकरा जण होतो आम्ही. ठाणे - घोडबंदर दिशेने आमची बस निघाली. काही अंतरावरच बस पोहोचली असेल, अन आम्ही ट्रॅफिक जाममध्ये फसलो.
ठाण्यात त्यादिवशी श्री अप्पासाहेब धर्माधिकारी आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत समर्थ संप्रदाय अन शिवसेना यांच्या वतीने मेळावा आयोजित केला होता. सर्वच ठिकाणांहून लोक इथे वाहनांनी अथवा पायी चालत त्या दिशेने जात होते. सर्वत्र गर्दीच गर्दी झाली होती. ट्रॅफिकचे अगदी तीन-तेरा वाजले होते. पदयात्री तसेच रस्त्यावरील वाहने मंदगतीने पुढे सरकत होती. पायी चालणार्‍या लोकांचा वेग काही ठिकाणी वाहनांपेक्षा थोडा अधिकच होता.  
हळू हळू पुढे सरकत आमची बस घोडबंदरच्या दिशेने निघाली. तिथेही दुसर्‍याच कारणासाठी  ट्रॅफिक जाम झाले होते. गाड्यांच्या लांबच लांब रांगा अगदी तिथल्या टोल नाक्यापासूनच लागल्या होत्या.

अचानक एका एस्टीच्या ड्राईव्हरने आपली नसलेली अक्कल-हुशारी दाखविण्याचा प्रयत्न केला. अगदी थोडक्यातच आमची बस वाचली खरी, तरीही
आमच्या बसला एस्टीचा मागून निसटता स्पर्श झालाच. एस्टी ड्राईवरला दमात घेताच माफी मागून त्याने वेळ मारून नेत  आपली सुटका करून घेतली. टोलनाका पार करून मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पोहोचेपर्यंत साडे-दहा वाजून गेले होते. आता आमचा प्रवास अहमदाबाद महामार्गाने सुरू झाला. मध्येच बसमध्ये डिझेल भरून घेतले आणि आम्ही देखील चहा-पाणी उरकून घेतले. इथून पुढे परत एकदा आम्हाला ट्रॅफिकजामला सामोरे जावे लागले. मस्तान नाक्यावर पोहोचेपर्यंत आमच्या बस ड्राईवरने बस पुढे काढण्याचे  सर्वच प्रयत्न केले . अगदी विरुद्ध दिशेच्या रस्त्यानेसुद्धा गाड्यांची एक लाइन सुरू झाली विरारच्या दिशेने जायला. मस्तान नाक्यावरून पुढे चारोटीच्या दिशेने निघालो आम्ही.                                                                                                 
मस्तान नाक्यापासून पुढेच १०-१२ कि.मी. डाव्या बाजूला खोडकोना गावाचा फाटा लागतो. या ठिकाणी महामार्गावर रस्त्याच्या डाव्या हाताला अशेरीगड तर उजव्या हाताला अडसूळ किल्ला दिसतो. अडसूळ किल्ल्यावर कोणतेच दुर्गावशेष नसल्यामुळे दुर्गप्रेमींनी या गडाकडे पाठ फिरवली आहे. इथून गाव थोड्या अंतरावरच असून बैलगाडीच्या रस्त्याने आत जावे लागते. आमची बस छोटीच असल्याने आतपर्यंत नेता आली. एकदाचे आम्ही आमच्या नियोजित ठिकाणी म्हणजे खोडकोना गावाजवळ पोहोचलो.

 
पुढे नदीवरील सिमेंट पुलावरून पलीकडे गेले की आपण गडपायथ्याच्या खोडकोना गावात येऊन पोहोचतो .  इथे वेशीवरच वाघदेवाचे छोटेसे परंतु टुमदार मंदिर आहे. आत गेल्यावर विस्तीर्ण पसरलेले आम्रवृक्ष, शेते व त्यातून डोकावणारी घरे प्रवासाचा शीण घालवतात. घरांसमोर स्वच्छ सारवलेले अंगण, मातीचा पोतेरा मारलेल्या भिंती आणि त्यावर वारली चित्रे चितारलेली. अतिशय लोभसवाणी अशी ही चित्रे खोडकोना गावातील प्रत्येक झापाच्या भिंतीवर पाहायला मिळतात. आपण या वारली चित्रकलेचा रसिक मनाने आस्वाद घ्यायचा. सभोवार भाताची छोटी- छोटी खाचरे आणि यात बागडणारी वारली लोकांची स्वच्छंदी, उघडी-नागडी मुले !

इथे येईपर्यंत रिकाम्या झालेल्या पाण्याच्या बाटल्या भरून घेऊन गावातून गडाकडे जाणार्‍या पायवाटेने निघालो. उजव्या हातास गड व डाव्या हातास गडाकडे घेऊन जाणारी खिंड असा हा प्रवास आहे. जागोजागी बाणांच्या खुणा पायवाटेच्या मार्गाची दिशा दाखवून देतात. या खिंडीचा सपाट माथा गाठण्याच्या दृष्टीने चालायला लागलो.
साग, ऐन, हिरडा, चिंच, पळस, खैर अशा दमदार वृक्षांनी दाटी केलेल्या जंगलामधील मळलेल्या पायवाटेने साधारण तासाभराची चढाई केल्यावर खिंडीच्या माथ्यावर असलेल्या थोड्या सपाटीवर येऊन पोहोचलो. येथून पायवाट उजव्या हातास गडाच्या डोंगरास भिडते. उजव्या हातास झाडीत वाघ्या देवाची मूर्ती दिसते.  ही मूर्ती म्हणजे आदिवासींचा जंगलरक्षक वाघदेव.


पुढे कातळातच खोदलेल्या छोट्या पायर्‍यांनी आणखी थोडी चढाई केल्यावर सपाटीवर येऊन पोहोचलो. इथे पूर्वी गडाचा दरवाजा होता. पण नेहमीप्रमाणे इंग्रजांच्या अवकृपेने तो तोडल्यामुळे थोडी कसरत करत अन शरीर तोलत अरुंद बेचक्यातून शिडीमार्गे वर गडमाथ्यावर पोहोचलो.
तिथे एक कोरलेले उठावदार दगडी मुकुट व त्याच्याखाली पोर्तुगीज राजसत्तेचे चिन्ह दिसले. इथेच कातळात खोदलेले पाण्याचे टाकेही आहे.
या टाक्याचे थंडगार पाणी चढाईचा थकवा क्षणार्धात घालवते.
पुढे कातळातच खोदलेल्या पायर्‍यांवरून चढत अशेरीगडाच्या दुसर्‍या भग्न दरवाज्यात पोहोचलो. इथल्या अवशेषांवरून  भग्न दरवाज्याची मूळ रचना लक्षात येते. अशेरीगडाचा विस्तार उत्तर- दक्षिण पसरलेला असून याच्या माथ्यावरील जंगल आजही बर्‍यापैकी टिकून आहे. या वाटेने जाताना डाव्या हाताला थोडे खाली खडकात पाच पाण्याची टाकी खोदलेली आहेत. यापैकी एका टाक्याचे पाणी पिण्यायोग्य आहे. पुन्हा सरळ वाटेने पुढे चालल्यावर ५ मिनिटांच्या अंतराने डावीकडे अजून एक वाट फुटते. तिथून खाली गेल्यावर पाण्याची तीन आणखी टाकी आहेत.


यापुढची पायवाट थोड्या वेळात गडाच्या सर्वोच्च पठारावर घेऊन जाते. येथे पोहोचताच समोरच आपणास पडक्या वाड्याचे चौथरे दिसतात.
विशेष म्हणजे, या चौथर्‍याच्या चारी बाजूंनी दगडी चर खोदलेला आहे. येथून पुढे आम्ही एका दगडात खोदलेल्या गुहेत येऊन पोहोचलो. या गुहेच्या आतील बाजूस कातळावर अशेरी देवीचा तांदळा असून गुहेत चार-सहा लोक झोपतील एवढी जागा आहे. गावकर्‍यांकडून येथे कधीतरी पूजा होत असावी असे वाटणारी व एरवी सहसा न आढळणारी दोन जास्वंदीची झाडे गुहेच्या तोंडासमोरच आहेत. गुहेच्या वरच्या अंगाला एक चौकोनी बांधीव तळे आहे. या तळ्यात एक अर्धवट बुडलेली तोफही आहे असे समजले. याशिवाय आणखी दोन अर्धवट बांधलेली तळी आहेत.  पुढे  गडाच्या माथ्यावर कमलपुष्पांनी भरून गेलेला तलाव दिसला. सह्याद्रीतील किल्ल्यांवर शेकडो तलाव आहेत. पण कमलवेलींनी भरून  सौंदर्य वाढवलेला हा एकमेव असावा.
                                                                                                                      
गडावर आम्ही अल्पोपहार केला. सूर्यास्त होईपर्यंत आम्ही गडावरच फेरफटका मारत फिरत होतो. सूर्यास्तानंतर आम्ही गड उतरण्यास सुरुवात केली. टॉर्चेस जवळ होत्याच, पण काळोख होण्याच्या आधीच गडाच्या पायथ्याशी पोहोचायचे ठरले होते. अर्ध्या वाटेतच अंधाराने आम्हाला गाठले पण तोपर्यंत आम्ही गड उतरलो होतो आणि मग मात्र सावधपणे आम्ही जंगलवाटेने परतीचा मार्ग चालत - खरे तर अडखळत, ठेचकाळत - गाव गाठले. गावाबाहेर पडल्यानंतर पुढे बसमध्ये बसलो आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.


लेखक आणि छायाचित्रकार: आल्हाद पाटील

1 टिप्पणी: